लेख-समिक्षण

केशप्रत्यारोपण करताय?

केसांच्या समस्येमुळे आजकाल अनेक जण हतबल झालेले दिसतात. गळणारे केस आणि टक्कल पडण्याची भीती यांमुळे लाखो रुपये खर्च करून केशप्रत्यारोपण करण्याकडे कल वाढला आहे. मात्र, इतका खर्च करूनही सर्वांनाच अपेक्षित निकाल मिळतोच असे नाही. काही प्रकरणांमध्ये केस पुन्हा विरळ होतात किंवा शस्त्रक्रिया अपयशी ठरते. असे का घडते?
एफयूई आणि एफयूटीमधील फरक
केशप्रत्यारोपणाच्या प्रामुख्याने दोन पद्धती प्रचलित आहेत. या दोन्ही पद्धतींमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. एफयूटी ही जुनी पद्धत आहे. यात डोक्याच्या मागील भागातून त्वचेचा एक संपूर्ण थर काढला जातो आणि तो पुढच्या भागात टाके घालून बसवला जातो. या प्रक्रियेमुळे डोक्याच्या मागे कायमस्वरूपी खुणा राहतात. याउलट एफयूई हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आहे. यात यंत्राच्या सहाय्याने डोक्याच्या मागच्या भागातून केसांची मुळे एक-एक करून काढली जातात. यामुळे त्वचेला इजा होत नाही आणि जास्तीत जास्त मुळे सुरक्षितपणे काढता येतात. यात कोणतेही टाके घातले जात नसल्याने जखम लवकर भरून येते.
केवळ शस्त्रक्रिया करणे म्हणजे यश नव्हे. अनेकदा चुकीच्या नियोजनामुळे हे प्रयत्न फोल ठरतात. सर्वात आधी योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाला केशप्रत्यारोपणाची गरज असतेच असे नाही. रुग्णाची गरज आणि उपलब्ध डोन्डर एरिया म्हणजेच जिथून केस घ्यायचे आहेत, यांचा ताळमेळ बसणे गरजेचे आहे. ही शस्त्रक्रिया केवळ अनुभवी प्लास्टिक सर्जन किंवा त्वचारोग तज्ज्ञांकडूनच करून घ्यावी. अननुभवी व्यक्तीकडून केल्यास केसांची दिशा आणि घनता बिघडू शकते. तसेच आज केलेले प्रत्यारोपण 15 वर्षांनंतर कसे दिसेल, याचा विचार करूनच आराखडा तयार करणे आवश्यक असते. यशस्वी प्रत्यारोपणासाठी शस्त्रक्रियेनंतरचे 10 ते 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात जड व्यायाम किंवा वजन उचलणे टाळावे. केसांवर थेट पाणी टाकू नये किंवा डोके धुवू नये. पोहणे पूर्णपणे बंद ठेवावे. जास्त घाम येईल असे काम करू नये. शस्त्रक्रियेनंतर 10 दिवसांनी जेव्हा डॉक्टर स्वतः डोके धुतात, त्यानंतरच सामान्य दिनचर्या सुरू करता येते. याशिवाय डॉक्टरांनी दिलेली औषधे आणि पूरक आहार वेळेवर घेणे अनिवार्य आहे.

Check Also

जन्मानंतर बाळाचा रंग सावळा का होतो ?

बाळ जन्माला आले की, त्याचे गुलाबी-पांढरे रूप पाहून सर्वच जण सुखावतात. मात्र, काही आठवड्यांनंतर हळूहळू …