लेख-समिक्षण

25 हजारांपासून सुरुवात आता 22 हजार कोटी

व्यवसाय उभा करण्यासाठी मोठे भांडवल, भव्य कारखाना आणि विस्तीर्ण वितरण व्यवस्था सुरुवातीपासूनच हवी, हा समज आर. जी. चंद्रमोगन यांच्या वाटचालीने खोटा ठरवला. काही हातगाड्यांवरून आईस्क्रीम विकण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज हजारो कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या डेअरी उद्योगापर्यंत पोहोचला आहे.
आर. जी. चंद्रमोगन यांनी 1970 मध्ये वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी आईस्क्रीम व्यवसायात पाऊल ठेवले. सुरुवातीचे भांडवल होते सुमारे 25 हजार. त्यापैकी 13 हजार त्यांनी स्वतः उभे केले, तर 12 हजारांचे बँक कर्ज घेतले. आजच्या तुलनेत ही रक्कम लहान वाटत असली, तरी त्या काळात मर्यादित साधनांमध्ये व्यवसाय सुरू करण्याचे ते मोठे धाडस होते. सुरुवातीला मोठे विक्री जाळे नव्हते. ‌‘अरुण आईस्क्रीम्स‌’ची विक्री हातगाड्यांद्वारे केली जात होती. ग्राहकांची पसंती मिळवत हा ब्रँड हळूहळू तमिळनाडूमध्ये रुजू लागला. 1978 मध्ये पहिले ‌‘अरुण आईस्क्रीम पार्लर‌’ सुरू झाले. स्वतंत्र विक्री केंद्रांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्याची ही कल्पना पुढील विस्तारासाठी महत्त्वाची ठरली.
1970 मध्ये सुमारे 1 लाखांची उलाढाल असलेला व्यवसाय 1986 पर्यंत 29.52 लाखांवर पोहोचला. त्याच वर्षी ‌‘हॅटसन फूड्स‌’ची स्थापना झाली. पुढे आईस्क्रीमच्या पलीकडे जाऊन दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारपेठेत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1990 च्या दशकात या विस्ताराला वेग आला. त्यातून ‌‘आरोग्य मिल्क‌’, ‌‘हॅटसन कर्ड‌’, पनीर, तूप तसेच ‌‘इबॅको‌’सारखे ब्रँड विकसित झाले.आज हॅटसन ॲग्रो प्रॉडक्ट ही देशातील प्रमुख खासगी दुग्धव्यवसाय कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे दूध संकलनाचे जाळे 10 हजारांहून अधिक गावांपर्यंत पोहोचले असून 4 लाखांहून अधिक दूध उत्पादक शेतकरी त्याच्याशी जोडले गेले आहेत. 13 हजारांची स्वतःची गुंतवणूक, 12 हजारांचे कर्ज आणि हातगाड्यांवरून आईस्क्रीमची विक्रीएवढ्याशा पायावर सुरू झालेला हा उद्योग आज विशाल डेअरी व्यवसायात रूपांतरित झाला आहे. चंद्रमोगन यांची कहाणी म्हणूनच केवळ एका उद्योजकाच्या यशाची नाही; मर्यादित भांडवलापेक्षा बाजाराची जाण, सातत्य, वितरण व्यवस्थेचा विस्तार आणि योग्य वेळी व्यवसायाचे विविधीकरण किती निर्णायक ठरू शकते, ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?

Check Also

निएंडरथल धार्मिक होते का?

निएंडरथल मानवांनी त्यांच्या गूढ जीवनाबद्दल अनेक संकेत मागे सोडले आहेत. परंतु, त्यांच्या आध्यात्मिक बाजूबद्दल फार …