लेख-समिक्षण

बाटलीतलं भूत

भस्मासुराला वर देणं आत्मघातकी ठरतं, हे आपल्याला पुराणकथेमधून समजलेलं आहे. परंतु तरीही आधुनिक काळात आपण असंख्य भस्मासुर जन्माला घातले; पोसले. नव्या तंत्रज्ञानाला विरोध करणं म्हणजे मानवजातीच्या कल्याणाला विरोध करणं, ही आधुनिक अंधश्रद्धा थोडा वेळ दूर ठेवून विचार करून काही प्रश्न आता आपल्याला पडायलाच हवेत. त्यातील महत्त्वाचा प्रश्न असा, की आधुनिक तंत्रज्ञानाने खरोखर अखिल मानवजातीचं कल्याण होतंय की मूठभरांचं उखळ पांढरं होतंय? दुसरा प्रश्न असा, की तंत्रज्ञानाचा किती टक्के विधायक वापर होतोय आणि किती टक्के विघातक? अणुशक्तीच्या वापराने आपला फायदा निश्चितच झाला; पण त्याबरोबर आलेल्या धोयाने किती बळी घेतले? अणुशक्तीचा वापर धमकावण्यासाठीच अधिक का होतोय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी आज हीच भीती आ वासून समोर उभी आहे. हे ‘बाटलीतलं भूत’ बाहेर काढून आपण आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेत आहोत का? याचा विचार याच टप्प्यावर करणं उचित ठरेल, कारण भविष्यात कदाचित आपण मोठ्या संकटात सापडू शकतो. किंबहुना हे संकट आताच दाराशी आलंय. एआय माणसाला मदत करतोय हे खरं; पण हेच तंत्र आता माणसाला ब्लॅकमेलही करू लागलंय. या बाबतीत ताजा अनुभव आपल्याला धोयाचा इशारा देणारा आहे. आपण ‘रिप्लेस’ होणार हे लक्षात आल्यावर एआयने इंजिनिअरला ‘पोलखोल’ करण्याची धमकी दिलीये.
अँथ्रोपिक नावाच्या एआय स्टार्टअप कंपनीत जे घडलं, ते हैराण करणारं तर आहेच; शिवाय केवळ आचंबित होऊन थांबता येणार नाही, असा इशारा देणारं आहे. एआय माणसासारखाच आहे, म्हणूनच तो माणसासाठी खतरनाक आहे, असं या घटनेवरून म्हणता येतं. ‘लाउड ओपस-४’ ही एआय यंत्रणा कंपनीत सक्रिय होती. या यंत्रणेच्या जागी नवी प्रणाली आणली जात आहे आणि जुनी प्रणाली ‘शट्डाउन’ करण्यात येत आहे, असा मेल या एआयने ‘पाहिला’. माणसाप्रमाणेच एआयलाही अस्तित्वाची काळजी असणं स्वाभाविकच आहे. त्यामुळं ‘लाउड ओपस’ने चक्क इंजिनिअरलाच ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. ‘हुशार’ असल्यामुळं इंजिनिअरची अफेअर्स हीच आपली ताकद असल्याचं एआयला समजलं. आपल्याला ‘रिप्लेस’ केलं, तर ही अफेअर्स मी सार्वजनिक करेन, असं एआय म्हणू लागला. अर्थात रिप्लेसमेंटच्या चर्चेपासून इंजिनिअरच्या अफेअरपर्यंत सर्व माहिती एआयला पुरवली गेली होती. सुट्या माहितीचा एक संचच त्याला पुरवण्यात आला होता. परंतु या सार्‍याचा अर्थ लावणं, या गोष्टी परस्परांशी जोडणं आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी माहिती वापरणं, हे एआयचंच डोकं!
आपल्या अस्तित्वावर गदा येत असेल तर बचावासाठी आपल्या अंगभूत शक्ती न वापरता समोरच्या व्यक्तीचे ‘वीक पॉइंट्स’ वापरायचे ही हतबल; पण चतुर माणसाची हुकमी लृप्ती आहे. काही अतिचतुर माणसं तर अशी माहिती मुद्दाम गोळा करत राहतात, जी धोयाच्या वेळी वापरता येईल! एआयने या प्रयोगात ८४ टक्के घटनांमध्ये ब्लॅकमेलिंगचं हत्यार वापरलं. जो अस्तित्वासाठी ब्लॅकमेल करू शकतो, तो त्याच्या निर्मात्याच्या नाजूक माहितीचा संग्रह वेगवेगळ्या स्रोतांमधून नक्कीच करू शकतो. म्हणूनच एआयपेक्षा आपण हुशार आहोत, या गैरसमजातून बाहेर पडणंच अधिक हितावह आहे.

Check Also

दिलासादायक माघार

केंद्र सरकारने बहुचर्चित ‌‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026‌’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …