लेख-समिक्षण

आता हापूसवरही दावा

महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि इतर उपक्रम इतर राज्यांमध्ये विशेषतः गुजरातमध्ये वळवण्याबाबत नेहमीच आरोप केले जात असतानाच, आता महाराष्ट्राची शान असलेल्या हापूस आंब्याबाबतही अशीच काही कारस्थाने होताना दिसत आहेत. गुजरात सरकारने हापूस आंब्यावर दावा करत वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. हापूस हा शब्द फक्त महाराष्ट्रातील कोकणात तयार होणाऱ्या आंब्यासाठीच वापरला जातो, असे असताना गुजरात येथील कृषी विद्यापीठांनी हापूस आंब्याची नवी जात तयार करून त्याला वलसाड हापूस असे नाव देऊन त्यासाठी भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. मुळात कोकणातील हापूस आंब्याला 2018 मध्येच मानांकन मिळाले होते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कोकण हापूसला हे मानांकन देण्यात आले होते. साहजिकच इतर प्रदेशात तयार झालेल्या किंवा इतर राज्यातून महाराष्ट्रात विक्रीसाठी येणाऱ्या कोणत्याही आंब्याला हापूस हे कायदेशीर नाव देता येत नाही. असे असतानाही गुजरातमधील या संस्थांनी विकसित केलेल्या आंब्याच्या नावामध्ये हापूस हे विशेषण वापरणे योग्य नाही हे त्यांना कुणीतरी समजून सांगण्याची गरज आहे. पूर्वीही अनेक राज्यांमध्ये निर्माण झालेल्या आंब्याला हापूस नाव जेव्हा देण्यात आले होते तेव्हा कोकणातील उत्पादकांनी कायदेशीर पद्धतीने आक्षेप घेतल्यानंतर हापूस हे नाव काढण्यात आले होते आणि फक्त आंबा हा शब्द वापरण्यात आला होता.
महाराष्ट्राची आणि कोकणची शान आणि ओळख असलेल्या हापूस या नावावर इतर कोण दावा करत असेल तर त्याला तीव्र आक्षेप घ्यायलाच हवा. आंबा हे फळ सीजनल असल्याने ठराविक कालावधीमध्येच या फळाचा हंगाम असतो आणि या कालावधीमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. त्यामध्येही हापूस आंब्याला सर्वाधिक मागणी असते आणि हाच आंबा सर्वात जास्त निर्यातही केला जातो. साहजिकच आंब्याच्या बाजारपेठेत हापूस या शब्दालाच जास्त महत्त्व असल्याने सर्वांनाच त्या शब्दाविषयी प्रेम आहे. त्यातूनच आंब्याच्या मार्केटमध्ये आपलाही शेअर निर्माण करण्याच्या उद्देशाने आपल्या आंब्यामध्येसुद्धा हापूस हे नाव असावे असाच उद्देश या घडामोडीमागे दिसतो. हापूस आंबा हा महाराष्ट्राचा आणि कोकणाचा आहे, याबाबत कोणतीही शंका असायचे कारण नाही. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर जिल्ह्यातील किनारपट्टीच्या आसपास प्रदेशात जो हापूस आंबा तयार होतो त्याची चव जगातील कुठल्याच आंब्याला नसते हे उघड आहे. कोकणातील आंबा उत्पादकांनी यापूर्वीच्या लढ्यांप्रमाणेच वलसाड हापूसलासुद्धा आव्हान देण्याची तयारी केली असली, तरी सरकारनेसुद्धा या संघटनांच्या पाठीशी उभे राहायला हवे. – – राधिका बिवलकर

Check Also

दिलासादायक माघार

केंद्र सरकारने बहुचर्चित ‌‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026‌’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …