लेख-समिक्षण

कंगना-तापसी वाद पुन्हा पेटला

कंगना रणौत आणि तापसी पन्नू यांच्यातील जुना शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. काही काळ शांत असलेला हा वाद तापसीच्या एका मुलाखतीनंतर पुन्हा चर्चेत आला. तापसीने केलेल्या वक्तव्याचा संबंध आपल्या आई-वडिलांशी आणि संगोपनाशी जोडत कंगनाने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी ‌‘गांधारी‌’ चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान एका कार्यक्रमात तिला कंगना रणौतसोबत असलेला जुना वाद आता मिटला आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तापसीने आपण कंगनाला कधीही भेटले नसल्याचे सांगितले. हा वाद सुरू झाला तेव्हाही भेट झाली नव्हती आणि त्यानंतरही दोघी समोरासमोर आलेल्या नाहीत, असे तिने स्पष्ट केले. मात्र पुढे एखाद्या व्यक्तीबद्दलचे मत हे त्या व्यक्तीचे संगोपन, बोलण्याची पद्धत आणि गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन दाखवत असते, असे तापसीने म्हटले. हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. तापसीने आपल्या आई-वडिलांची आणि संस्कारांची थट्टा केल्याचा आरोप तिने केला. त्यानंतर तिने तापसीचा पुन्हा ‌‘स्वस्त कॉपी‌’ असा उल्लेख करत तिच्या आई-वडिलांवरही भाष्य केले. सर्व पालक आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम प्रयत्न करतात, असे सांगतानाच कंगनाने तापसीच्या पालकांना उद्देशून उपरोधिक प्रश्न उपस्थित केला. कंगना आणि तापसी यांच्यातील मतभेद नवे नाहीत. 2020 मध्ये घराणेशाहीच्या चर्चेदरम्यान कंगनाने तापसीचा उल्लेख ‌‘बी-ग्रेड अभिनेत्री‌’ असा केला होता. त्यानंतर दोघींमधील शाब्दिक संघर्ष वेळोवेळी समोर आला आहे. यावेळी मात्र हा वाद दोन्ही अभिनेत्रींच्या वैयक्तिक मतभेदांच्या पुढे जाऊन त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचल्याने सोशल मीडियावर पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.- राधिका बिवलकर

Check Also

‌‘पल भर के लिए‌’ झळकणार जागतिक पातळीवर

बॉलिवूड अभिनेत्री सैयमी खेर आणि चित्रपट निर्माते विक्रम फडणवीस यांचा आगामी ‌‘पल भर के लिए‌’ …