चिपनिर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक साम्राज्यावर अनभिषिक्त सम्राटाप्रमाणे राज्य करणाऱ्या ‘एनव्हिडिया’ या महाकाय कंपनीच्या पायाखालील जमीन सध्या एका अनपेक्षित वादळामुळे हादरली आहे. हे प्रकरण कंपनीच्या सह-संस्थापकाच्या अनैतिक संबंधांचे असते तर त्याची चर्चा वेगळ्या परिप्रेक्ष्यात झाली असती; पण यामागे चिनी गुप्तचर यंत्रणेचे (मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी) षड्यंत्र असल्याचा आरोप, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेला संभाव्य धोका आणि अब्जावधी डॉलर्सच्या तंत्रज्ञानाची तस्करी असे गंभीर वळण लागल्यामुळे ते भारतासह संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरले आहे.
चीनचा ‘थाउजंड टॅलेंट्स प्लॅन‘
चीनला जागतिक तंत्रज्ञान महासत्ता बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टातून 2008 मध्ये बीजिंगने ‘थाउजंड टॅलेंट्स प्लॅन’ अर्थात हजारो प्रतिभावान तज्ज्ञांची भरती योजना सुरू केली होती. अमेरिकेतील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये, सरकारी प्रयोगशाळांमध्ये आणि बड्या खासगी तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अव्वल शास्त्रज्ञ, अभियंते आणि संशोधकांना चीनकडे आकर्षित करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. वरवर पाहता ही योजना केवळ शैक्षणिक देवाणघेवाण आणि संशोधनाला चालना देणारी वाटत असली, तरी तिचा खरा हेतू पाश्चात्य देशांतील अत्यंत प्रगत आणि संवेदनशील तंत्रज्ञान कायदेशीर व बेकायदेशीर मार्गांनी चीनमध्ये आणणे हा होता. सुरुवातीला पुढील पाच ते दहा वर्षांत सुमारे दोन हजार जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांना आपल्याकडे वळवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, परंतु 2018 पर्यंत या योजनेने तब्बल सात हजारांहून अधिक वरिष्ठ संशोधक आणि शास्त्रज्ञांना आपल्या जाळ्यात ओढण्यात यश मिळवले.
कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक चिपच्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या एनव्हिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांच्यासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. विवाहबाह्य संबंधांची कबुली दिल्यानंतर त्यांच्याविषयी चिनी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित संशय व्यक्त करण्यात आला आहे. हुआंग हे परदेशी गुप्तचर मोहिमेचे लक्ष्य असल्याच्या वृत्तांची चौकशी सुरू करण्यात येत असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एनव्हिडियाच्या समभागांत लक्षणीय घसरण झाली. हुआंग यांचे ॲलिस हुआंग नावाच्या महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले आहे. या महिलेचा चीनच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता वैयक्तिक आयुष्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. कंपनीची गोपनीय माहिती, राष्ट्रीय सुरक्षा आणि नेतृत्वावरील विश्वास असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
या संकटातून हुआंग आपले पद वाचवू शकतील का, याकडे तंत्रज्ञान क्षेत्राचे लक्ष लागले आहे. सामाजिक मानसशास्त्रज्ञ एडविन हॉलँडर यांनी 1958 मध्ये मांडलेल्या ‘इडिओसिंक्रसी क्रेडिट्स’ नावाची एक संकल्पना मांडली होती. त्यानुसार एखादी व्यक्ती सातत्याने चांगली कामगिरी करते, समूहाच्या अपेक्षा पूर्ण करते आणि सहकाऱ्यांचा विश्वास संपादन करते, तेव्हा तिच्याविषयी सद्भावनेचा एक प्रकारचा संच किंवा साठा निर्माण होतो. साहजिकच, पुढे त्या व्यक्तीकडून चूक झाली किंवा तिचे वर्तन अपेक्षेपेक्षा वेगळे आढळले, तरी पूर्वीच्या कामगिरीमुळे तिला काही प्रमाणात सहानुभूती आणि दुसरी संधी मिळू शकते. जेन्सेन हुआंग यांनी 1993 मध्ये एनव्हिडियाची सहस्थापना केली. त्यानंतर तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी कंपनीचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली एनव्हिडियाने जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यामुळे कंपनीचे संचालक मंडळ, कर्मचारी आणि गुंतवणूकदार यांच्यात त्यांनी मिळवलेला विश्वास सध्याच्या संकटात उपयोगी पडू शकतो. मात्र, एखाद्या बिझनेस लीडरचे वर्तन स्वार्थी असल्याचे किंवा संस्थेच्या मूलभूत मूल्यांना धक्का देणारे असल्याचे आढळल्यास पूर्वीची विश्वासार्हता झपाट्याने कमी होऊ शकते, हे वास्तव आहे. हुआंग यांच्याबाबतीतही हाच प्रश्न निर्णायक ठरणार आहे.
एनव्हिडियामध्ये सुमारे 42 हजार कर्मचारी कार्यरत असून, कंपनीत माहितीच्या सुरक्षेसाठी कठोर नियम लागू आहेत. अत्याधुनिक चिपच्या निर्यातीवर अमेरिकन सरकारचे नियंत्रण असल्याने कंपनीचे कामकाज राष्ट्रीय सुरक्षेशीही संबंधित आहे. त्यामुळे हुआंग यांना संबंधित महिलेच्या कथित गुप्तचर संबंधांची माहिती होती का आणि कंपनीची कोणतीही गोपनीय माहिती चीनपर्यंत पोहोचली का, हे चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक आहे. हुआंग यांची फसवणूक झाल्याचे सिद्ध झाले, तर त्यांच्या दीर्घकालीन कामगिरीचा फायदा त्यांना मिळू शकतो. तंत्रज्ञान क्षेत्रात वादग्रस्त प्रकरणांमुळे पद सोडावे लागलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अन्य कंपन्यांमध्ये आपली कारकीर्द पुन्हा उभी केली आहे. उदाहरणार्थ, ‘एचपी’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क हर्ड यांनी 2010 मध्ये एका कंत्राटदाराशी असलेले वैयक्तिक संबंध लपवण्यासाठी खर्चाच्या नोंदी चुकीच्या केल्याच्या प्रकरणानंतर राजीनामा दिला होता. त्यानंतर अवघ्या महिनाभरात ते ओरॅकलमध्ये दाखल झाले. मात्र, हुआंग यांची परिस्थिती वेगळी आहे. त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या ‘एनव्हिडिया’चे तीन दशकांहून अधिक काळ नेतृत्व केले आहे. त्यामुळे कंपनी सोडून दुसरीकडे जाणे हा त्यांच्यासाठी तितकासा सोपा पर्याय नाही. दुसरीकडे, त्यांच्या जागी नवा मुख्य कार्यकारी अधिकारी निवडणेही एनव्हिडियासाठी आव्हानात्मक ठरू शकते.
हुआंग यांनी कंपनीत व्यवस्थापनाची तुलनेने सरळ रचना ठेवली आहे. सुमारे 60 वरिष्ठ अधिकारी थेट त्यांना अहवाल देतात. त्यामुळे त्यांचा स्पष्ट उत्तराधिकारी कोण, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. या प्रकरणानंतर हुआंग यांनी रविवारी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये विवाहबाह्य संबंधांची कबुली दिली. पत्नी आणि मुलांच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांनी माफी मागितली. माफी मागितल्याने झालेले नुकसान भरून निघणार नाही; मात्र कालांतराने कुटुंबाचा विश्वास पुन्हा मिळवता येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. हुआंग यांच्या वैयक्तिक वर्तनाबाबत निर्माण झालेला वाद आणि कथित गुप्तचर संबंधांची चौकशी या दोन बाबींचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. वैयक्तिक चुकीबद्दल माफी मागून विश्वास पुन्हा संपादन करण्याची संधी त्यांना मिळू शकते. मात्र, कंपनीच्या गोपनीय माहितीच्या सुरक्षेबाबत गंभीर निष्कर्ष समोर आल्यास त्यांच्या दीर्घकालीन नेतृत्वाची प्रतिष्ठाही अपुरी ठरू शकते. -नरेंद्र क्षीरसागर
Check Also
लक्ष्मीपूजनाचा मतितार्थ
दीपावलीतील लक्ष्मीपूजनाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. धन, धान्य, ऐश्वर्य, सौभाग्य आणि समृद्धीची अधिष्ठात्री …
पांचजन्य वृत्तपत्र