आंध्रमधील विझियानगरम जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या दोन सख्ख्या बहिणींनी जागतिक क्रीडा नकाशावर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. एका शेतमजूर पित्याच्या या मुलींनी सामोआ येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल युवा आणि कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकांवर नाव कोरून भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. बेलना हारिका आणि बेलना भार्गवी अशी या दोन सुवर्णकन्यांची नावे असून, त्यांच्या यशाने प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात कशी करावी, याचा नवा वस्तुपाठ जगासमोर ठेवला आहे.
या स्पर्धेत 19 वर्षीय बेलना हारिकाने कनिष्ठ गटामध्ये 197 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तिने स्नॅचमध्ये 86 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 111 किलो अशी चमकदार कामगिरी केली. तिची धाकटी बहीण 17 वर्षीय भार्गवी हिने देखील आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत युवा गटात सुवर्ण आणि कनिष्ठ गटात रौप्य पदक आपल्या नावे केले. भार्गवीने एकूण 180 किलो वजन उचलून विजय संपादन केला.
या यशामागचा प्रवास अत्यंत खडतर आणि संघर्षाचा आहे. त्यांचे वडील बेलना श्र्ीनू हे नेल्लीमारला मंडळातील कोंडावेलागाडा गावचे रहिवासी असून ते शेतमजुरी करतात. श्रीनू यांना तरुणपणी भारोत्तोलन क्षेत्राची प्रचंड ओढ होती, मात्र आर्थिक विवंचनेमुळे त्यांना आपले खेळाडू बनण्याचे स्वप्न अर्धवट सोडावे लागले. स्वतःचे स्वप्न अपूर्ण राहिले तरी त्यांनी हार न मानता आपल्या मुलींच्या माध्यमातून ते पूर्ण करण्याचा निश्चय केला. अत्यंत मर्यादित संसाधने आणि गरिबी असतानाही त्यांनी आपल्या मुलींना या खेळासाठी प्रोत्साहन दिले.
मुलींना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी श्रीनू यांनी त्यांना त्यांचे मेहुणे आणि राष्ट्रकुल पदक विजेते वल्लुरी श्र्ीनिवास राव यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवले. अवघ्या आठ वर्षांच्या असताना या दोघींनी वजने उचलण्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. श्रीनू आणि त्यांची पत्नी गौरी आजही गावात शेतमजुरी आणि मनरेगाची कामे करून आपल्या मुलींच्या आहाराचा आणि प्रशिक्षणाचा खर्च उचलत आहेत.
हारिका आणि भार्गवीने आपल्या पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रतिकूल परिस्थितीत सतत सराव केला आणि वडीलांचे स्वप्न पूर्ण केले, त्यांची ही कृती ईतर मुलींनाही नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
Check Also
महाकाय ग्रहनिर्मितीबाबत नवा सिध्दांत
विज्ञानातील सिद्धांतही अनेक वेळा गृहितकेच असतात. कालौघात नवे संशोधन आधीच्या सिद्धांताला छेद देणारे व नवा …
पांचजन्य वृत्तपत्र