‌‘बंटवारा‌’साठी आमीरचा पुढाकार

आमिर खान, सनी देओल आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या बहुप्रतीक्षित ‌‘लाहोर 1947‌’ या चित्रपटाच्या शीर्षकात (टायटल) मोठा बदल करण्यात आला असून, आता हा चित्रपट ‌‘बंटवारा‌’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शीर्षकाचे हक्क मिळवण्यासाठी स्वतः निर्माता आमिर खानने घेतलेल्या पुढाकारामुळे हा महत्त्वपूर्ण बदल शक्य झाला आहे. या चित्रपटाचे नाव आधी ‌‘लाहोर 1947‌’ असे निश्चित करण्यात आले होते. मात्र, एका पाकिस्तानी शहराचे नाव मुख्य शीर्षकात असण्याऐवजी फाळणीची दाहकता अधोरेखित करणारे नाव असावे, असे मत चित्रपट निर्मिती चमूचे (टीम) बनले. या विचारातून आधी ‌‘बंटवारा 1947‌’ या नावावर चर्चा झाली, पण शेवटी केवळ ‌‘बंटवारा‌’ हेच नाव सर्वाधिक प्रभावी ठरेल यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मुख्य अडचण अशी होती की, ‌‘बंटवारा‌’ या शीर्षकाचे कायदेशीर हक्क दिवंगत चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांच्या कुटुंबाकडे होते. सलीम अख्तर यांनी 1989 मध्ये ‌‘बंटवारा‌’ नावाचा एक यशस्वी चित्रपट बनवला असल्याने या नावाचे हक्क त्यांच्याकडेच राखीव होते. हा तिढा सोडवण्यासाठी ज्येष्ठ चित्रपट निर्माते करीम मोराणी यांनी मध्यस्थी केली. त्यांनी आमिर खान आणि सलीम अख्तर यांचे सुपुत्र समद अख्तर यांची भेट घडवून आणली. यानंतर आमिर खानने थेट समद यांच्या घरी जाऊन त्यांची आणि सलीम अख्तर यांच्या पत्नी शमा यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान आमिरने सलीम अख्तर यांच्यासोबत ‌‘बाझी‌’ या चित्रपटात काम करतानाचे आपले जुने अनुभव आणि आठवणींना उजाळा दिला. तसेच, त्याचा आगामी चित्रपट फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याने त्यासाठी ‌‘बंटवारा‌’ हे शीर्षक किती समर्पक आहे, हे त्यांनी अख्तर कुटुंबाला पटवून दिले. आमिरचा प्रामाणिक दृष्टिकोन आणि चित्रपटाविषयीची तळमळ पाहून अख्तर कुटुंबाने एका निश्चित रकमेच्या बदल्यात या शीर्षकाचे हक्क आमिर खान प्रॉडक्शन्सला देण्याचे मान्य केले.- अपर्णा देवकर

Check Also

चर्चा वेदांग-नाओमिकाच्या जवळीकीची

अभिनेता वेदांग रैना आणि बॉलिवूडचे दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांची नात नाओमिका सरन यांना मुंबईत …