चेहऱ्यावरील काळे आणि तपकिरी डाग ही सध्या एक सामान्य समस्या बनली आहे. प्रखर ऊन, मुरुमांचे वण, संप्रेरकांमधील बदल (हार्मोनल चेंजेस) किंवा पिगमेंटेशनमुळे त्वचेचा पोत आणि रंग असमान दिसू लागतो.
यावर उपाय म्हणून अनेक जणी महागड्या रासायनिक उत्पादनांचा आधार घेतात, मात्र गुळ आणि लिंबू यांसारख्या घरात सहज उपलब्ध होणाऱ्या घटकांचा वापर करूनही त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवता येते.
लिंबामध्ये निसर्गतः व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे त्वचेवरील डाग हलके करण्यास आणि त्वचा उजळण्यास मदत करते. दुसरीकडे, गुळामध्ये असणारे सूक्ष्म कण नैसर्गिक ’एक्सफोलिएटर’ म्हणून काम करतात. गुळामुळे त्वचेवरील मृत पेशी (डेड स्किन) निघून जाण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार दिसते.
या दोन्हीचे मिश्र्ण त्वचेला नैसर्गिक चमक (नॅचरल ग्लो) देण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकते.
हा फेस पॅक तयार करण्यासाठी प्रथम स्वच्छ आणि मऊ गुळाचा एक छोटा तुकडा घेऊन तो किसून घ्यावा. त्यामध्ये 4 ते 5 थेंब ताज्या लिंबाचा रस मिसळावा.
लिंबाचा रस जास्त प्रमाणात वापरू नये, कारण त्यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. जर हे मिश्रण खूप घट्ट वाटत असेल, तर त्यात 1 ते 2 थेंब पाणी टाकून मध्यम स्वरूपाची पेस्ट तयार करावी.
तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावरील डाग असलेल्या भागावर लावावी आणि 10 ते 15 मिनिटांपर्यंत तशीच राहू द्यावी. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.
चांगल्या परिणामांसाठी हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा केला जाऊ शकतो.
घरगुती उपाय असल्याने याचा परिणाम हळूहळू दिसून येतो, त्यामुळे नियमितता ठेवणे गरजेचे आहे.
त्वचा संवेदनशील असेल, तर प्रयोग करण्यापूर्वी ’पॅच टेस्ट’ नक्की करून पहावी.
Check Also
वृत्तपत्र वाचन आणि क्रिटिकल थिंकिंग
आजच्या काळात मुलांच्या हातात माहिती पोहोचण्यासाठी अनेक साधने आहेत. मोबाईल, समाजमाध्यमे, संकेतस्थळे, व्हिडीओ आणि विविध …
पांचजन्य वृत्तपत्र