अर्थकारणाची सगळी चक्रे सध्या उलट्या दिशेने सुरू आहेत. केवळ सरकारसाठी नाही, तर सामान्य नागरिकांच्या दृष्टीनेही काळ आता सोपा राहिलेला नाही याचे संकेत मिळत आहेत. गेले आठ आठवडे शेअर बाजार रोज घसरतो आहे, गुंतवणूकदारांची अक्षरशः धूळधाण उडत आहे. आता सोमवारी काहीसा बाजार वधारलेला असला, तरी एकूण लक्षण अजून काही ठीक दिसत नाही. गेल्या आठ आठवड्यात शेअर बाजाराची जी घसरण झाली त्यातून गुंतवणूकदारांचे सुमारे 26 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. गेल्या वर्षभरात परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून तब्बल 2 लाख 70 हजार कोटी रुपये काढून नेले आहेत. गेल्या वर्षभरात निफ्टी 50 ने उणे 9.4 टक्के, सेन्सेक्सने उणे 11% आणि निफ्टी 500 ने उणे 4.5 टक्के इतका निगेटिव्ह परतावा दिला आहे.
बँकेत मुदत ठेवीच्या स्वरूपात रक्कम ठेवल्यानंतर त्यावर समाधानकारक व्याज मिळत नाही म्हणूनही लोक शेअर बाजाराकडे वळले होते. पण तेथे नफा मिळण्याऐवजी मुद्दलातच सातत्याने घट होऊ लागल्याने सामान्य गुंतवणूकदार धास्तावला आहे. ज्यांच्याकडे आज गुंतवण्या इतके पैसे आहेत त्यांची गुंतवणूक ना बँकेतील ठेवीत सोयीची राहिली आहे, ना त्यांच्यासाठी शेअर बाजार सोयीचा राहिला आहे, ही पैसेवाल्यांची आजची स्थिती आहे. ज्यांच्याकडे पैसाच नाही किंवा ज्यांचे पोटच हातावर आहे, त्यांची सध्या काय स्थिती आहे याचा विचारही न केलेला बरा.
बँकांमधील मुदत ठेवी सुरक्षित राहिलेल्या नसल्याचे अनेक जाणकार सातत्याने सांगत आहेत. एक जबाबदार राजकीय नेते म्हणून मानले जाणारे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तर सर्वसामान्य लोकांना शक्य तितक्या लवकर बँकांमधील ठेवी काढून घ्या कारण लवकरच बँका बुडणार आहेत, असा जाहीर इशारा दिला आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बँकांचा बराच पैसा बुडीत निघत असून अनेक मोठ्या भांडवलदारांना त्यांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज ’हेअर कट’च्या माध्यमातून अगदी किरकोळीत ’सेटल’ केले जात असल्याने बँका नुकसानीत येत आहेत. त्याचा एकत्रित परिणाम देशाच्या एकूणच बँकिंग व्यवस्थेवर होण्याचा धोका आहे. देशाच्या अर्थकारणाचा काळ आता किती अवघड होत आहे याचे इशारे देणारे अनेक व्हिडिओ जाणकारांकडून समाज माध्यमांवर प्रसारित केले जात आहेत. अनेकांनी तर असा सल्ला दिला आहे की, आपल्याला वर्षभर पुरेल एवढी रक्कम सामान्य नागरिकांनी आपल्याजवळ ठेवावी आणि घरात किमान सहा महिने पुरेल एवढा जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवावा.
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी न्यूयॉर्कमधील आशिया सोसायटीच्या एका कार्यक्रमात बोलताना देशापुढील या गंभीर स्थितीची स्पष्ट कबुली दिली आहे. त्यांनीही आगामी काळ चार घटकांच्या दृष्टीने अत्यंत अवघड असल्याचे म्हटले आहे. इंधन, खत, अन्न आणि वित्त अशा चार ’एफ’च्या बाबतीत भारतापुढे मोठे संकट निर्माण झाल्याचे त्यांनी मान्य केले आहे. अन्नधान्याचीसुद्धा येत्या काही महिन्यात अत्यंत गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. सरकारमधल्या एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याने अशी चिंता किंवा भीती जाहीर स्वरूपात व्यक्त केल्याने समाज माध्यमातून आजवर जे जाणकार देशापुढील संकटांबाबत बोलत आहेत त्यात तथ्य वाटू लागल्याने सामान्य माणूस आणखीनच गडबडून गेला आहे. याबाबत सरकारनेच आता नेमके मार्गदर्शन करायला हवे. अन्यथा या आधीच मेटाकुटीला आलेला समाज या भयगंडाने कोलमडून पडेल. -विनायक सरदेसाई
Check Also
उपाययोजना स्वागतार्ह,कसोटी अमलबजावणीची
महाराष्ट्रातील शेती आणि बळीराजा पुन्हा एकदा एका भीषण आणि ऐतिहासिक संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.राज्य …
पांचजन्य वृत्तपत्र