महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले. यात अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काही नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली. भाजपचाच विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. एकप्रकारे या नेत्यांचे राजकीय वजन कमी करण्याचाच प्रयत्न केला आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनातील एका भाषणात अजित पवार गिरीश महाजनांना उद्देशून म्हणाले होते की, गिरीश आता तरी सुधर रे, कट होता होता वाचलास अशी टोलेबाजी केली होती. ती आता खरी ठरल्याचे दिसत आहे. या खातेवाटपाचे वैशिष्ट्य म्हटले तर ज्यांना मंत्रिपदाचा फारसा अनुभव नाही अशा आमदारांना मोठी खाती दिली आहेत. काही माजी मंत्र्यांची जुनीच खाती त्यांच्याकडे कायम ठेवली आहेत. तर काही माजी मंत्र्यांची राजकीय ताकद कमी करण्याचाही प्रयत्न झाला आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांना धक्का बसल्याचे दिसत आहे. 2014 मधील युती सरकारच्या काळात पंकजा मुंडे महिला व बालविकास खात्याच्या मंत्री होत्या. परंतु, नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे खाते अदिती तटकरे यांना मिळाले होते. पुढील महायुती सरकारच्या काळातही तटकरे यांच्याकडेच हे खाते होते. त्यामुळे आताच्या सरकारमध्ये अदिती तटकरे यांनाच पुन्हा हे खाते मिळाले. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना मात्र पशुसंवर्धन खाते मिळाले आहे. शिंदे सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल खात्याचे मंत्री होते. यंदाही हे खाते विखे पाटील यांनाच मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, यंदा भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाती महसूलच्या चाव्या दिल्या. तर विखे पाटील यांना जलसंपदा खाते देण्यात आले तेही विभागून. तसेच त्यांच्याकडील आधीची दोन खातीही काढून घेण्यात आली आहेत. आता विखे पाटील यांच्याकडे गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचा कारभार असेल. भाजपच्या मुख्यमंत्री पदाला उघडउघड पाठिंबा देणार्या अजित पवार यांच्यावर भाजप नेतृत्व बरेच खूश असल्याचे दिसत आहे. कारण खाते वाटपामध्ये शिंदेंच्या बरोबरीनेच अत्यंत महत्त्वाची खाती ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहेत. भाजपने गृह आणि महसूल ही महत्त्वाची खातीही स्वत:कडे घेतली आहेत. पण असे असले तरी अर्थ, उत्पादन शुल्क, कृषी, सहकार आणि महिला व बालकल्याण ही अत्यंत महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या बरोबरीचीच वजनदार खाती ही अजितदादांना मिळाली आहेत. अर्थ आणि उत्पादन शुल्क ही अत्यंत महत्त्वाची खाती स्वत: अजित पवार यांनी आपल्याकडे ठेवली आहेत. दरम्यान, या मंत्रिमंडळ वाटपावर नजर टाकल्यास भाजपने समतोल राखला आहे. तसेच अजित पवार यांना मंत्रिमंडळाच्या खाते वाटपात काही प्रमाणात झुकते माप दिल्याचेही दिसत आहे.– प्रसाद पाटील
Check Also
नवीन टास्क फोर्सने काय साधणार?
भारतातील शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा व्यवस्था सध्या एका अत्यंत संवेदनशील वळणावर उभी आहे. देशातील लाखो …
पांचजन्य वृत्तपत्र