लेख-समिक्षण

जंतर मंतरवर पुन्हा रणभूमी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश यांच्या राजीनाम्याची मागणी करीत देशातील सर्व विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने दिल्लीच्या जंतर मंतरवरून संघर्ष सुरू केला आहे. त्याआधीच तरुणांच्या कॉक्रोच जनता पक्षाने 2 ऑक्टोबरपासून रणशिंग फुंकले आहे. मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी गनिमी कावा करीत आकाशवाणीमध्ये ठिय्या आंदोलन केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण कमालीचे तापले. विरोधी पक्षांच्या ‌‘इंडिया‌’ आघाडीच्या खासदारांना ‌‘लंच‌’साठी निमंत्रित करण्यात आले होते. संसदेतून केवळ जेवणासाठी बाहेर पडल्याचे चित्र निर्माण केले गेले, परंतु ही सरकारला चकमा देण्याची रणनिती होती. या अनौपचारिक बैठकीच्या आडून आंदोलनासाठी खासदारांनी जंतर मंतर गाठले. यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांनी पोलिसांनी मारहाण आणि लाठीचार्ज केल्याचा आरोप केला.
निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाच्या रणनीतीचाच एक भाग म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीतील प्रसिद्ध ‌‘सागर रत्ना‌’ रेस्टॉरंटमध्ये एका स्नेहभोजनाचे (लंच) आयोजन केले होते. सागर रत्ना रेस्टॉरंटमधील या लंचला काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह विरोधी पक्षांतील अनेक वरिष्ठ नेते आणि खासदार उपस्थित होते. अगदी माजी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही या भोजनाला हजेरी लावली. रेस्टॉरंटच्या बाहेर सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून कडक बंदोबस्त आणि बॅरिकेड्स लावण्यात आले होते. वरकरणी हे भोजनाचे निमंत्रण वाटत असले, तरी भोजनाच्या टेबलावर ‌‘व्होट चोरी‌’चा मुद्दा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि आगामी आंदोलनाची पुढील दिशा यावर सखोल चर्चा झाली. त्यानंतर सर्व नेतेमंडळींनी जंतरमंतरच्या दिशेने कूच केले. दिल्ली पोलिसांनी इंडिया आघाडीच्या आंदोलकांना जंतर मंतरपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी इंडिया आघाडीच्या बसेस थांबवल्या. यानंतर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी आणि इतर सर्व नेत्यांना पोलिसांनी बसेसमधून खाली उतरवले.
दरम्यान, महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रियांका गांधी यांना आंदोलनस्थळावरून जबरदस्तीने हटवले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या इतर खासदारांना ताब्यात घेतल्यानंतर, पोलिस त्यांना जंतर मंतरजवळून घेऊन गेले. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनीदेखील रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्या म्हणाल्या की, निवडणूक आयुक्तांना भेटण्याची विनंती करणाऱ्या खासदारांशी ते अशी वागणूक देतात. ते खासदारांना मारहाण करत आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांनी मला अनेक ठिकाणी ओरखडे पाडले आहेत. आम्हाला जमिनीवर पाडण्यात आले. आम्ही आता इथून हलणार नाही. त्यांनी आणखी कुमक बोलावली तरीही मी इथून हटणार नाही, असा निर्धार प्रियांका गांधी यांनी व्यक्त केला होता. दिल्लीतील ‌‘इंडिया‌’ आघाडीच्या आंदोलनादरम्यान ताब्यात घेतले जात असताना आरजेडी खासदार मनोज कुमार झा म्हणाले की, त्यांनी अत्यंत क्रूरपणे लाठीचार्ज केला. यासाठी ज्ञानेश कुमार, अमित शाह आणि पंतप्रधान मोदी हे सर्वजण जबाबदार आहेत. अशी दृश्ये आम्ही अनेक वर्षांत पाहिली नाहीत. ही क्रूरतेची परिसीमा आहे. तुमचा खरा चेहरा समोर आला आहे. तुम्ही सर्वजण भित्रे आहात, असा हल्लाबोल त्यांनी केला.
मुंबईत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वात तरुणांचे आंदोलनानंतर दिल्लीला जंतर मंतर पेटले आहे. अभिजित दीपके, कॉ. नेहा बोरा, कॉ. विराज, सौरभ दास, आशुतोष रांका आदी युवानेत्यांनी सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पेोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे संपूर्ण विरोधी पक्ष एकजूट झाला. इंडिया आघाडीनेही देशव्यापी ‌‘लोकशाही वाचवा मोर्चा‌’ आयोजित करणे सुरू केले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून, आघाडीतील सर्व विरोधी पक्षांचे खासदार 6 ऑक्टोबर रोजी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला.

Check Also

उपाययोजना स्वागतार्ह,कसोटी अमलबजावणीची

महाराष्ट्रातील शेती आणि बळीराजा पुन्हा एकदा एका भीषण आणि ऐतिहासिक संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.राज्य …