तरुणपणी मेंदू तीक्ष्ण असतो, असे म्हटले जाते. तसेच ’साठी आणि बुद्धी नाठी’ अशीही एक म्हण आपल्याकडे आहे; पण हे काही खरे नाही! आजवर आपण सतत ऐकत आलो आहोत की, वेगाने शिकण्याची आणि विचार करण्याची क्षमता फक्त तारुण्यापर्यंतच मर्यादित असते आणि जसजसे वय वाढते, तसतशी आपली बुद्धी कमकुवत होऊ लागते. परंतु, आता विज्ञानाच्या दुनियेतून या विचाराला एक धक्का देणारा ’यूटर्न’ मिळाला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या ताज्या अभ्यासाने या जुन्या समजुतीला पूर्णपणे बदलून टाकले आहे. या अभ्यासाचा निष्कर्ष आश्चर्यकारक आहे: तुमचा मेंदू 25 वर्षांच्या नाही, तर 55 ते 60 वर्षांच्या दरम्यान आपल्या सर्वोत्तम कार्यक्षमतेवर पोहोचतो.
’जर्नल इंटेलिजन्स’ मध्ये प्रकाशित झालेल्या या नवीन संशोधनानुसार, जसजसे आपले वय वाढते, तसतसे आपला मेंदू केवळ अनुभव गोळा करत नाही, तर तो त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेतो आणि योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांचा वापर करतो. तरुण लोकांमध्ये त्वरित प्रतिक्रिया देण्याची क्षमता असली, तरी 40-50 वर्षांनंतर विचार करण्याची पद्धत अधिक शांत, समजूतदार आणि अचूक होते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, शरीराची सर्वात जास्त ताकद 25 ते 35 वर्षांच्या दरम्यान असते; पण खरा समजूतदारपणा, अनुभव आणि चांगले निर्णय घेण्याची शक्ती 55 वर्षांनंतर दिसून येते. या वयात लोक केवळ भावनांवर नव्हे, तर पक्क्या अनुभवावर आणि ठोस विचारांवर आधारित निर्णय घेतात. मनोवैज्ञानिकांनुसार, 55 वर्षांपर्यंत व्यक्तीकडे भरपूर अनुभव जमा झालेला असतो. त्याने अपयशातून खूप काही शिकलेले असते आणि त्याला समाजाची चांगली समज असते. या सर्व गोष्टी एकत्र आल्याने, त्यांच्या विचार करण्याची पद्धत सुधारते आणि त्यांचे निर्णय अधिक खोलवरचे असतात. म्हणूनच या वयाचे लोक कठीण परिस्थितीतही शांत राहतात आणि घाईगडबडीत कोणताही निर्णय घेत नाहीत. बऱ्याचदा असे मानले जाते की, वाढत्या वयानुसार स्मरणशक्ती कमी होते; पण सत्य हे आहे की, मेंदू वेगळ्या पद्धतीने काम करू लागतो. तो आता केवळ गोष्टी लक्षात ठेवण्याऐवजी, त्यांना समजून घेण्यावर आणि त्यांची जोडणी करण्यावर अधिक भर देतो. याचा अर्थ विचार करण्याची पद्धत बदलते; पण समजूतदारपणा कमी होत नाही. 50 वर्षांनंतर व्यक्तीने जीवनातील अनेक चढ-उतार पाहिलेले असतात. नाती, काम आणि समाज याबद्दलचे अनुभव त्याच्या निर्णयांना अधिक व्यावहारिक आणि टिकाऊ बनवतात. त्यामुळे या वयात घेतलेले निर्णय दूरदृष्टीचे सिद्ध होतात. हा अभ्यास सांगतो की, वय वाढणे ही कोणतीही कमतरता नसून, ती एक नैसर्गिक प्रगती आहे. तरुणांमध्ये ऊर्जा असते, तर प्रौढ वयात व्यक्तीकडे ज्ञान आणि विवेक यांचे अद्भुत मिश्रण असते. त्यामुळे, पुढच्या वेळी कोणी तुम्हाला ’आता तुमचे वय झाले आहे’ असे म्हटल्यास, तुम्ही हसून उत्तर देऊ शकता… ’होय, आता तर माझा मेंदू माझ्या सर्वात उत्कृष्ट टप्प्यात आहे!’
Check Also
प्रयोगशाळेत बनणार दुर्मिळ रक्तगट
केवळ साठ लाखांमध्ये एका व्यक्तीमध्ये आढळणारा ‘आरएच नल’ नावाचा जगातील सर्वात दुर्मीळ रक्तगट आता प्रयोगशाळेत …
पांचजन्य वृत्तपत्र