लेख-समिक्षण

प्रतिमा बदलणारे कलाकार

चित्रपटसृष्टीत एकदा ‌‘इमेज‌’ तयार झाली की ती कलाकाराला यशाच्या शिखरावर नेते; पण कालांतराने तीच त्याच्या पायातील बेडीही ठरू शकते. म्हणूनच खरा कस लागतो तो स्वतःची लोकप्रिय प्रतिमा मोडून पूर्णपणे विरुद्ध भूमिका स्वीकारताना. हिंदी चित्रपटसृष्टीत प्राण यांनी खलनायकातून चरित्र अभिनेत्यापर्यंतचा प्रवास केला, विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा खलनायकी भूमिकांतून नायक झाले, तर सैफ अली खान आणि संजय दत्त यांनी नायकाच्या चौकटीबाहेर पडून खलनायकीला नवा रंग दिला. आता बॉबी देओलनेही तीन दशकांपूर्वीच्या रोमँटिक नायकाची प्रतिमा मागे टाकत नकारात्मक भूमिकांमधून कारकिर्दीची दुसरी इनिंग गाजवली आहे. – सोनम परब, सिनेअभ्यासक

हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकाराचा चेहरा जितका महत्त्वाचा, तितकीच त्याची ‌‘इमेज‌’ही महत्त्वाची असते. एखादा अभिनेता प्रेमकथांमध्ये यशस्वी झाला की त्याच्याकडे पुन्हा पुन्हा प्रेमवीराच्या भूमिका येतात. ॲक्शनपट चालला की हातात बंदूक आणि समोर खलनायक, हे समीकरण वर्षानुवर्षेकायम राहते. खलनायक म्हणून नाव झाले की त्याच्या वाट्याला पुन्हा दुष्ट व्यक्तिरेखाच येतात. या चौकटीमुळे लोकप्रियता मिळते खरी; पण कालांतराने हीच प्रतिमा कलाकारासाठी पिंजरा ठरू शकते. म्हणूनच ही चौकट मोडून वेगळे काही करण्याचे धाडस करणारे कलाकार प्रेक्षकांच्या अधिक काळ लक्षात राहतात.
बॉबी देओलचे सध्याचे रूप हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. 1995 मध्ये ‌‘बरसात‌’मधून हिंदी चित्रपटसृष्टीत आलेला बॉबी त्याच्या निळ्या डोळ्यांमुळे, कुरळ्या केसांमुळे आणि काहीशा निरागस व्यक्तिमत्त्वामुळे तरुणाईचा आवडता नायक झाला. ‌‘गुप्त‌’, ‌‘सोल्जर‌’, ‌‘बादल‌’, ‌‘बिच्छू‌’ अशा चित्रपटांनी त्याला रोमँटिक आणि ॲक्शन हिरो म्हणून ओळख मिळवून दिली. त्याची केशभूषा, कपडे आणि नृत्याची शैलीही त्या काळातील तरुणांमध्ये लोकप्रिय झाली. मात्र, चित्रपटसृष्टीत कोणतीही प्रतिमा कायमची नसते. नव्या पिढीचे कलाकार आले, प्रेक्षकांची अभिरुची बदलली आणि बॉबीच्या कारकिर्दीचा वेग मंदावला. एक काळ असा आला की मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधून तो जवळपास गायब झाला. अशा टप्प्यावर अनेक कलाकार हळूहळू पडद्याआड जातात. बॉबीने मात्र आपली जुनी प्रतिमा टिकवून ठेवण्याचा हट्ट करण्याऐवजी तीच मोडण्याचा मार्ग स्वीकारला.
‌‘बाबा निराला‌’ने बदलला खेळ
2018 मधील ‌‘रेस 3‌’मधून त्याचे पुनरागमन झाले; पण खरी कलाटणी मिळाली ती ‌‘आश्र्म‌’ या वेब मालिकेने. बाबा निरालाची व्यक्तिरेखा बॉबीच्या आजवरच्या पडद्यावरील प्रतिमेच्या अगदी विरुद्ध होती. वरकरणी शांत आणि संयमी; पण आतून सत्तालोलुप, कपटी आणि क्रूर अशा व्यक्तिरेखेने त्याच्यातील वेगळा अभिनेता समोर आणला. मोठमोठे संवाद किंवा आक्रस्ताळी अभिनय न करता चेहरा, नजर आणि देहबोलीतून भीती निर्माण करता येते, हे त्याने दाखवून दिले.
यानंतर ‌‘ॲनिमल‌’मधील अबरार हकने तर बॉबीच्या दुसऱ्या पर्वावर शिक्कामोर्तब केले. चित्रपटातील त्याची भूमिका तुलनेने मर्यादित होती आणि संवादही फारसे नव्हते. तरी त्याची उपस्थिती लक्षात राहिली. संवादांपेक्षा देहबोली, चेहऱ्यावरील भाव आणि पडद्यावरील अस्तित्व यांच्या जोरावर त्याने अबरारला प्रभावी केले. कधीकाळी प्रेमकथांमधील देखणा नायक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता नव्या पिढीसाठी खलनायकी भूमिकांमधून नव्याने परिचित झाला.
प्राण यांनी मोडली पहिली भिंत
पडद्यावरील प्रतिमा बदलण्याची ही परंपरा नवी नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत त्याचे सर्वांत ठळक उदाहरण म्हणजे प्राण. एक काळ असा होता की पडद्यावर प्राण दिसले म्हणजे काहीतरी वाईट घडणार, अशी प्रेक्षकांची मानसिक तयारी होत असे. त्यांची खलनायकी इतकी प्रभावी होती की त्यांचे नावही त्या प्रतिमेशी जोडले गेले. ‌‘उपकार‌’मधील मलंग चाचाने मात्र ही धारणा बदलली. खलनायक म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या प्राण यांना सकारात्मक व्यक्तिरेखेतही तितक्याच सहजतेने स्वीकारले गेले. त्यानंतर त्यांनी अनेक चरित्र भूमिका केल्या आणि ‌‘व्हिलन‌’ या एकाच चौकटीतून स्वतःची मुक्तता केली.
शत्रुघ्न सिन्हा आणि विनोद खन्ना यांचाही प्रवास काहीसा असाच. दोघांनी सुरुवातीला नकारात्मक भूमिकांतून आपली छाप पाडली. शत्रुघ्न सिन्हांची भारदस्त आवाजातील संवादफेक आणि विनोद खन्नांचा रुबाब खलनायकी भूमिकांना वेगळे परिमाण देत होता. मात्र पुढे दोघेही मुख्य प्रवाहातील यशस्वी नायक झाले. विशेषतः विनोद खन्ना यांनी त्या काळातील आघाडीच्या नायकांच्या रांगेत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले.
शाहरुखचा उलटा प्रवास
शाहरुख खानचा प्रवास याच्या नेमका उलटा म्हणता येईल. आज त्याची ओळख रोमँटिक नायक म्हणून अधिक ठळक असली, तरी कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याने ‌‘बाजीगर‌’, ‌‘डर‌’ आणि ‌‘अंजाम‌’सारख्या चित्रपटांत नकारात्मक छटा असलेल्या भूमिका स्वीकारल्या. त्या काळात नव्या अभिनेत्याने अशा भूमिका करणे जोखमीचे मानले जात होते. शाहरुखने ती जोखीम घेतली आणि त्यानंतर ‌‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे‌’सारख्या चित्रपटांमधून रोमँटिक नायकाची पूर्णपणे वेगळी प्रतिमा निर्माण केली.
सैफ अली खानबाबतही असेच घडले. सुरुवातीच्या काळातील रोमँटिक आणि हलक्याफुलक्या भूमिकांनंतर ‌‘ओमकारा‌’मधील लंगडा त्यागीने त्याच्यातील अभिनेत्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. नायकाच्या चेहऱ्यामागे एक धूर्त, मत्सरी आणि हिंसक व्यक्तिरेखा दडलेली असू शकते, हे त्याने प्रभावीपणे दाखवले.
‌‘कांचा चीना‌’चा धक्का
संजय दत्तची प्रतिमाही दीर्घकाळ ॲक्शन हिरो, बंडखोर नायक आणि रोमँटिक स्टार अशी राहिली. ‌‘अग्निपथ‌’मधील कांचा चीना मात्र त्याच्या कारकिर्दीतील वेगळे वळण ठरला. टक्कल केलेला चेहरा, अवाढव्य देहयष्टी आणि भय निर्माण करणारे हास्य यामुळे कांचा चीना त्याच्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळा ठरला. पुढे ‌‘केजीएफ : चॅप्टर 2‌’मधील अधीराने ही प्रतिमा आणखी ठळक केली.
अमजद खान यांची गोष्ट मात्र वेगळी. ‌‘शोले‌’मधील गब्बर सिंह इतका मोठा झाला की त्यानंतर त्यांनी सकारात्मक आणि विनोदी भूमिका केल्या तरी गब्बरची सावली त्यांच्या कारकिर्दीवर कायम राहिली. कधी कधी अभिनेता व्यक्तिरेखेला मोठे करतो आणि कधी एखादी व्यक्तिरेखाच अभिनेत्यापेक्षा मोठी होते, याचे हे उत्तम उदाहरण.
आता हिरो-विलनची सीमारेषाच धूसर
आज मात्र हिंदी आणि भारतीय चित्रपटसृष्टीत ‌‘नायक‌’ आणि ‌‘खलनायक‌’ यांच्यातील पारंपरिक भिंत बरीचशी कोसळली आहे. अजय देवगण, रणदीप हुड्डा, नवाजुद्दीन सिद्दीकी, विजय सेतुपती यांसारख्या कलाकारांनी व्यक्तिरेखेच्या बाजूनुसार हिरो किंवा व्हिलन होण्यापेक्षा भूमिकेतील ताकदीला प्राधान्य दिले. प्रेक्षकांनाही आता पांढऱ्या कपड्यांतील सद्गुणी नायक आणि काळ्या कपड्यांतील दुष्ट खलनायक एवढी सरळ विभागणी नको आहे.
आजच्या कथांमधील माणसे अधिक गुंतागुंतीची आहेत. नायकामध्ये दोष असतात आणि खलनायकामागेही एखादी कथा असते. त्यामुळे ‌‘ग्रे‌’ व्यक्तिरेखांना अधिक वाव मिळतो. कलाकारासाठीही अशा भूमिका आकर्षक असतात. आदर्श नायक म्हणून दिसण्याची बंधने त्यात नसतात. चेहरा कुरूप करण्यापासून देहबोली बदलण्यापर्यंत आणि नैतिकतेच्या चौकटी मोडण्यापासून विक्षिप्तपणाच्या टोकापर्यंत जाण्याची संधी त्याला मिळते.
बॉबी देओलचा प्रवास म्हणूनच केवळ एका अभिनेत्याच्या पुनरागमनाची गोष्ट नाही. तो हिंदी चित्रपटसृष्टीतील बदलत्या अभिनय संस्कृतीचाही दाखला आहे. ‌‘बरसात‌’मधील निरागस प्रेमवीरापासून ‌‘आश्र्म‌’च्या बाबा निराला आणि ‌‘एनिमल‌’च्या अबरार हकपर्यंतचा प्रवास तीन दशकांत पडद्यावरील नायक-खलनायकाच्या व्याख्या किती बदलल्या, हे सांगतो.
अखेरीस प्रेक्षकांच्या स्मरणात नायक किंवा खलनायक राहत नाही; राहते ती व्यक्तिरेखा. प्राण यांचा मलंग चाचा असो, अमजद खानचा गब्बर, सैफचा लंगडा त्यागी किंवा बॉबीचा अबरारकलाकाराने स्वतःची परिचित प्रतिमा विसरायला भाग पाडले, की त्याच्या कारकिर्दीचा नवा अध्याय सुरू होतो. पडद्यावर चेहरा तोच असतो; पण त्या चेहऱ्यामागचा अभिनेता नव्याने सापडतो.

Check Also

अभिनय बेर्डेचा ‌‘अल्पविराम‌’

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय तरुण अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनय बेर्डेने आपल्या अभिनय कारकिर्दीतून काही काळासाठी …