लेख-समिक्षण

प्रोत्साहनाची थाप

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केल्या जाणार्‍या पद्म पुरस्कारांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले असते. साहित्य, कला, कृषी, क्रीडा, उद्योग, शिक्षण, सामाजिक कार्य, संशोधन आदी क्षेत्रात अमूल्य योगदान देणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात येतो. याहीवेळी पद्म विजेत्यांत देशातील आणि विदेशातील नामवंताचा समावेश असून त्यापैकी काही जण प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिलेले आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये या पुरस्कारांमध्ये राजकीय हित बाजूला सारुन प्रत्यक्ष कार्याची आणि योगदानाची दखल घेऊन प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्यांची निवड नागरी पुरस्कारांसाठी केली जात आहे. यंदाच्या पुरस्कारांनाही ही बदलाची परंपरा कायम ठेवली आहे.
रवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केल्या जाणार्‍या पद्म पुरस्कारांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले असते. साहित्य, कला, कृषी, क्रीडा, उद्योग, शिक्षण, सामाजिक कार्य, संशोधन आदी क्षेत्रात अमूल्य योगदान देणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात येतो. लिंग, जात, व्यवसाय, स्थिती असा भेदभाव न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र मानल्या जातात. तथापि, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ, सरकारी संस्थांसोबत काम करणारे सरकारी कर्मचारी या पुरस्कारांसाठी पात्र नाहीत. सार्वजनिक सेवेचा एक घटक असलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांचा सन्मान करणे हा या पुरस्कारांचा उद्देश आहे. दरवर्षी स्वतः पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या पद्म पुरस्कार समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे हे पुरस्कार दिले जातात. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये गृह सचिव, राष्ट्रपतींचे सचिव आणि चार ते सहा प्रतिष्ठित व्यक्तींसारखे प्रमुख अधिकारी समाविष्ट आहेत. यासाठीची नामांकन प्रक्रिया लोकांसाठी खुली आहे. स्व-नामांकन देखील करता येते. नावनोंदणीसाठी सार्वजनिक वेबसाइट असून त्यावर कोणीही नावनोंदणी करू शकते. समितीच्या शिफारशींनंतर, भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून अंतिम मंजुरी मागितली जाते. 2023 मध्ये 106 जणांना पद्म पुरस्कार देण्यात आले होते; तर गतवर्षी ही संख्या 132 इतकी होती. यंदा 139 पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये 7 पद्म विभूषण, 19 पद्म भूषण आणि 113 पद्मशी पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार प्राप्तकर्त्यांमध्ये 23 महिला, 10 अनिवासी भारतीय आणि 13 मरणोत्तर पुरस्कार विजेते आहेत.
जपानचे उद्योजक ओसामु सुझुकी यांंचे नाव कदाचित नव्या पिढीना ठाऊक नसेल. पण याच व्यक्तीने सामान्य भारतीयांना सुमारे चार दशकांपूर्वी मोटार चालविण्याचे स्वप्न दाखविले होते. त्यांनी सुझुकी मोटर्स आणि भारत सरकारचा उपक्रम मारुती उद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने मारुती -800 मोटार लाँच केली. सुझुकी यांनी देशातील वाहन उद्योगाच्या क्रांतीची पायाभरणी केली. त्यांना 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मरणोत्तर पद्भविभूषण सन्मान जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे देशात आर्थिक उदारीकरणाचे वारे वाहण्यापूर्वी भारतीय रस्त्यावर मारुती-800 धावली होती. आज ऑटोमोबाईल विश्वात जागतिक पटलावर वाढत चाललेला भारताचा वरचष्मा आणि चारचाकी हे स्वप्न न राहता गरज बनण्यापर्यंतचा प्रवास यामध्ये ओसामु सुझुकी यांचा वाटा मोठा आहे. यंदा लोकगायिका शारदा सिन्हा यांनाही मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ जाहीर झाला आहे. यामुळे कोट्यवधी भोजपुरी भाषिकांना मनस्वी आनंद झाला आहे त्या हयात असताना सन्मान मिळाला असता तर आणखी आनंद द्विगुणित झाला असता. दुसरीकडे गोवा मुक्तीसंग्रामात लढलेल्या लीबिया लोबो सरदेसाई यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी 1955 मध्ये पोर्तुगिज शासकांविरोधात जनतेला एकत्र आणत भूमिगत रेडिओ स्टेशन ‘वोज दा लिबर्ड’ची (स्वातंत्र्याचा आवाज) स्थापना केली होती. त्यांच्या अतुलनीय योगदानाची सरकारने उशीरा का होईना दखल घेतली. एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांनी दिलेला लढा हा देशातील भावी पिढीला प्रेरणादायी राहील, यात शंका नाही. याशिवाय प्रसिद्धीला महत्त्व न देणार्‍या अनेक दिग्गज मंडळींना पद्म सन्मान जाहीर करण्यात आले. आता गोकुलचंद्र डे यांनाच पाहा. पश्चिम बंगालचे 57 वर्षीय ढाकवादक गोकुल चंद्र डे यांना पुरुषसत्ताक असलेल्या ढाक वादनात महिलांचा सहभाग वाढविण्याचे काम केले आहे. त्यांनी महिलांना प्रशिक्षण देत स्त्री-पुरुष भेदभावाची दरी कमी केली. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत पद्मश्री जाहीर करण्यात आली. डे यांनी पारंपरिकरित्या असणार्‍या ढाक वाद्याचे वजनही दीड किलोने कमी करत ढाक वाद्यात नवा आविष्कार आकारास आणला. या यादीमध्ये महिला सशक्तीकरणाच्या पुरस्कर्त्या अमेरिकी वंशाच्या 82 वर्षीय शालिनी होलकर यांचाही समावेश आहे. त्यांनी अस्तंगत होणार्‍या महेश्वरी साडीच्या परंपरेला संजीवनी दिली. पारंपारिक विणकामाच्या तंत्रात सुधारणा करताना मध्य प्रदेशातील महेश्वर येथे हातमागाचे प्रशिक्षण देणारे केंद्र सुरू केले. महेश्वर परंपरेनुसार तयार होणार्‍या साडीच्या निर्मितीला प्रोत्साहन आणि महिलांना सक्षमीकरणाचे प्रयत्न यामुळे त्यांची ‘पद्मश्री’साठी निवड झाली. त्यांनी विणकरांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. यासारखी मंडळी समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचे काम करत आहेत.
विविध कार्यातून आणि कामगिरीतून समाजावर परिणाम करणार्‍या व्यक्तीचा पद्म पुरस्काराने होणारा गौरव हा त्यांच्या कामावर प्रकाश टाकणारा आहे. पद्म सन्मान जाहीर झाल्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्सचे (डी स्कूल) संचालक आणि अर्थतज्ज्ञ प्रोफेसर रामसिंह भावनिक झाले. ते म्हणाले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आज असते तर त्यांना अभिमान वाटला असता. ज्या डी स्कूलचे ते प्राध्यापक होते, तेथील दोन माजी प्राध्यापक के.एल. कृष्णा आणि व्ही. आर. पंचमुखी अणि आणखी एक विद्यार्थी विवेक देबरॉय यांना पद्मश्री जाहीर झाला. देबरॉय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्षही राहिलेले आहेत. ते भारतीय अर्थव्यवस्थेचे सखोल अभ्यासक आणि विश्लेषक म्हणून ओळखले जात होते. शिवाय ते महाभारताचेही गाढे अभ्यासक होते. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचे निधन झाले.
यावर्षीच्या विजेत्यात अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय उद्योजकांमध्ये विनोद धाम यांना देण्यात आलेला पुरस्कारही महत्त्वाचा आहे. विनोद धाम हे भारतीय वंशाचे अमेरिकन संशोधक आणि उद्योजक असून त्यांना पेंटियम प्रोसेसरचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांच्या संशोधनामुळे संगणक उद्योगात मोठी क्रांती घडून आली. इंटेल या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये काम करत असताना त्यांनी प्रोसेसरच्या विकासावर संशोधन केले. विशेषतः पेंटियम प्रोसेसरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. 1993 मध्ये पेंटियम प्रोसेसर बाजारात आला आणि या प्रोसेसरमुळे संगणकांचे वेग, क्षमता आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली.
पद्मभूषणने गौरविण्यात आलेल्या साध्वी ऋतुंबरा यांच्या नावावर काही जणांनी आक्षेप घेतला आहे. परंतु त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ऋतुंबरा यांनी वात्सल्य ग्राम संघटनेची स्थापना केलेली आहे. तेथे अनाथ मुले आणि निराधार मुलांची देखभाल केली जाते. शंभरी गाठलेले साहित्यकार रामदरश मिश्र, दिवंगत गझल गायक पंकज उधास, निर्माते शेखर कपूर, अनंत नाग, भारतीय हॉकीचा आधारस्तंभ पी.आर. श्रीजेश आणि क्रिकेटपटू आर. अश्विन यांना पद्म सन्मान जाहीर झाला आहे.
पद्म पुरस्कार हा केवळ एक सन्मान नसून, देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव आहे. हा पुरस्कार लोकांसाठी प्रेरणादायी ठरत असून समाजसेवा, विज्ञान, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रांमध्ये नवीन कार्य करण्यास लोकांना प्रवृत्त करतो. विशेषतः 2014 पूर्वीच्या दशकभराचा कालखंड पाहिल्यास दिल्लीतील राजकारण्यांवर उपचार करणारे डॉक्टर, राजकारण्यांशी संबंध असलेले पत्रकार, मंत्र्यांचे मित्र आणि नातेवाईक आणि मध्यस्थ यांची या नागरी पुरस्कारांमध्ये भाऊगर्दी असायची. कारण त्यावेळी नागरी पुरस्कार मंत्र्यांच्या किंवा दिल्लीस्थित संपर्क अधिकार्‍यांच्या शिफारशींवर आधारित होते. पण गेल्या दहा वर्षांमध्ये या पुरस्कारांमध्ये राजकीय हित बाजूला सारुन प्रत्यक्ष कार्याची आणि योगदानाची दखल घेऊन प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्यांची निवड केली जात आहे. यंदाच्या पुरस्कारांनाही ही बदलाची परंपरा कायम ठेवली आहे. -डॉ. जयदेवी पवार

Check Also

तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे …