लेख-समिक्षण

मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मंत्री आणि अधिकाऱ्यांचे अभ्यास परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राज्यातील सर्व मंत्र्यांच्या ताफ्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताफ्याचा आकार मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह इतर नेत्यांनीही आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी आज बुधवारपासूनच ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आहे.
इंधन आणि परकीय चलनाची बचत करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दोन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. आता मंत्रालयातील बैठकांसाठी अधिकाऱ्यांना जिल्ह्यांतून मुंबईला यावे लागणार नाही, तर या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जातील. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्यात यावी. बाहेरच्या प्रवासात असताना ताफ्यातील वाहनांची संख्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसेल याची जबाबदारी संबंधित पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांची असेल. राज्याचे मंत्री आणि सनदी अधिकाऱ्यांनी सध्या कोणतेही परदेश दौरे करू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
पंतप्रधानांच्या या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. देशहिताला प्राधान्य देत आणि विदेशी चलन बचतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने देसाई यांनी हा दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. तीन महिन्यांपूर्वी मंत्री शंभूराज देसाई यांची कौटुंबिक परदेश सहल ठरविण्यात आली होती. या दौऱ्यात लंडन, पॅरिस आणि ॲम्स्टरडॅम या प्रमुख शहरांचा समावेश होता. कुटुंबासोबत सुट्टी आणि पर्यटनासाठी हा दौरा आखण्यात आला होता.
राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार आहे. कोणत्या मंत्र्यांच्या ताफ्यात किती वाहने, याचा आढावा घेण्यात येणार आहे. ज्या मंत्र्यांच्या ताफ्यात अधिकची वाहने आहेत, ती कमी केली जाणार आहेत. दुसरीकडे अनेक मंत्र्यांनी इलेक्ट्रीकल वाहन वापरण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याचे आवाहन पंतप्रधान यांनी केल्यानंतर प्रशासनाचा हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांनी मेट्रो किंवा बस यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. आठवड्यातून किमान एक दिवस असा प्रयोग करून जनतेसमोर आदर्श ठेवावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. अधिकाऱ्यांना बैठकांना बोलावण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घ्याव्यात. शासनात वितरित करण्यात आलेल्या वाहनांचा कोटेकोरपणे आढावा घेण्यात यावा.
शहरांमधील अनावश्यक होर्डिंग्ज आणि फ्लेक्सवर कारवाई केली जाणार आहे. डेकोरेटिव्ह लायटिंगचा वापर टाळून वीज वाचवण्यावर भर दिला जाणार आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यात अनेकदा गाड्यांची मोठी रांग असते. याला चाप लावण्यासाठी पोलीस महासंचालकांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. ताफ्यातील वाहनांची संख्या ठरवून दिलेल्या मर्यादेतच राहील याची खात्री स्थानिक पोलीस प्रशासनाला करावी लागणार आहे.
पंतप्रधान मोदींनीही आपला ताफा निम्म्याने कमी केला आहे. त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विशेष संरक्षण गटाला (एसपीजी) तसे करण्याचे आदेश दिले असल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधान मोदींनी आपला ताफा 50 टक्क्‌‍यांनी कमी केला आहे. ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यात आली असली, तरी एसपीजी प्रोटोकॉलनुसार आवश्यक सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे. हैदराबादमधील भाषणानंतर गुजरात आणि आसाममध्येही त्यांच्या ताफ्याचा आकार कमी करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Check Also

विकृत नराधमांना रोखायचे कसे?

पुणे जिल्ह्याती नसरापूरमध्येे घडलेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीवरील बलात्कार आणि खुनाच्या घटनेने सारा महाराष्ट्र हादरून गेला …