लेख-समिक्षण

सिनेमा ते राजकारण

दक्षिण भारताच्या राजकारणात सिनेमा आणि सत्तेचे नाते अनेक वर्षांपासून आहे. लोकप्रियतेपलीकडे जात ते सामाजिक भावनांशी, प्रादेशिक अस्मितेशी आणि जनमानसाच्या मानसिकतेशी घट्ट जोडलेले राहिले आहे. पडद्यावर अन्यायाविरुद्ध लढणारा नायक, गरीबांचा तारणहार किंवा जनतेसाठी जीव धोक्यात घालणारा नेता ही प्रतिमा दक्षिणेतील प्रेक्षकांनी कमालीची उचलून धरताना अनेकदा त्या प्रतिमेलाच त्यांनी वास्तवातील नेतृत्व मानले. त्यामुळेच दक्षिण भारतात चित्रपटसृष्टीतून थेट सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचणाऱ्या नेत्यांची परंपरा निर्माण झाली. अभिनेता विजयच्या रूपाने या परंपरेला नवे राजकीय रूप मिळताना दिसत आहे.
तमिळनाडूमध्ये या परंपरेची पायाभरणी करणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये एम. करुणानिधी, एम. जी. रामचंद्रन आणि जयललिता यांची नावे सर्वप्रथम घेतली जातात. करुणानिधी यांनी चित्रपटसृष्टीत पटकथालेखक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांची लेखनशैली, सामाजिक प्रश्नांवरील भाष्य आणि द्रविड चळवळीच्या विचारांना त्यांनी चित्रपटांच्या माध्यमातून दिलेला आवाज यामुळे ते जनमानसात लोकप्रिय झाले. पुढे त्यांनी द्रमुकचे नेतृत्व करत तब्बल पाच वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यांच्या राजकीय प्रवासाने दक्षिण भारतात सिनेमा हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक आणि राजकीय विचार पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे सिद्ध केले. यानंतर एमजीआर यांनी दक्षिण भारतीय राजकारणाला पूर्णपणे नवे वळण दिले. पडद्यावर गरीबांसाठी लढणाऱ्या, अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या नायकाची त्यांची प्रतिमा इतकी प्रभावी ठरली की, जनतेने त्यांना वास्तविक जीवनातही तारणहार मानले. 1977 मध्ये ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून स्वतःला जनतेच्या मनात अधिक घट्ट रोवले. दक्षिण भारतात व्यक्तिपूजक राजकारणाला संस्थात्मक रूप देण्यात एमजीआर यांचे योगदान मोठे मानले जाते. त्यांच्या निधनानंतर त्यांची राजकीय परंपरा पुढे नेण्याचे काम जयललिता यांनी केले.
जयललिता या सुरुवातीला लोकप्रिय अभिनेत्री होत्या. मात्र एमजीआर यांच्या सहवासातून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले आणि पुढे ‌‘अम्मा‌’ म्हणून तमिळ जनतेच्या भावविश्वाचा भाग बनल्या. महिला नेतृत्व, करिश्माई व्यक्तिमत्त्व आणि कठोर प्रशासकीय शैली यांच्या मिश्र्णातून त्यांनी अनेक वर्षेतमिळनाडूच्या राजकारणावर वर्चस्व राखले. दक्षिण भारतातील जनतेसाठी चित्रपटातील लोकप्रियता आणि राजकीय नेतृत्व यांच्यातील दुवा जयललिता यांच्या यशामुळे आणखी मजबूत झाला.
आंध्र प्रदेशात हा प्रवाह अधिक प्रभावी स्वरूपात दिसला. एन. टी. रामाराव म्हणजेच एनटीआर यांनी पडद्यावर भगवान राम आणि श्र्ीकृष्ण यांच्या भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्या धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतिमेचा त्यांनी ‌‘तेलुगू अस्मिता‌’च्या राजकारणाशी प्रभावीपणे मेळ घातला. 1982 मध्ये तेलुगू देशम पक्षाची स्थापना करून अवघ्या नऊ महिन्यांत मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचणे हा भारतीय राजकारणातील अत्यंत विलक्षण प्रवास मानला जातो. एनटीआर यांच्या उदयानंतर दक्षिण भारतात अभिनेता हा केवळ प्रचारक नसून थेट सत्तेचा केंद्रबिंदू बनू शकतो, हे स्पष्ट झाले.
यानंतर अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला. काहींना मोठे यश मिळाले, तर काहींची लोकप्रियता मतदानपेटीत रूपांतरित होऊ शकली नाही. तमिळनाडूमध्ये विजयकांत यांनी ‌‘डीएमडीके‌’ स्थापन करून द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पारंपरिक पक्षांना थेट आव्हान दिले. ‌‘कॅप्टन‌’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयकांत यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. जरी ते सत्तेपर्यंत पोहोचू शकले नाहीत, तरी त्यांनी तमिळ राजकारणात तिसऱ्या पर्यायाची जागा निर्माण केली.
आंध्र प्रदेशात चिरंजीवी आणि पवन कल्याण या दोन्ही भावांनी राजकारणात प्रवेश केला. चिरंजीवी यांनी ‌‘प्रजा राज्यम‌’ पक्ष स्थापन केला आणि सुरुवातीला त्यांना चांगला प्रतिसाद मिळालाही. मात्र त्यांच्या राजकीय प्रवासाला अपेक्षित स्थैर्य लाभले नाही. अखेर त्यांनी सक्रिय राजकारणापासून काहीसे अंतर ठेवले. त्याउलट पवन कल्याण यांनी दीर्घ संघर्षानंतर स्वतःची राजकीय ओळख निर्माण केली. अनेक निवडणूक पराभव आणि अडचणींनंतरही त्यांनी जिद्द सोडली नाही आणि अखेरीस आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्रीपद मिळवत स्वतःला प्रभावी प्रादेशिक नेता म्हणून सिद्ध केले.
कर्नाटकात डॉ. राजकुमार यांचे उदाहरण वेगळ्या स्वरूपाचे राहिले. त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही किंवा पक्ष स्थापन केला नाही, तरी त्यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव इतका प्रचंड होता की त्यांच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण बदलू शकत होते. ‌‘अन्नावरू‌’ म्हणून जनमानसात स्थान मिळवलेल्या राजकुमार यांनी लोकप्रियतेचा वापर थेट सत्तेसाठी केला नाही, पण त्यांचा प्रभाव अनेक राजकीय समीकरणांवर पडत राहिला. अनंत नाग यांच्यासारख्या कलाकारांनीही बौद्धिक आणि वैचारिक पातळीवर राजकारणात सहभाग घेतला.
केरळमध्येही या परंपरेचा प्रभाव दिसून आला. मलयाळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुरेश गोपी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केरळमधील पहिली मोठी विजयाची नोंद करून दिली. पारंपरिक द्विध्रुवीय राजकारण असलेल्या केरळमध्ये हा विजय केवळ निवडणूक निकाल नव्हता, तर लोकप्रियतेचे राजकीय भांडवलात रूपांतर होऊ शकते, याचे उदाहरण होते.
दक्षिण भारतीय राजकारणातील दोन सर्वाधिक चर्चिलेले चेहरे म्हणजे शिवाजी गणेशन आणि रजनीकांत. शिवाजी गणेशन हे पडद्यावरील महानायक होते, मात्र त्यांची लोकप्रियता निवडणुकीतील यशात रूपांतरित झाली नाही. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, पण मतदारांनी त्यांना अपेक्षित साथ दिली नाही. त्यामुळे अखेरीस त्यांना राजकीय प्रयोग थांबवावा लागला. यावरून दक्षिण भारतात लोकप्रियता महत्त्वाची असली तरी संघटनात्मक ताकद आणि योग्य राजकीय परिस्थिती तितकीच आवश्यक असल्याचे दिसून आले. रजनीकांत यांचा प्रवास मात्र अधिक गूढ राहिला. अनेक दशकांपासून त्यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती. 1996 मध्ये जयललिता यांच्या विरोधातील त्यांच्या वक्तव्याने तमिळनाडूच्या निवडणुकीवर प्रभाव टाकल्याचे मानले गेले. त्यामुळे त्यांचा राजकारणातील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात होता. त्यांनी पक्ष स्थापन करण्याची घोषणा केलीही; मात्र आरोग्याच्या कारणांमुळे त्यांनी अखेरीस सक्रिय राजकारणापासून माघार घेतली. तरीही दक्षिण भारतात एखाद्या अभिनेत्याच्या एका विधानाने राजकीय समीकरणे बदलू शकतात, हे रजनीकांत यांच्या उदाहरणातून स्पष्ट झाले.
आता तमिळनाडूमध्ये सर्वाधिक चर्चा विजय यांच्या राजकीय उदयाची आहे. ‌‘तमिळगा वेत्री कळगम‌’ या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी 2024 मध्ये अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला. विजय यांच्याकडे दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या चाहतावर्गांपैकी एक आहे. विशेष म्हणजे त्यांनी या चाहतावर्गाचे केवळ लोकप्रियतेत रूपांतर न करता त्याला संघटित राजकीय कार्यकर्त्यांच्या जाळ्यात बदलण्यास सुरुवात केली आहे. ही बाब त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचे गांभीर्य दाखवते.
दक्षिण भारतात अभिनेता-नेता ही संकल्पना टिकून राहण्यामागे काही सामाजिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत. येथे चित्रपटसृष्टी ही केवळ मनोरंजन उद्योग नसून लोकांच्या भावविश्वाचा भाग आहे. चित्रपटातील संवाद, व्यक्तिरेखा आणि नायकाची प्रतिमा समाजाच्या राजकीय कल्पनांवर प्रभाव टाकतात. त्यातच प्रादेशिक अभिमान, भाषिक अस्मिता आणि सामाजिक न्यायाच्या चळवळींनी सिनेमाला राजकीय अभिव्यक्तीचे माध्यम बनवले. त्यामुळे पडद्यावरील लोकप्रियता थेट जनाधारात रूपांतरित होण्याची प्रक्रिया दक्षिण भारतात इतर राज्यांच्या तुलनेत अधिक सहज घडते.
आजच्या डिजिटल आणि सोशल मीडियाच्या युगात ही परंपरा आणखी प्रभावी बनत आहे. चाहत्यांचे संघटन, प्रतिमानिर्मिती आणि थेट जनसंपर्क यामुळे अभिनेत्यांना पारंपरिक राजकीय पक्षांप्रमाणे संघटन उभारणे अधिक सोपे झाले आहे. विजय यांच्या वाढत्या प्रभावाकडे पाहता दक्षिण भारतातील अभिनेता-नेता ही परंपरा संपलेली नसून नव्या पिढीत अधिक आधुनिक आणि संघटित स्वरूपात पुढे येत असल्याचे स्पष्ट दिसते.- सोनम परब

Check Also

‌‘गोलमाल 5‌’ च्या चित्रीकरणाला उटीमध्ये सुरुवात

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी विनोदी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‌‘गोलमाल‌’चा पाचवा भाग सध्या चर्चेत आहे. अभिनेता …