देशात शिक्षण, रोजगार आणि स्पर्धा परीक्षांचे जग आज इतके अस्थिर झाले आहे की, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातून झोप, स्थैर्य आणि भविष्यावरील विश्वास हळूहळू नाहीसा होत चालला आहे. नीट प्रश्नपत्रिका गळतीच्या घटनेने केवळ परीक्षा व्यवस्थेतील त्रुटीच उघड केल्या नाहीत, तर मेहनत, प्रामाणिकपणा आणि संधी यांच्यातील नातेसंबंध किती कमकुवत होत चालले आहेत, हेही स्पष्ट केले. सततच्या स्पर्धा, अपूर्ण झोप, मानसिक थकवा आणि व्यवस्थेवरील कमी होत चाललेला विश्वास यांच्या छायेत आजची तरुण पिढी नेमकी कोणत्या दिशेने जात आहे, याची ना कुणाला फिकीर आहे ना चिंता ! वर त्यांना झुरळं म्हणून संबोधलं जात आहे.
नीट यूजीचा पेपर फुटला. लाखो रुपयांत एकेक प्रश्नपत्रिका विकली गेली. किती जणांनी ती विकत घेतली, याची मोजदाद नाही. गोंधळ झाला आणि परीक्षा रद्द करण्यात आली. आता पुन्हा परीक्षा होणार. दिवसही काय निवडला आहे!!! 21 जून. आंतरराष्ट्रीय योग दिन. चांगलेच आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी तो प्राणायामाइतकाच कठीण ठरणार आहे.
विद्यार्थ्यांनी तरी करायचे काय? त्यांच्यासमोर फक्त परीक्षा, परीक्षा आणि आणखी परीक्षा. प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर शिक्षणव्यवस्थेच्या प्रमुखांनाच काही करता आले नाही, तर इतरांकडून तरी काय अपेक्षा ठेवायची? प्रमुखांची कार्यपद्धती पहा… प्रत्येक गळतीनंतर निवेदन करायचे. शुचितेची हमी मात्र आजही देत नाहीत… किंवा कदाचित देऊच शकत नाहीत?
हमीच्या नावाखाली काय सांगितले जात आहे? पुढच्या वेळेपासून संगणकाधारित परीक्षा होईल. पण यामुळे सर्व काही परिपूर्ण होणार का? मागील काही वर्षांतील एसएससी, क्लॅटसारख्या परीक्षा विसरलो का आपण? या परीक्षांमध्ये संगणक प्रणालीच कोलमडली होती आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. संगणक हा एक मार्ग असू शकतो; पण तो उपायाची हमी ठरू शकत नाही. कारण प्रश्न तंत्रज्ञानाचा नाही, तर नीयत आणि व्यवस्थेचा आहे.
आता नीटही संगणकावर होणार. यावेळी तरी तुम्ही प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनाच पकडले. पण संगणकावर प्रश्नपत्रिका आपोआप तयार होणार आहेत का? देखरेख कोण करणार? माहिती कोणाकडे राहणार? जबाबदारी कोणाची असणार? प्रत्येक केंद्रावर इतके संगणक, अखंड वीजपुरवठा आणि इंटरनेटची व्यवस्था कशी होणार? या प्रश्नांवर कोणतीही स्पष्टता नाही. कोणताही तपशील नाही. पारदर्शकता तर अजिबात नाही. पण प्रश्नपत्रिका फुटवणाऱ्यांसाठी मात्र प्रत्येक भिंत पारदर्शक ठरते. का बरं?
उत्तरं नाहीत. खरी गोष्ट अशी आहे की, जबाबदार पदावर बसलेल्यांनाच आता काही सुचेनासे झाले आहे. सगळे अजूनही प्रयोगपातळीवरच सुरू आहे.
जेन-झीची अवस्था पाहा. रात्रंदिवस तयारी करा. कुणी कोटामध्ये, कुणी सीकरमध्ये, कुणी मुखर्जीनगरमध्ये, तर कुणी एखाद्या प्रसिद्ध ‘सरा’च्या कोचिंगमध्ये. कोचिंग, टेस्ट सिरीज, मॉक परीक्षा, कटऑफ, रँक, निकाल यांच्या चक्रात यंत्रासारखे सुरू राहा. संपूर्ण आयुष्याचे कॅलेंडर परीक्षांमध्ये बदलून टाका. झोपण्यासाठी वेळ कुठे आहे? आणि जर झोपलात, तर मागे पडाल.
झोप आता वैयक्तिक समस्या राहिलेली नाही. ती राष्ट्रीय समस्या बनत चालली आहे. अहवाल सांगतात की देशातील 60 टक्के लोकसंख्या 6 तासांपेक्षाही कमी झोप घेते, तर डॉक्टर 8 तास झोपेचा सल्ला देतात. पण झोपायचे कसे? इथे प्रवेश मिळवण्याची धडपड आहे. प्रवेश मिळाला, तर उत्तीर्ण होण्याची धावपळ. तेही पार केले, तर नोकरीच्या परीक्षांच्या रांगांमध्ये उभे राहा. नोकरी मिळाली, तर ती टिकवण्याची झुंज. या सगळ्यातून मोकळे झाल्यावर मग झोपेचा विचार करायचा?
जे जेन-झीच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचले आहेत, ते तरी कुठे झोपू शकत आहेत? झोपले, तर पोट कसे भरणार? 24 तास डिलिव्हरीचे राष्ट्रीय व्यवसायात रूपांतर झाल्यापासून माणसाचे 8 तासही हिरावले गेले. पैसा कमवायचा की झोप घ्यायची?
हकीम, हुकूमशहा, प्रमुख यांना सोडून द्या. त्यांची झोप पूर्ण आहे. त्यांनी पूर्ण झोप घेतली नाही, तर देश कसा चालणार? ते वेगळे आहेत.
आपली झोप मात्र उडालेली आहे. स्वतःकडे पाहा किंवा इतरांकडे, कुणी ताजेतवाने दिसत नाही. अर्धा ताजेपणा चिंतांनी खाल्ला आहे, तर उरलेला अर्धा त्या चिंता विसरण्याच्या उपायांनी म्हणजे मोबाईलने. झोपण्यासाठी वेळ नाही. वेळ असला, तरी झोप येत नाही. आपण कायम धावत आहोत, कायम थकलेले आहोत, कायम अपूर्ण आहोत. एक विचित्र अस्वस्थता आत भरून राहिली आहे. आपण जगतो कमी आहोत; त्यापेक्षा कसेबसे टिकून राहण्यासाठी धडपडत अधिक आहोत.
अशा वेळी झुरळं आणि पॅरासाईटसारखे शब्द लोकांवर चिकटवले जातात. आपल्या तरुणांना सन्मान, स्थैर्य आणि विश्वास देऊ शकत नाही, म्हणून त्यांना अशी नावं द्यायला सुरुवात होते. पण कुणीतरी हेही सांगावे की, त्यांना असे बनवले कोणी? ते जन्मतःच झुरळं किंवा पॅरासाईट आहेत का? मग त्यांचे करायचे काय? असं म्हटलं जातं की, झुरळं अणुबॉम्बनेही संपत नाहीत. संपणे दूर, ती वाढतच जातात. मग पुढे काय होणार?
मग प्रश्नपत्रिका फोडणारेही झुरळंच आहेत का? की परीक्षा घेणारी प्रमुख संस्था स्वतःच पॅरासाईट बनली आहे?
कोण काय आहे, हे समजणे कठीण झाले आहे.
पुन्हा झोपेच्या विषयाकडे येऊ. एका अहवालानुसार जगात जपानमध्ये लोक सर्वात कमी झोपतात. आपल्यापेक्षाही कमी. पण ते कितीतरी अधिक तंदुरुस्त आहेत. आपल्यापेक्षा जास्त जगतात. आपल्यापेक्षा कितीतरी अधिक काम करतात.
फरक फक्त झोपेच्या तासांचा नाही; तो विश्वासाचा आहे. तिथल्या सामान्य माणसाला प्रत्येक वळणावर ही भीती नसते की त्याची मेहनत एखाद्या प्रश्नपत्रिका गळती, शिफारस किंवा गैरव्यवहारापुढे संपून जाईल किंवा पराभूत होईल. माणूस फक्त विश्र्ांतीमुळे निरोगी राहत नाही; तो विश्वासामुळेही निरोगी राहतो.
आपण तरुणांना एक विचित्र शब्द दिला आहे…‘ॲस्पिरंट’. म्हणजे कायम आकांक्षेमध्ये जगणारा. छान आहे. पण तो कधी त्या ध्येयापर्यंत पोहोचेल की नाही, हे मात्र कुणालाच ठाऊक नाही. ही आकांक्षा आता अंतहीन बनत चालली आहे. परीक्षा तर इतक्या आहेत की, त्या संपतच नाहीत.
म्हणूनच आजचा थकवा फक्त शरीराचा नाही. तो मानसिक आणि नैतिक थकवाही आहे. लोक झोप गमावत आहेत कारण ते खूप काम करतात म्हणून नाही, तर त्यांच्या श्रमांना योग्य परिणाम मिळेल, यावर त्यांचा विश्वास उरलेला नाही.
ज्या समाजात मेहनतीपेक्षा जुगाडावर विश्वास वाढू लागतो, तिथे फक्त पेपर फुटत नाहीत; तिथे भविष्य फुटू लागते. मातीच्या बांधातील भगदाडासारखे. एक बंद केले की दुसरे तयार होते. आता फक्त एवढीच प्रार्थना करायची का की हा बांध पूर्णपणे फुटू नये?- योगेश मिश्र, ज्येष्ठ लेखक-विश्लेषक
Check Also
विपर्यास नको, सहभाग हवा!
होर्मुझची सामुद्रधुनी गेल्या 75 दिवसांपासून बंद असल्याने जगातील एकूण इंधन पुरवठ्यापैकी 20 टक्के पुरवठा ठप्प …
पांचजन्य वृत्तपत्र