लेख-समिक्षण

सौंदर्याचा सुवर्णकाळ आणि विज्ञानाचे निकष

माणूस नेमका कोणत्या वयात सर्वाधिक सुंदर दिसतो, विशीतले भरले तारुण्य अधिक आकर्षक असते की तिशीतली प्रगल्भता, हा प्रश्न पिढ्यानपिढ्या चर्चिला जात आहे. अनेकांना असे वाटते की विशीतील वय हे सौंदर्याचे शिखर आहे, मात्र त्वचातज्ज्ञांनी आता यावर विज्ञानाच्या आधारे एक वेगळाच प्रकाश टाकला आहे.
वाढत्या वयासोबत व्यक्ती अधिक सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण कशी दिसू शकते, याचे गुपित उलगडताना तज्ज्ञ सांगतात की, विशीपेक्षाही 30 ते 39 हे वर्ष सौंदर्यासाठी सर्वात उत्तम असते. याचे शास्त्रीय कारण म्हणजे, या वयात चेहऱ्याची ठेवण अधिक सुस्पष्ट होऊ लागते. विशीमध्ये चेहऱ्यावर असलेला बालिशपणा किंवा अतिरिक्त मेद हळूहळू कमी होतो आणि हाडांची ठेवण उठावदार दिसते. विशेष म्हणजे, या काळात शरीरातील कोलेजनची पातळी उत्तम असते, ज्यामुळे त्वचा तजेलदार आणि निरोगी दिसते.
तिशीपर्यंत पोहोचताना व्यक्तीला स्वतःच्या आवडीनिवडी आणि शैलीबद्दल नेमकी खात्री पटलेली असते. आपल्याला कोणते कपडे साजेसे दिसतात, कोणत्या केशरचनेत आपण उठावदार दिसतो आणि कोणत्या प्रकारची सौंदर्यप्रसाधने आपल्याला शोभतात, याचे गणित या वयात सुटलेले असते. इतकेच नव्हे, तर स्वतःच्या त्वचेला नेमके काय हवे आहे, हे ओळखून योग्य निगा राखण्याची समजही या काळात येते, ज्यामुळे नैसर्गिक चमक टिकून राहते. सौंदर्य केवळ बाह्य नसते, तर ते आंतरिक आत्मविश्वासातूनही झळकते.
चाळीशीच्या उंबरठ्यावर असताना व्यक्ती भावनिकदृष्ट्या अधिक स्थिर, शांत आणि समजूतदार झालेली असते. हा आंतरिक परिपक्वतेचा प्रभाव व्यक्तिमत्त्वावर पडतो आणि चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास दिसू लागतो, जो सौंदर्याला अधिक प्रभावी बनवतो. तिशीत असताना जर आपण सकस आहार, नियमित व्यायाम आणि विशेषतः वजन उचलण्याच्या व्यायामावर भर दिला, तर चाळीशीतही आपले सौंदर्य टिकवून ठेवता येते.
थोडक्यात सांगायचे तर, सौंदर्य हे केवळ तारुण्याशी निगडित नसून ते योग्य काळजी, जीवनशैली आणि अनुभवातून येणाऱ्या आत्मविश्वासाचे मिश्र्ण आहे. त्यामुळे वाढत्या वयाची भीती न बाळगता, स्वतःची निगा राखणे हाच चिरतरुण राहण्याचा खरा मंत्र ठरतो.

Check Also

सुट्टी ‌‘फलदायी‌’ ठरण्यासाठी…

दहावी आणि बारावीची परीक्षा म्हणजे शालेय जीवनातील दोन महत्त्वाचे टप्पे. परीक्षांचे दिव्य पार पाडल्यानंतर नवीन …