लेख-समिक्षण

दीपस्तंभ…

रतनजी टाटा यांच्या निधनाने देशाचा एक तेजस्वी तारा निखळला आहे. आज जगातील पाचव्या क्रमांकावर पोहोचलेल्या भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात आणि रोजगार निर्मितीमध्ये त्यांचे योगदान इतिहास कधीही विसरु शकणार
नाही. आपण आयुष्यात काय करतो, किती पैसा मिळवतो यापेक्षाही दैनंदिन व्यवहारात आपलं आचरण हे नम्रतापूर्ण, शालीनतापूर्ण असलं पाहिजे आणि तीच आपली खरी ताकद आहे. ही खूप मोठी शिकवणूक रतन टाटांसोबतच्या
क्षणांनी मला दिली. महान देशभक्त असण्यासोबतच ते तत्त्वनिष्ठही होते. ते जितके मोठे उद्योगपती होते तितकेच ते एक संवेदनशील सेवाव्रती समाजसेवक होते.
काही व्यक्तिमत्वांचं अलौकिकपण हे कालातीत असतं, तसंच ते इतरांसाठी दीपस्तंभासारखे असतात. देशाचे महान सुपुत्र रतन टाटाजी हे अशाच प्रकारचा सदोदित प्रकाश देणारा दीपस्तंभ होते. त्यांच्या निधनानं एक तेजस्वी तारा निखळला आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ माझे रतन टाटाजींसोबत अतिशय घनिष्ट कौटुंबिक संबंध आहेत. अशा महान व्यक्तीचा साधेपणा, त्यांचा उत्स्फूर्तपणा, त्यांच्यापेक्षा लहान असलेल्यांचाही आदर, हे सगळे गुण मी अगदी जवळून पाहिले आणि अनुभवले आहेत. त्यांच्याकडून मला आयुष्यात खूप काही शिकायला मिळाले. देशातील सर्वात मोठे उद्योगपती असल्याने देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात आणि रोजगार निर्मितीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. महान देशभक्त असण्यासोबतच ते तत्त्वनिष्ठही होते. ते जितके मोठे उद्योगपती होते तितकेच ते एक संवेदनशील सेवाव्रती समाजसेवक होते. त्यांच्या निधनाने भारताने एक आदर्श आणि कष्टाळू मुलगा गमावला आहे.
टाटाजींसोबतच्या स्नेहबंधातील अनेक आठवणींचे पदर आज उलगडताना मनाला प्रचंड वेदना होताहेत. मी महाराष्ट्रात मंत्री असताना मुंबईमध्ये राहायचो. एकदा अपघातामुळे माझ्या पायाला दुखापत झाली होती. मी व्हिलचेअरवर होतो. त्यादरम्यान मला रतन टाटा यांचा दूरध्वनी आला आणि त्यांनी ‘तुम्हाला भेटायला यायचे आहे’ असं सांगितलं. मी सांगितलं की, मी मलबार हिलला राहतो, तुम्ही कधीही या. त्यानुसार रतन टाटा यायला निघाले; पण घराचा पत्ता नीट सापडत नव्हता. त्यांचा पुन्हा फोन आला आणि म्हणाले, नितीन तुझं घर सापडत नाहीये. मी म्हणालो, तुमच्या ड्रायव्हरला फोन द्या मी त्याला समजावून सांगतो. यावर टाटा म्हणाले, नितीन माझ्याकडे ड्रायव्हर नाहीये. मी स्वतःच गाडी चालवतो आहे. ते ऐकून मला मोठं आश्चर्य वाटलं. जागतिक पटलावर स्वतःचा ठसा उमटवणार्‍या एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे ड्रायव्हर कसा नाही, असा विचार मनात आला. पण तो मागे सारुन मी टाटांना घरापर्यंत कसे पोहायचे हे सांगितले.
पुढच्या काळात नवी मुंबईतील एका फ्लायओव्हरच्या उद्घाटनासाठी मी त्यांना निमंत्रण दिले. ते कुलावामध्ये राहायचे. मी म्हणालो की, तुमच्या घराजवळच हेलिपॅड आहे. मुंबईमध्ये ट्रॅफिक खूप असल्याने आपण हेलिकॉप्टरनेच जाऊया, आपला वेळ वाचेल. ठरल्यानुसार मी हेलिकॉप्टरमध्ये बसलो, तेव्हाही ते स्वतःच हेलिकॉप्टर चालवत होते. नंतरच्या काळात छत्रपती संभाजीनगरमध्ये संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवारांच्या नावाने एक मोठे हॉस्पिटल बांधण्यात आले होते. तेव्हा मी राज्य सरकारमध्ये मंत्री होतो. मुकुंदराव पणशीकर या आमच्या प्रांतप्रचारकांची इच्छा होती की त्याचे उद्घाटन रतन टाटांच्या हस्ते व्हावे. त्यांनी आग्रह धरला की, तुम्ही बोलावलेत तर ते नाही म्हणणार नाहीत. त्यानुसार मी टाटांना आमंत्रण दिले. त्यावेळी ते म्हणाले की, नितीन मी माझ्याही फॅक्टरीचे उद्घाटन केलेले नाहीये. मी म्हणालो, ते काहीही असले तरी मी आपला मित्र आहे आणि माझी विनंती आहे की तुम्ही आलंच पाहिजे. त्यानुसार त्यांनी ही विनंती मान्य केली आणि विमानाने ते संभाजीनगरला पोहोचले. विमानातून उतरुन गाडीतून ते कार्यक्रमस्थळी आले. त्यावेळी मी आमच्या सरकारी कर्मचार्‍याला त्यांची ब्रीफकेस आणण्यास सांंगितले. तेव्हाही ते म्हणाले, की नको नको, माझी ब्रिफकेस मीच आणेन. या काही प्रसंगांमधून माझ्या मनावर खोलवर काही गोष्टी रुजल्या.
शेकडो कोटींची धनसंपत्ती, नावलौकिक असूनही वैयक्तिक जीवनव्यवहारात ही व्यक्ती किती नम्र, शालीन, सहजस्वभावी, सहृदयी आहे याचे मला मोठं अप्रूप वाटलं.
सांगण्याचा मुद्दा इतकाच की, आपण आयुष्यात काय करतो, किती पैसा मिळवतो यापेक्षाही दैनंदिन व्यवहारात आपलं आचरण हे नम्रतापूर्ण, शालीनतापूर्ण असलं पाहिजे आणि तीच आपली खरी ताकद आहे. ही खूप मोठी शिकवणूक रतन टाटांसोबतच्या क्षणांनी मला दिली.
दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका भेटीत त्यांनी दिलेली प्रतिक्रिया मला आजही स्मरते आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस-वे हा दूरदृष्टी असलेला प्रकल्प होता. त्यामुळे मी तुमचा चाहता बनलो आहे’ अशा शब्दांत टाटाजींनी माझं कौतुक करतानाच सोबत काम करण्यात उत्सुकता दर्शविली होती. देशाच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधा कशा निर्माण करायच्या याबाबत काही मौलिक सल्लेही दिले. त्यावेळी विदर्भाचा अनुशेष, विकास आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबाबत आमच्यात विस्तृतपणानं चर्चा झाली. या चर्चेअंती त्यांनी विदर्भाच्या विकासासाठी टाटा ट्रस्ट काम करेल, अशी ग्वाही दिली होती. आयुष्यभर प्रामाणिकपणा आणि करुणा ही मूल्यं त्यांनी जपली. आपल्या जीवनप्रवासात अगणित लोकांचं आयुष्य बदललं. आपल्या व्यावसायिक कौशल्यातून त्यांनी देशासाठी समर्पित व्यक्ती कशी असते याचा मूर्तीमंत आदर्श उभा केला. माझ्या आयुष्यात ते सदैव प्रेरणादायी राहतील. -नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री

Check Also

बच्चू कडू यांची ‌‘प्रहार‌’ इतिहासजमा

विधानपरिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती …