लेख-समिक्षण

जगज्जेतेपदाचा शंखनाद

क्रिकेटच्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. या बहुचर्चित स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने उल्लेखनीय कामगिरी करत अनेकदा आपली छाप उमटवली आहे. 2002 मध्ये संयुक्त विजेतेपद पटकावल्यानंतर 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले आणि धोनी हा सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला कर्णधार ठरला. आता भारताने सलग तिसर्‍यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा हा पहिलाच संघ आहे. 2024 च्या टी- 20 विश्वचषकात विजय मिळवलेल्या टीम इंडियाला सलग दुसरी आयसीसी स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. दुबईच्या खेळपट्टीवर भारताने चार सामने खेळले आहेत; तर प्रतिस्पर्धी न्यूझीलंडचा संघ या खेळपट्टीसाठी नवखा आहे. याचा पुरेपूर लाभ टीम इंडिया उठवणार का हे पहावे लागेल.
दोन महिन्यांपूर्वी सलग पत्कराव्या लागणार्‍या पराभवांमुळे भारतीय क्रिकेट संघ सर्वस्तरीय टीकेचा धनी बनला होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली या टीम इंडियाच्या भक्कम आधारांवर समालोचक, चाहते, समीक्षक, प्रशंसक अशा सर्व मंडळींनी भरपूर टीका केली होती. पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जोरदार कमबॅक करत आणि दमदार यश मिळवत अंतिम फेरी गाठत भारतीय क्रिकेटपटूंनी या सर्व टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. चार मार्च रोजी खेळला गेलेला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना भारतीय क्रिकेट संघाने ज्या तडफदारपणाने जिंकला, त्याला खरोखरीच तोड नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू हे अत्यंत प्रोफेशनल म्हणून ओळखले जातात. रणझुंजारपणा आणि चिवटपणा ही दोन बलस्थाने ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये ठळकपणाने पहायला मिळतात. त्यामुळे उपांत्य फेरीमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियापुढे टिकाव लागणार का अशा शंका उपस्थित केल्या गेल्या; परंतु सातत्याने आयसीसी ट्रॉफीच्या आड येणार्‍या कांगारुना चार विकेट राखून दारुण पराभूत केले. या विजयाने चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम फेरीतील स्थान तर भक्कम झालेच; पण 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा वचपाही टीम इंडियाने काढला.
क्रिकेटच्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. या बहुचर्चित स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने उल्लेखनीय कामगिरी करत अनेकदा आपली छाप उमटवली आहे. 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे इंग्लंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताने अपराजित राहून अंतिम फेरी गाठली. बर्मिंगहॅम येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करत विजेतेपद पटकावले. हा सामना पावसामुळे 20 षटकांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला होता; पण त्यात भारतीय संघाने उत्कृष्ट खेळ करत बाजी मारली आणि धोनी हा सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला कर्णधार ठरला.
यंदाच्या स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारत भारताने इतिहास रचला आहे. कारण भारताने आता सलग तिसर्‍यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा भारत हा पहिलाच संघ आहे. आता भारत हा सलग चार आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. यामध्ये 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, 2023 क्रिकेट विश्वचषक, 2024 टी 20 विश्वचषक आणि आता 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. यामुळेच रोहित शर्मा हा सर्व प्रकारच्या प्रमुख आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला कर्णधार ठरला आहे. याआधी कोणत्याही संघाने सलग दोनहून अधिक आयसीसी अंतिम सामने खेळले नव्हते; परंतु भारताने हा विक्रम मोडला आहे.
भारत हा पाच वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजने 1998, 2004 आणि 2006 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी ही भारतासाठी एकूण 14 वी आयसीसी स्पर्धेची अंतिम फेरी असणार आहे. यामध्ये चार वेळा क्रिकेट विश्वचषक, तीन वेळा टी 20 विश्वचषक, दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि पाच वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यांचा समावेश आहे. आता 2024 च्या टी- 20 विश्वचषकात विजय मिळवलेल्या टीम इंडियाला सलग दुसरी आयसीसी स्पर्धा जिंकण्याची संधी आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीवर त्याच्या खराब फॉर्ममुळे जोरदार टीका होत होती. पण या स्पर्धेत विराट हा भारतासाठी आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 4 डावात 217 धावा केल्या असून त्यात एका शतकाचा आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीने टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता; पण मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजी फळीत जोरदार आघाडी घेतली आहे. आतापर्यंत शमीने 8 विकेट्स घेतल्या असून टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.
न्यूझीलंडविरुद्ध होणारा अंतिम सामना दुबईच्या मैदानावर खेळला जाणार आहे. दुबईच्या खेळपट्टीवर आतापर्यंत फिरकी गोलंदाजांनी कहर केला आहे. मागील दोन सामन्यांमध्ये भारताच्या गोलंदाजांनी एकूण 20 विकेट घेतल्या असून त्यापैकी 14 विकेट भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या आहेत. विशेषत: वरूण चक्रवर्तीला चांगला सूर गवसला आहे. त्यामुळे कोणत्याही संघाचा भारतीय फिरकीपटूंसमोर टिकाव लागणे अशक्य दिसते आहे. टीम इंडियाला बर्‍याच दिवसांपासून चौथ्या फळीतील एका चांगल्या फलंदाजाची उणीव भासत होती; पण चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये या क्रमाने खेळणार्‍या श्रेयस अय्यरने 4 डावात 195 धावा केल्या आहेत. मधल्या फळीत फलंदाजीत सातत्याने योगदान देत तो भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड बनला आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडची गोलंदाजी आक्रमक आणि विविधतेने भरलेली आहे. मॅट हेन्री याने भारताविरुद्धच्या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या, ज्यामुळे त्यांची गोलंदाजीची ताकद दिसून येते. याखेरीज न्यूझीलंडच्या संघात केन विल्यमसन यांसारखे अनुभवी फलंदाज संघात आहेत. केनने भारताविरुद्ध 81 धावा केल्या होत्या. याखेरीज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावणारा रवींद्र रचीन भारतीय गोलंदाजांसाठी आव्हान बनला आहे. भारतीय वंशाच्या या लेफ्टीने आतापर्यंत मेगा इव्हेंटमध्ये दोन शतके झळकावली आहेत. त्याने खेळलेल्या एकूण 3 सामन्यांमध्ये दोन शतकांसह 75.33 च्या सरासरीने 226 धावा केल्या. बेन डकेट (227) नंतर सर्वाधिक धावा करणारा रचिन दुसर्‍या क्रमांकावर आहे. गोलंदाजीचा विचार करता अलीकडच्या काही महिन्यांत न्यूझीलंडचा मिचेल सँटनर भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. सँटनरविरुद्ध धावा काढणे फलंदाजांना खूप कठीण ठरताना दिसले आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीदरम्यान टिकून राहताना भारतीय फलंदाजांचा कस लागेल. या लेफ्टीने चार सामन्यांत 7 विकेट्स घेतल्या आहेत. ऑफस्पिनर ब्रेसवेलनेही चार सामन्यात सहा विकेट घेत सँटनरला साथ दिली आहे. अशा परिस्थितीत या दोन गोलंदाजांची 20 षटके भारतीय फलंदाजांसाठी महत्त्वाची राहतील. माजी कर्णधार विल्यमसन साखळी सामन्यांमध्ये फारसा खेळला नाही, पण त्याने जेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य फेरीत शतक झळकावून योग्य वेळी आपला फॉर्म परत मिळवला. विल्यमसन विजेतेपदाच्या लढतीत किती धोकादायक असू शकतो, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्याला तंबूत पाठवण्यासाठी भारतीय गोलंदाजांना ‘विशेष योजना’ तयार करावी लागणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना 2000 साली झाला होता, ज्यामध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला होता. आता 25 वर्षांनंतर हा हिशेब भारतीय संघ चुकता करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. -नितीन कुलकर्णी,क्रीडाक्षेत्राचे अभ्यासक

Check Also

तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे …