वाढत्या महागाईच्या काळात घरगुती गॅसचा खर्च कमी करणे हे गृहिणींसमोर मोठे आव्हान असते. आहारतज्ज्ञ आणि फूड ब्लॉगर नंदिता अय्यर यांनी गॅसची बचत करण्यासाठी काही वैज्ञानिक आणि व्यावहारिक पद्धती सांगितल्या आहेत. या नियमांचे पालन केल्यास गॅस सिलिंडर दुप्पट काळ टिकू शकतो.
स्वयंपाकाचे नियोजन आणि पूर्वतयारी : स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी काही साध्या गोष्टी केल्यास इंधनाची मोठी बचत होते. डाळी, राजमा, चणे किंवा तांदूळ शिजवण्यापूर्वी किमान अर्धा ते एक तास पाण्यात भिजत ठेवावेत. भिजवलेले धान्य लवकर शिजते, ज्यामुळे 30 ते 50 टक्क्यांपर्यंत गॅस वाचतो. तसेच, भाज्या कापताना त्या लहान आणि समान आकारात कापाव्यात. भाज्यांचे तुकडे जेवढे लहान असतील, तेवढ्या त्या लवकर शिजतात. स्वयंपाक प्रत्यक्षात सुरू करण्यापूर्वी सर्व तयारी पूर्ण असेल, तर गॅस विनाकारण जळत नाही.
प्रेशर कुकर आणि भांड्यांचा वापर : उघड्या भांड्यात स्वयंपाक केल्यास वाफेसोबत उष्णता बाहेर जाते, ज्यामुळे गॅस जास्त खर्च होतो. त्याऐवजी प्रेशर कुकरचा वापर करणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. कुकरमध्ये अन्न 30 ते 70 टक्के वेगाने शिजते. जर आपण साध्या भांड्यात शिजवत असाल, तर त्यावर नेहमी झाकण ठेवावे. झाकणामुळे भांड्यात वाफेचा दाब निर्माण होतो आणि अन्न 20 ते 25 टक्के लवकर शिजते. जर आपल्याकडे मल्टि-लेव्हल कुकर असेल, तर एकाच वेळी डाळ, तांदूळ आणि भाज्या शिजवून इंधनाची आणि वेळेची मोठी बचत करता येते.
गॅस बर्नर आणि भांड्यांची निवड
भांडे आणि बर्नर यांचा ताळमेळ असणे गॅस बचतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. लहान भांड्यासाठी मोठा बर्नर वापरल्यास गॅसची ज्योत भांड्याच्या कडांमधून बाहेर जाते आणि वाया जाते. गॅसची ज्योत नेहमी भांड्याच्या तळाच्या आतच राहील याची काळजी घ्यावी. तसेच, भांड्याचा तळ सपाट आणि जाड असावा. ’ट्राय-प्लाय’ स्टील किंवा कास्ट आयर्नची भांडी उष्णता लवकर शोषतात आणि जास्त काळ टिकवून ठेवतात, ज्यामुळे अन्न लवकर शिजण्यास मदत होते.
बर्नरची स्वच्छता आणि उर्वरित उष्णतेचा वापर : गॅसची ज्योत जर पिवळी किंवा नारंगी दिसत असेल, तर त्याचा अर्थ बर्नरमध्ये घाण साचली आहे आणि गॅस पूर्णपणे जळत नाही. नेहमी निळी ज्योत सर्वात जास्त उष्णता देते. त्यामुळे दर पंधरा दिवसांनी बर्नर स्वच्छ करावा. याशिवाय, अन्न पूर्णपणे शिजण्याच्या दोन ते तीन मिनिटे आधीच गॅस बंद करण्याची सवय लावावी. जाड तळाच्या भांड्यात साचलेली उष्णता आणि वाफ उरलेले 10 टक्के अन्न शिजवण्यासाठी पुरेशी असते. या छोट्या वाटणाऱ्या बदलांमुळे महिन्याच्या अखेरीस सिलिंडरच्या वापरात मोठी घट दिसून येते.
Check Also
टिपिंग पॉईंटस् ओलांडण्याचा महाधोका
जागतिक तापमानवाढीमुळे ‘टिपिंग पॉईंटस्’ची एक साखळी सुरू होऊ शकते, ज्यामुळे आपल्या ग्रहाला अराजकतेच्या किंवा गोंधळाच्या …
पांचजन्य वृत्तपत्र