लेख-समिक्षण

आघाडीची कसोटी

लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीने अचूक रणनिती आखल्याने चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले. आघाडीचा प्रमुख उद्देश हा भाजपशी थेट सामना करणे आणि भाजपच्या विरोधातील मतांची फाटाफूट होणार नाही याची खबरदारी घेणे हा होता. आघाडीने वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवले आणि म्हणूनच त्यांना चांगल्या जागा मिळवत्या आल्या. पण काँग्रेसच्या हरियानातील पराभवाने ‘महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्थिती पालटली आहे. कमकुवत काँग्रेस पक्ष घटक पक्षांसमवेत जागा वाटपात आघाडी घेऊ शकणार नाही. म्हणून यावर काँग्रेसने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कारण विरोधक आणखी झटके सहन करू शकणार नाहीत. भाजपशी थेट लढाई असणार्‍या जागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत करायला हवे.
महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून साधारण एक महिन्याभराने मतदानाची प्रक्रिया पार पडून निकालही लागलेला असणार आहे. एक डिसेंबरपर्यंत दोन्ही राज्यांत नव्याने सरकार स्थापन होईल. तोपर्यंत दोन्ही राज्यांतील राजकारण प्रचंड प्रमाणात ढवळून निघेल. यावर्षीच्या प्रारंभी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने ‘इंडिया’ आघाडीला आलेले उधाण दोन-तीन महिन्यांतच हरियाना विधानसभेच्या निकालाने जमीनीवर आले. परिणामी या निकालापासून धडा घेत काँग्रेसला दोन्ही राज्यांत विशेषत: महाराष्ट्रात सावधगिरीने पावले टाकावी लागणार आहेत. यादृष्टीने कॉग्रेसने महाराष्ट्रात विभागनिहाय निवडणूक निरीक्षक नेमून राज्यात अंतर्गत कलह निर्माण होणार नाही आणि घटक पक्षांशी सामजंस्य राहील यासाठी पावले टाकली. पण ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या राजकीय महत्त्वकांक्षेचा काँग्रेस सामना कसा करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
आजमितीला काँग्रेसला ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. कारण अलिकडेच पार पडलेल्या हरियाना विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. राज्यात सत्ताविरोधी लाट असतानाही भाजप तिसर्‍यांदा हरियानात विराजमान झाले. बहुतांश एक्झिट पोलने काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे भाकित केले होते. परंतु भाजपने 90 पैकी 48 जागा जिंकल्या आणि विशेष म्हणजे या विजयाने भाजपही भारावून गेले आहे. काँग्रेसने हरियानात विजय मिळवला असता तर एकप्रकारे संजीवनी मिळाली असती. अर्थात काँग्रेसमधील अशा अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाने पाचवी विधानसभा निवडणुक गमावली. यापूर्वी पंजाब, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. म्हणून ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष भाजपच्या विरोधातील लढाईत काँग्रेसला साथ देतील की नाही, हा खरा प्रश्न आहे.
हरियाना निवडणुकीत ‘आप’ आघाडीसह विजय मिळवणे हे काँग्रेसला फायदेशीर राहिले असते की नाही, यावर सध्या चर्चा केली जात आहे. दुसरे म्हणजे या पराभवाचा परिणाम महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीवर होणार आहे. हरियानातील निकालाचा लगेचच परिणाम दिल्ली, महाराष्ट्र आणि झारखंडच्या जागावाटपावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसरे म्हणजे काँग्रेस आणि ‘आप’ यांची राजधानीत आघाडी होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. कारण ‘आप’ ने अगोदरच स्वबळाचा नारा दिला आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीने अचूक रणनिती आखल्याने चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले. आघाडीचा प्रमुख उद्देश हा भाजपशी थेट सामना करणे आणि भाजपच्या विरोधातील मतांची फाटाफूट होणार नाही याची खबरदारी घेणे हा होता. आघाडीने वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवले आणि म्हणूनच त्यांना चांगल्या जागा मिळवत्या आल्या. त्यांनी भाजपला पराभूत करण्याचा एककल्ली कार्यक्रम राबविला आणि त्यात ते काही अंशी यशस्वी राहिले. भाजपचा बहुमताचा आकडा कमी झाला आणि शेवटी जेडीयू आणि तेलगु देसमच्या मदतीने केंद्रात सरकार स्थापन करावे लागले. पण आता काँग्रेसच्या हरियानातील पराभवाने ‘इंडिया’ आघाडीच्या स्थितीत बदल झाला आहे. आघाडीतील काँग्रेसचा प्रभाव कमी झाला असून अन्य पक्षांना पुढे चाल मिळाली आहे. तरीही घटक पक्षाचे नेते आता संयमाची भूमिका ठेवत आणि विचारपूर्वक निर्णय घेत काँग्रेसला साथ देतील, अशी अपेक्षा आहे. कारण आतापयत एकाही पक्षाने ‘इंडिया’ आघाडीचे अस्तित्व संपल्याचे सांगितलेले नाही. याउलट हरियानाच्या निकालानंतर दुसर्‍या दिवशी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सपची कांग्रेसमवेत आघाडी कायम राहिल, असे संकेत दिले. ते म्हणाले, ‘मला वाटते की इंडिया आघाडी कायम राहावी. उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपची युती टिकेल.’
महाराष्ट्रात सध्या काँग्रेस पक्ष, शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. ताज्या माहितीनुसार, महाराष्ट्र विकास आघाडीतील पक्षांत 210 च्या आसपास जागांवर चर्चा पूर्ण झाली आहे. काँग्रेसला जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि निवडणुकीच्या अगोदर ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून समोर आणण्याची शिवसेनेकडून होणार्‍या मागणीबाबत गांभीर्याने विचार करावा लागेल. ‘आप’ने हरियानात एकही जागा जिंकली नाही. मात्र या पक्षाला 1.78 टक्के मते मिळाली. काँग्रसने ‘आप’शी आघाडी केली असती तर नक्कीच ‘इंडिया’ आघाडीच्या यशात भर पडली असती. पण काँग्रेसचे डावपेच चुकले. खासदार संजय राऊत यांच्या मते, काँग्रेस पक्षाने लहान पक्षांकडून दिल्या जाणार्‍या सहकार्याच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हरियानात पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. तृणमूल काँग्रेस, ‘आप’, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, राजद, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अन्य पक्षांच्या नेत्यांनी हरियाना निवडणुकीत ढिसाळ नियोजनाबाबत काँग्रेसवर टीका केली. ‘सामना’ वृत्तपत्रातील संपादकीयमध्ये म्हटल्यानुसार, हरियानात भाजपचे पुन्हा सरकार येईल, याचा कोणीही विचार केला नव्हता. पण अतिआत्मविश्वास आणि स्थानिक नेत्यांचा अहकारांमुळे काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. म्हणून आता लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात मान्य केलेला फॉर्म्युला पुन्हा अमलात आणणे गरजेचे आहे. किमान महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये असेच होईल. आजमितीला कमकुवत काँग्रेस पक्ष हा आपल्या बहुतांश घटक पक्षांसमवेत जागा वाटपात आघाडी घेऊ शकणार नाही. म्हणून सध्याच्या स्थितीवर काँग्रेसने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कारण विरोधक आणखी झटके सहन करू शकणार नाहीत. भाजपशी थेट लढाई असणार्‍या जागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत करायला हवे. 2024 च्या निवडणुकीत भाजपविरोधातील काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा 2019 च्या तुलनेत 8 टक्क्यांनी वाढत तो 29 टक्के झाला. अर्थात काँग्रेसने भाजपशी 286 जागांवर लढाई केली आणि 2014 च्या 370 जागांच्या तुलनेत ती कमीच आहे. काँग्रेस 2004 आणि 2009 मध्ये घटक पक्षातील सौहार्दपूर्ण संबधांमुळे सत्तेत आली. म्हणून ‘इंडिया’ आघाडी कायम राखण्याची जबाबदारी काँग्रेसवर आहे. प्रत्येक साथीदार मग तो लहान असो वा मोठा तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे. काँग्रेसने आत्मपरीक्षण केले आहे. पंचमढी आणि सिमला हे त्याचे चांगले उदाहरण आहे. आता आणखी एका अशाच स्वरुपाच्या तिसर्‍या सत्राची वेळ आली आहे.-कल्याणी शंकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक

Check Also

तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे …