लेख-समिक्षण

दुष्काळमुक्तीसाठी नवे पाऊल

येत्या मे 2027 पर्यंत महाराष्ट्रात 34 लाख 83 हजार 140 भूजल पुनर्भरण संरचनांची निर्मिती करण्याबरोबरच राज्यातील 18 हजार गावांमध्ये ‌‘जलयुक्त शिवार 3.0‌’ अभियान राबवण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे राज्याच्या 90 टक्के भागाला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जलसंधारणासाठी व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. पाऊस कमी पडणे ही नैसर्गिक आपत्ती असली, तरी पडलेल्या पावसाचे योग्य व्यवस्थापन करून दुष्काळाची तीव्रता निश्चितच कमी करता येऊ शकते. राज्य सरकारच्या नव्या कृती आराखड्याचे महत्त्व त्या दृष्टीने अधोरेखित होते.
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, तलावांची दुरुस्ती, शेततळी आणि भूजल पुनर्भरण खड्ड्यांच्या निर्मितीवर भर देण्यात आला. महाराष्ट्रातील दुष्काळाचा इतिहास पाहता दर काही वर्षांनी राज्य सरकारला दुष्काळ निवारणासाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करावी लागते. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, रोजगार हमीची कामे यासाठी सरकारी तिजोरीवर मोठा भार पडतो. या उपाययोजनांची तत्कालीन परिस्थितीत आवश्यकता असतेच. परंतु दुष्काळ निवारणावरील खर्चाबरोबरच दुष्काळ प्रतिबंधासाठी होणारी गुंतवणूक वाढवणे अधिक शहाणपणाचे ठरते.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून याच विचाराला प्राधान्य दिले होते. आता बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर या अभियानाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत पावसाच्या स्वरूपात लक्षणीय बदल झाला आहे. पावसाळ्यातील पावसाचे दिवस कमी होणे, अल्पावधीत प्रचंड पाऊस पडणे आणि त्यानंतर दीर्घकाळ पावसाची उघडीप राहणे, अशा परिस्थितीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. मुसळधार पावसामुळे जमिनीची धूप होते आणि मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते. जमिनीत पाणी मुरण्यास पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पावसाळ्यात पूर आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई, असे परस्परविरोधी चित्र एकाच प्रदेशात पाहायला मिळते. हवामान बदलाचे हे वास्तव लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या जलसंधारण धोरणाची फेररचना करण्याची आवश्यकता होती. राज्य सरकारने भूजल पुनर्भरणासाठी 34 लाखांहून अधिक संरचना उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ही विशेष महत्त्वाची बाब आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या सिंचनाची गरज भागवण्यात भूजलाचा मोठा वाटा आहे. गेल्या काही दशकांमध्ये विहिरी आणि कूपनलिकांच्या माध्यमातून पाण्याचा उपसा वाढला. त्या प्रमाणात भूजलाचे पुनर्भरण झाले नाही. अनेक भागांत अधिक खोलवर कूपनलिका खोदूनही पाणी मिळत नाही.
जागतिक बँकेशी संलग्न असलेल्या आंतरराष्ट्रीय विकास संघटनेशी झालेल्या करारानुसार राज्य सरकारने 1972 मध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची स्थापना केली. 1974 पासून गावनिहाय भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षणाला सुरुवात झाली, तर 1978 पासून पाणीटंचाई निवारणासाठी कूपनलिका खोदण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण करण्यासाठी 1993 मध्ये भूजल नियमन कायदा करण्यात आला. 2002 पासून भूजल व्यवस्थापनात लोकसहभाग वाढवण्यास, तर 2004 पासून गावपातळीवर पाण्याचा ताळेबंद मांडण्यास सुरुवात झाली. पुढील काळात जलयुक्त शिवार अभियान, अटल भूजल योजना आणि जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून भूजल पुनर्भरणाच्या कामांना अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले. महाराष्ट्राच्या घरगुती पाण्याच्या गरजेपैकी 80 टक्के आणि सिंचनाच्या गरजेपैकी सुमारे 50 टक्के गरज भूजलातून भागवली जाते. राज्याचा सुमारे 91 टक्के भौगोलिक प्रदेश कठीण खडकांनी व्यापलेला आहे, तर सुमारे एकतृतीयांश प्रदेश पर्जन्यछायेच्या आणि अवर्षणप्रवण क्षेत्रात येतो. कठीण खडकांमध्ये प्रामुख्याने भेगा आणि खडकांच्या विदारणातून निर्माण झालेल्या पोकळ्यांमध्ये पाणी साठते. त्यामुळे महाराष्ट्रात भूजल पुनर्भरणाची कामे करताना स्थानिक भूगर्भरचनेचा शास्त्रीय अभ्यास करणे अत्यंत आवश्यक ठरते.
भूगर्भात पाण्याचा साठा वाढवणे हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्याचा प्रभावी मार्ग आहे. विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण भागांसाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते. 50 किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक लांबीच्या हंगामी नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णयही दूरगामी परिणाम करणारा आहे. नदीपात्रातील अतिक्रमणे, गाळाचे संचयन आणि नैसर्गिक प्रवाहातील अडथळे यामुळे अनेक नद्यांची जलवहन क्षमता प्रभावित झाली आहे. नद्यांचे पुनरुज्जीवन करताना त्यांच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्राचा विचार केल्यास परिसरातील भूजलपातळी वाढण्यास मदत होऊ शकते. अर्थात, नदीपात्राचे सरसकट खोलीकरण करण्याऐवजी स्थानिक भूगर्भरचना आणि पर्यावरणाचा अभ्यास करून ही कामे करण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी जलसंधारणाच्या कामांचे शास्त्रीय नियोजन आणि नकाशांकन करण्यावर दिलेला भर त्यामुळे आश्वासक आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि अन्य योजनांमधील निधीचे एकत्रीकरण करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. आजवर जलसंधारणाची कामे विविध विभागांच्या माध्यमातून होत असल्यामुळे उपलब्ध निधीचा पुरेपूर विनियोग करण्यात अडचणी येत होत्या. योजनांच्या एकत्रीकरणामुळे प्रशासकीय अडथळे कमी होऊन कामांना गती मिळू शकते. शिवाय ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होण्यासही मदत होईल.
दुष्काळामुळे ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर रोखण्याच्या दृष्टीनेही या धोरणाचा फायदा होऊ शकतो. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढवण्याबरोबरच भारतीय तंत्रज्ञान संस्थांसारख्या संस्थांचे मार्गदर्शन घेण्याची सूचना केली आहे. महाराष्ट्रात राळेगणसिद्धी, हिवरेबाजार यांसारख्या गावांनी लोकसहभागातून जलसंधारणाची किमया साधली आहे. पाण्याचा ताळेबंद मांडणे, उपलब्ध पाण्यानुसार पीकपद्धती निश्चित करणे आणि पाण्याच्या अतिरिक्त उपशावर मर्यादा आणणे या सूत्रांचा अवलंब करून गावांची आर्थिक स्थिती पालटता येते, हे या गावांनी दाखवून दिले आहे. या अनुभवांचा लाभ जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात घेता येईल.
महाराष्ट्राला औद्योगिक विकासात आघाडीवर ठेवण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करत आहे. त्याचवेळी शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम करण्यासाठी जलसुरक्षेला प्राधान्य देण्याचे सरकारचे धोरण अभिनंदनीय आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील अनिश्चितता कमी करण्यासाठी शाश्वत सिंचनाची उपलब्धता अत्यंत आवश्यक आहे. जलसंधारणाच्या कामांचे मूल्यमापन त्यासाठी झालेल्या खर्चावरून करण्याऐवजी भूजलपातळीत झालेली वाढ, संरक्षित सिंचनाखाली आलेले क्षेत्र आणि टँकरमुक्त झालेल्या गावांची संख्या या निकषांवर केले पाहिजे. – नवनाथ वारे

Check Also

धमक्यांच्या विळख्यात महाराष्ट्र

रेल्वे स्थानके, न्यायालये, ऐतिहासिक वास्तू आणि चित्रपटसृष्टीतील नामवंत व्यक्तींना धमकावण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढत आहेत. आधुनिक …