शिक्षणाबरोबरच नोकरी करण्याचे कौशल्य सर्वानाच जमते असे नाही. नोकरी आणि अभ्यास याचा ताळमेळ साधनाता अनेकांचा गोंधळ उडतो. परंतु या दोन्ही बाबी करणे शक्य आहेत. नोकरी आणि शिक्षण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्या योग्य रितीने हाताळू शकतो. बहुतांशी विद्यार्थी विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना अर्धवेळ नोकरीसाठी प्राधान्य देतात. याचा पहिला फायदा असा की आपले अर्थाजन सुरू होते. अर्धवेळ नोकरी करून आपण पालकांच्या खर्चातील काही भार आपण उचलू शकतो. पैसे कमावत असल्याने स्वावलंबीपणा येता. बचतीची देखील सवय लागते.
अर्धवेळ जॉब सुरू केल्याने कामाच्या अनुभवात वाढ होते. लहानसहान गोष्टीतून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. हा अनुभव जेव्हा मोठा जॉब करू तेव्हा तो उपयोगी पडतो. तांत्रिक बारकावे लवकर समजतात.
आपल्या कौशल्यात संघटनकौशल्य वाढीस लागते. एकाचवेळी अनेक प्रकारच्या जबाबदारी पार पाडण्याचे कौशल्यही विकसित होते. कामाचे आणि वेळेचे नियोजन करण्याची क्षमताही वृद्धींगत होते.
कॉलेजजीवनात नोकरी करण्याचे अनेक फायदे दिसत असले तरी त्याचे तोटेही पाहणे गरजेचे आहे. पहिले म्हणजे, अभ्यासापेक्षा आपले नोकरीवर अधिक लक्ष केंद्रित होते. आपण ध्येयापासून परावृत्त होतो आणि अर्धवेळ नोकरीतच अधिक काळ गुंतून राहतो. पैसा मिळत असल्याने नोकरीकडेच अधिक लक्ष दिले जाते. तसेच अभ्यासाबरोबरच नोकरी करत असल्याने आरामाला पुरेसा वेळ मिळत नाही. अभ्यास आणि नोकरीत व्यस्त राहिल्याने स्वत:कडे, कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. वेळ मिळत नसल्याने कामात चालढकलपणा वाढतो. कालांतराने श्रम वाढल्याने आपण कॉलेजला जाणे टाळतो. अभ्यासाच्या वेळेत थकवा येत असल्याने नाविलाजाने विश्रांती घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो. ही बाब आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. शरिराला पुरेसा आराम किंवा विश्रांती न मिळाल्यास अनेक आजाराला सामोरे जाण्याची शक्यता बळावते.
याचा सारांश असा की, नोकरी आणि अभ्यास करताना काम अचूक होईलच याची खात्री देता येत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाला कॉलेजला जावून नोकरी करणे शक्य नाही. परंतु एखादा स्वावलंबी, कार्यतत्पर युवक दोन्ही गोष्टी साध्य करू शकतो. तसेच एखादा गरजू विद्यार्थीदेखील अभ्यास करून नोकरीला प्राधान्य देतो. परंतु चांगल्या गुणवत्तेने पदवी किंवा पदविका मिळवून नोकरी मिळवणे हेही तितकेच महत्वाचे ठरते. अभ्यासाची सवय मोडली की या गोष्टी साध्य करणे अवघड ठरतात.
Check Also
लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत
लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …
पांचजन्य वृत्तपत्र