जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्टने आपल्या कार्यपद्धतीत आणि मनुष्यबळ नियोजनात एक अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक वळण घेतले आहे. तब्बल 51 वर्षांचा यशस्वी प्रवास करणाऱ्या या कंपनीने आपल्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना म्हणजेच ‘व्हीआरएस’ जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या स्थापनेपासून अशा प्रकारचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. या निर्णयाने केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातच नव्हे, तर जागतिक कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील मायक्रोसॉफ्टच्या 1,25,000 कर्मचाऱ्यांपैकी साधारण 8,750 कर्मचाऱ्यांना या योजनेचा भाग होण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी कंपनीने 15,000 कर्मचाऱ्यांची कपात केली होती, त्यानंतर लागलीच आलेल्या या ‘व्हीआरएस’ योजनेमुळे कर्मचारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
मायक्रोसॉफ्टने ही प्रक्रिया पारदर्शक आणि पद्धतशीर करण्यासाठी एक विशिष्ट ‘त्रिसूत्री सूत्र’ तयार केले आहे. हे सूत्र वय, कंपनीतील कामाचे पद आणि कर्मचाऱ्याचा मोबदला प्रकार यावर अवलंबून आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा निकष वयाचा आणि अनुभवाचा आहे. कंपनीने एक गणिती पद्धत मांडली आहे, ज्यानुसार कर्मचाऱ्याचे सध्याचे वय आणि त्याने कंपनीत दिलेली एकूण सेवा यांची बेरीज जर 70 किंवा त्यापेक्षा जास्त होत असेल, तर तो कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीसाठी पात्र मानला जाईल. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे वय 52 वर्षेअसेल आणि त्याने कंपनीत 18 वर्षेकाम केले असेल, तर त्याची एकूण बेरीज 70 होते. असा कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
दुसऱ्या निकषानुसार, ही योजना केवळ ’सीनियर डायरेक्टर’ किंवा त्यापेक्षा खालच्या स्तरावरील (लेव्हल 67 पर्यंत) कर्मचाऱ्यांसाठीच लागू करण्यात आली आहे. कंपनीचे वरिष्ठ नेतृत्व, म्हणजेच व्हाईस प्रेसिडेंट किंवा त्यावरील उच्चपदस्थ अधिकारी या योजनेसाठी पात्र नाहीत. तिसरा महत्त्वाचा नियम असा की, जे कर्मचारी ’सेल्स इन्सेंटिव्ह प्लॅन’ अंतर्गत कार्यरत आहेत, त्यांना या योजनेतून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. 7 मे पर्यंत या योजनेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्राथमिक यादी निश्चित केली जाईल आणि त्यानंतर त्यांना विचार करण्यासाठी 30 दिवसांचा अवधी दिला जाईल.
या मोठ्या निर्णयामागे ’एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाढते वर्चस्व हे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या तंत्रज्ञान क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संशोधनासाठी अफाट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आघाडीवर राहण्यासाठी मायक्रोसॉफ्टला मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणुकीची गरज आहे. ही गुंतवणूक उभी करण्यासाठी कंपनीने ‘कॉस्ट कटिंग’ म्हणजेच खर्च कपातीचे धोरण स्वीकारले आहे. मनुष्यबळावर होणारा खर्च कमी करून तो पैसा आधुनिक तंत्रज्ञान विकासासाठी वापरण्याचा कंपनीचा मानस आहे. तसेच, गेल्या काही महिन्यांत मायक्रोसॉफ्टच्या शेअरच्या किमतीत 25 ते 30 टक्क्यांची घसरण झाली आहे, ज्यामुळे कंपनीच्या महसुलावर ताण आला आहे. अशा परिस्थितीत, सरळ टाळेबंदी करण्यापेक्षा ‘व्हीआरएस’ सारखा मवाळ मार्ग स्वीकारून आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे कंपनीला अधिक सोयीचे वाटत आहे.
या निर्णयाचा दुसरा पदर म्हणजे कंपनीचे बदलणारे प्राधान्यक्रम. या योजनेच्या निकषांमुळे प्रामुख्याने 50 वर्षांवरील अनुभवी कर्मचारी निवृत्तीच्या कक्षेत येत आहेत. मायक्रोसॉफ्ट आता आपल्या कार्यसंस्कृतीत अधिक तरुणांना सामावून घेण्यास उत्सुक असल्याचे दिसते. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन युगातील आव्हाने पेलण्यासाठी तरुण आणि तांत्रिकदृष्ट्या अधिक लवचिक असलेल्या मनुष्यबळाची गरज कंपनीला भासत आहे. 51 वर्षांची ही जुनी कंपनी आता नव्या काळाशी जुळवून घेण्यासाठी जुन्या संरचना मोडीत काढून एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहे, असेच या निर्णयावरून स्पष्ट होत आहे. या बदलाचा परिणाम केवळ मायक्रोसॉफ्टवरच नाही, तर आगामी काळात इतर टेक कंपन्यांच्या धोरणांवरही होण्याची दाट शक्यता आहे.– राकेश माने
Check Also
उधारी आली गळ्याशी….
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामध्ये मध्यस्थ बनून जागतिक पटलावर कॉलर ताठ करून फिरू पाहणाऱ्या पाकिस्तानला …
पांचजन्य वृत्तपत्र