लेख-समिक्षण

एकांताची सावली!

निसर्गात शोधतांना झाडांमधले ॠतूमानाप्रमाणे होणारे बदल अगदी सूक्ष्म असतात. पर्वत शिखरांवर सुखद एकांत असतो. ते कधी केविलवाणे, बापुडवाणे दिसत नाहीत. कारण त्यांना एकाकीपणाची भिती वाटत नाही. ते स्वत:त मग्न असतात. सोबतीची अपेक्षा नसते. आपणही निसर्गाचा एक भाग आहेात. अधिक प्रगत, अधिक सजग. विचार करण्याची शक्ती असलेली आहोत. एकटे आहोत असं न मानता स्वत:ची सोबत स्वत:ला करावी.
कसा असतो एकांत शांत हवाहवासा! आत्मानंदी लीन होणारा! एकाकी एकटेपणा. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी एकांतात साधना करायचे. विजनवासी व्हायचे. लौकिकबाह्य जगाशी संबंध सोडून एकांतात जायचे. आपणही पाहतो, निसर्गात जिथे उंची आहेे तिथे एकांत असतो. प्रवासात ट्रेनच्या खिडक्यांमधून डोंगररांगा निरखत जातो तेव्हा असं वाटतं किती युगं लोटली हे पर्वत स्तब्ध आहेत… एकांतात मौनात आहेत ! किती इतिहास यांनी पाहिला असेल? किती दशकं, सहस्त्रकं यांनी निरखली असतील?… ते बोलू लागले तर? पण आजतागायत पर्वत बोलले, नद्या बोलल्या, जंगलं बोललीत असं एैकिवात नाही. कदाचित त्यांचं मौन हीच त्याची भाषा असेल.
ॠतुगणिक बदलणारी त्यावरील आवरणं ही त्यांची देहबोली त्यातून हे बोलत असतील का? त्यांची भाषा समजावून घेण्यास आपण तर कमी पडत नाही ना? त्यांच्याशी संवाद साधायला? ध्यानधारणेत एकांताला फार मोलाचे स्थान आहे. तुम्ही मौनस्त रहा, तुमच्या प्राणशक्तीत वाढ होते. तुमच्या वाणीला देवत्वाचा स्पर्श होऊन ती खरेपणाच्या कसोटीवर उतरते. ध्यानधारणेसाठी एकांताची आवश्यकता असते असं म्हणता येईल की एकांत ध्यानधारणेतील एव्हरेस्ट शिखर आहे? अत्युच्च उत्कट बिंदू गाठण्यासाठी प्रचंड मेहनत, शारीरिक कष्ट याची गरज नव्हे तर निकड असते. एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणं सहजी सोपं नाही; महत्प्रयासानं ते गाठता येतं. तसं काहीसं एकांताचं आहे. एकांत हा तुमच्यात असतो. पण सहसा तो सापडत नाही. बाह्य कोलाहलापेक्षा अंतर्गत कोलाहल, शातंवला की झालं तो मिळतो. पण आतंरिक कोलाहल, विचारांची धुमश्चक्री, भल्याबुर्‍या कल्पना हे सारं मनाआड टाकणं आणि मन शातंवत त्याला एकांतात नेणं ही एव्हरेस्ट शिखर सर करण्याइतकं कठीण आहेेेेे.
मुख्य अडचण हीच आहे की, आपण एकाकीपणाला घाबरतो. एकटं राहायला पाहत नाही. सतत कोणाची तरी सोबत शोधत असतो. या सोबतीच्या हव्यासासाठी बरेचदा अतिनुकसान सोसतो. निरनिराळी नाती, मैत्री शोधतो. समाजात संस्था स्थापन करतो. अनेक उचापत्या करतो. येनकेनप्रकारे आपण आपला एकाकीपणा, एकटेपणा घालविण्याच्या प्रयत्नात असतो. अशा वेळी इतर जण आपल्याला ‘व्वा,काय सोशल व्यक्तिमत्व आहे’ अशा प्रकारे वाखाणतात. आतली गोम काही निराळीच असते.
वर सांगितल्याप्रमाणे मनाच्या मुळाशी एकटेपणाची भिती असते. अशी कितीतरी माणसं आपल्या भोवताली आजूबाजूला आपण बघतो की जी स्वत:शी बोलतात, मोठमोठ्यांदा गाणी म्हणतात, ते स्वत:चा एकटेपणा विसरण्याचा प्रयत्त्न करतात. हीच मानसिकता टाळण्यासाठी आपण इतरांना जवळ करतो. अनेक नाती निर्माण करतो. गंमत अशी की, जशी आपली गरज असते तसेच समोरच्याची पण मानसिकता आणि गरज असते. मग नात्याचे आणि मैत्रीचे बंध तयार होतात. त्याला प्रेम असे म्हणले जाते. ती पण एक फसगतच असते. बरेचदा त्यात प्रेमाचा लवलेश नसून एकाकीपणा दुर करण्याचा केविलवाणा प्रयत्न असतो. स्वत:पासून दूर पळत जाऊन दुसर्‍या कोणाचा आधार घेत राहतो. पण तिथेही निराशा असते. कारण समोरचादेखील आपला एकाकीपणा दूर करण्यासाठी आलेला असतो. या नात्यातील फोलत्व लक्षात येत तेव्हा पाणी डोक्यावरून गेलेले असते.
तुमचा एकाकीपणा हा सावलीसारखा असतो. दिवसाच्या प्रकाशात आपली सावली आपल्याला दिसत नाही; पण ती 24 तास बिलगुन असते. जशी सावली सुटत नाही तसा एकाकीपणा सुटत नाही. कितीही नात्याचे रेशीमबंध बांधले तरी ते तुमची साथ सोडून जातातच. शेवटी स्वत:जवळ आपल्याला परतावं लागतं, हे ज्याक्षणी ध्यानात येईल तो क्षण सौख्याचा… एकाकी एकटेपणापासून सुख:द एकांतात प्रवेशण्याचा… एकांत आता एकटेपणा सोडून सुखाच्या शोधासाठी सज्ज झाला. स्वत:पासून दूर पळण्यापेक्षा डोळे मिटून स्वत:त डोकवा. आत संपूर्ण शांती आणि सुखद एकांत मिळेल. काळीभोर रात्र संपून पहाटेची सोनेरी किरणं दिसतील. एकटेपणा हा आपला स्वभावधर्म आहे. जन्मतो तो एकटा, मरतानाही एकटाच असतो. मग अशा वेळी एकटेपणाची भीती का बाळगायची?
एकटं आणि एकाकी यात फरक आहे. आपण स्वत:साठी पुरेसे आहोत असे समजूया. सर्जनशील बना. आनंदाने गाणी गा. स्वत:साठी वेळ काढा. आतापर्यंत निरनिराळया नात्यांमध्ये स्वत:ला जे जखडून टाकलेलं आहे ते मुक्त करा. असं झालं तर तुमची जुन्या दुख:द आठवणीतून सुटका होईल. झाडावरच्या वाळक्या गळणार्‍या पानांप्रमाणे त्या तुमच्यातून कधी गळून गेल्या हेही कधी कळणार नाही. एकटेपणात कणखरता आहे ती स्विकारा पुढे चला. आयुष्य सुखाचे होईल. स्वत:ची मानसिक शक्ती स्वत:वर खर्च करून सुखद एकांताचे अनिभिषिक्त राजे बना. आपल्या सुखद एकांताच्या अनुभवाने समृध्द बना. शेवटी प्रत्येक घटना, गोष्ट परिवर्तनीय आहे. आज आहे ते उद्या राहणार नाही हे सत्य स्विकारा. याचा अर्थ असा नाही की समाजात मिसळू नये; तर स्वत:शी रमणारी राहणारी व्यक्ती समाजात उत्कटपणे मिसळते, आपले जीवन समाजाभिमुख करते; कारण ती चारचौघात जरी असली, हसत बोलत असली तरी ती स्वत:मध्ये मग्न असते. सुखद एकांताच्या अत्युच्च शिखरावर विराजमान असते.

Check Also

लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत

लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …