‘आनंदी आयुष्य ही दैवी देणगी नसते! ’ या विधानाशी सगळेजण सहमत होतील. कारण जन्माला येताना कुणी आनंदाचं पॅकेज सोबत घेऊन येत नाही. आनंद कशाला म्हणायचं? तर मनासारखं होणं म्हणजे आनंद. खरं तर मनासारखं घडणं की न घडणं या दोन गोष्टींच्या झुल्यावर माणसाचं आयुष्य हेलकावत असतं. काहीही हवं ते मिळालं की माणूस सुख समाधानानं भरून पावतो. तेच हवं ते घडलं नाही की दुःख, नैराश्यानं ग्रासला जातो. दुःख हवंय अशी एकही व्यक्ती जगात सापडणार नाही. त्यामुळे आपल्याच मनासारखं व्हावं, म्हणून आयुष्यभर झटत राहतो आपण. कधी कधी ‘आपल्याच’ मनासारख होण्यामध्ये ही दुसर्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा संकोच होऊ शकतो. किंवा आपला आनंद ज्याने वाढतो, त्याने कधीकधी दुसर्याच्या आयुष्यात दुःख निर्माण होते.
एक साधारणस उदाहरण घेऊया. एखाद्या परीक्षेला दोन विद्यार्थी बसले आहेत. दोघेही हुशार, कष्टाळू, प्रयत्नवादी आहेत. दोघांनाही परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवायचा आहे. परीक्षेचा रिझल्ट जेव्हा लागतो तेव्हा दोघांपैकी एक पहिला येतो, एक दुसरा. पहिल्याचा आनंद गगनात मावत नाही. तर दुसरा अगदी किंचितशा फरकाने मागे पडलो म्हणून अतिशय दु:खी होतो. म्हणजे एकच घटना दोन व्यक्तींच्या आयुष्यात वेगवेगळ्या परिणामांची नांदी ठरवत असते. आता इथे आपल्या ‘बदलाची तयारी’ या गोष्टीची गरज पडते. कारण पहिल्या नंबर वाल्याने जी स्वप्नं पाहिली आहेत, तिकडे तो जायला मोकळा असतो, पण स्वतःच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची तयारी कुणी करायची तर दुसर्याने करायची.
बदल ही आयष्यातली अपरिहार्यता आहे, किंबहुना ‘जगात कायम राहणारी एकच गोष्ट म्हणजे बदल!’ असे म्हणता येईल. बदल हा जीवनाचा स्थायीभाव आहे, हेच आपण विसरून जातो आणि म्हणून दुःखाला सुरुवात होते. माणूस स्वत:ही वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर बदलत असतो. वयाच्या सोळाव्या वर्षी जे तुम्हाला आनंद देणार वाटतं; ते पन्नासाव्या वर्षी वाटेल असं नाही. त्यामुळे आपण जसे बदलतो तशी परिस्थतीही बदलणार हे गृहितच धरलं पाहिजे. एकाच ठिकाणी अडवून पडलं तर आयुष्य एकसुरी होईल. त्यात साचलेपण येईल. एखादा तलाव किंवा खळखळ वाहात जाणारी नदी यात चैतन्य कशामध्ये आहे? तर खळाळत्या प्रवाहात. आपण तसे असले पाहिजे. नदी अनेक वेगवेगळ्या तटांवरून पुढे जात राहते, तसे आयुष्यात जे बदल येतील, ते तिच्या सारखे तटस्थपणे स्विकारता आले पाहिजेत.
हे अवघड आहेच. कारण मुळात माणसाचा स्वभाव हा ‘कम्फर्ट’ कसा आणि किती मिळेल हे बघण्याचाच असतो. ‘मला एसटीने जाणे आवडत नाही.’ ‘घरगुती जेवणाचा मला कंटाळा येता!’ ‘मला सतत फिरायला आवडते. एके ठिकाणी थांबणे मला आवडत नाही!’ असे एक ना दोन, अनेक कम्फर्ट झोन असतात. त्यात बदल करायची इच्छाही नसते किंवा तयारी नसते. साहाजिकच परिस्थिती बदलली की अशा व्यक्ती हवालदिल होतात.
अगदी छोटीशी गोष्ट घेऊया. समजा तुम्ही एखाद्या आवडत्या ठिकाणी वडा खायला गेलात. तिथे जाण्यापूर्वी हवी ती गोष्ट मिळण्याच्या कल्पनेने तुम्ही तो खाद्यानुभव घ्यायला आतूर असता. तिथे गेल्यावर तुम्हाला कळतं की ने हॉटेल बंदच आहे. मात्र शेजारच्या छोट्या हॉटेल मध्ये ‘पिठलं-भाकरी- खर्डा’ असा मेनू आहे. आता तुम्ही ‘बदल नकोतच’ या कॅटॅगिरीत असाल तर तुम्ही दुःखी व्हाल, वैतागाल. पण बदलाची अपरिहार्यता ज्यांना समजते, ती व्यक्ती काय करेल ‘अरे वा! वडा नसला तरी काय झालं? गरम पिठलं भाकरी तरी आहे. ती खाऊन घेऊ’ म्हणून आनंदाने त्याचा स्वीकार करेल. ही छोटी गोष्ट वाटली तरी त्याचा मथितार्थ लक्षात घ्या. आयुष्यात तुम्हाला हवे तेच घडेल, हे शक्य नाही. कधी कधी मनासारखे घडेल, तर बरेच वेळा तडजोडच करावी लागेल. .
स्वत:मध्ये बदले घडवणं, हे अतिशय अवघड काम आहे. आवडत नाही, ते मन स्विकारायला तयार होत नाही. पण जर ‘परिस्थती कशीही येऊ दे, मी त्यानुसार स्वतःमध्ये बदल करेन!’ हा रिसिव्हिंग मोड ठेवला, तर इतके वेगळे आणि अनपेक्षित आनंद वाट्याला येतील की तुम्हाला वाटेल, की ‘अरे, हे मी आधीच का केलं नाही?
Check Also
लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत
लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …
पांचजन्य वृत्तपत्र