लेख-समिक्षण

रुपेरी पडद्यावरील ‌‘झुला‌’

हिरवाईने नटलेली बाग, झाडाच्या फांदीला बांधलेला झुला आणि त्यावर झुलणारी नायिका… हिंदी चित्रपटातील हे दृश्य कधीकाळी इतके परिचित होते, दर पाच चित्रपटांपैकी एकामध्ये त्याचे दर्शन घडत असे. प्रेमाची चाहूल असो, प्रियकराची प्रतीक्षा असो, माहेरच्या आठवणी असोत किंवा तरुण मनाचा बेधुंद बहर असो; आनंदझुला या सगळ्याचा साक्षीदार होता. काळ बदलला, चित्रपटांची भाषा बदलली आणि या बदलात झुल्याच्या तालावर डोलणारी गाणीही हळूहळू पडद्याआड गेली. मात्र जुन्या चित्रपटसंगीताच्या आठवणींत ती आजही तितकीच टवटवीत आहेत.- सोनम परब

हिंदी चित्रपटांत दिसणारा झुला हा एकेकाळच्या समाजजीवनाचाही भाग होता. विशेषतः श्रावण महिन्यात देशभरातील गावाखेड्यांमधील अनेक भागांत झाडांना झुले बांधले जात. मुली, नवविवाहिता, सासरी गेलेल्या लेकी यांच्यासाठी माहेर, मैत्रिणी, गाणी आणि झुल्याचा आनंद हा आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होता. लोकगीतांतून आलेली ही परंपरा चित्रपटांनी सहज स्वीकारली. त्यामुळे 1950 ते 1980 या काळातील अनेक चित्रपटांत झुला हा कथानकाच्या भावविश्वाचा भाग बनला.
झुल्यावर चित्रित झालेल्या गाण्यांत प्रेमाचा रंग सर्वाधिक दिसतो. झुल्यावरची नायिका आणि तिच्या मनात प्रियकराची आठवण, हा हिंदी चित्रपटांचा आवडता प्रसंग. ‌‘जुर्माना‌’मधील ‌‘सावन के झूले पड़े, तुम चले आओ‌’ हे त्याचे सुंदर उदाहरण. राखीवर चित्रित झालेल्या या गीतात श्रावणाचा आनंद असूनही प्रिय व्यक्तीच्या अनुपस्थितीची हुरहूर आहे. लता मंगेशकरांचा स्वर त्या प्रतीक्षेला अधिक हळवा करतो.
याच भावनेचे दुसरे रूप ‌‘दो बीघा जमीन‌’मधील ‌‘हरियाला सावन ढोल बजाता आया‌’मध्ये दिसते. शैलेंद्र यांचे शब्द, सलिल चौधरींचे संगीत आणि मन्ना डे-लता मंगेशकरांचे स्वर यामुळे पावसाळ्याचा उत्साह पडद्यावर जिवंत होतो. गाव, शेती, पाऊस आणि श्रावणाचा आनंद या साऱ्यांमध्ये झुला अगदी स्वाभाविकपणे मिसळतो. तेथे तो वेगळा ‌‘प्रॉप‌’ न वाटता जगण्याचाच एक भाग असतो.
‌‘झूले में पवन के आई बहार‌’
‌‘बैजू बावरा‌’मधील ‌‘झूले में पवन के आई बहार‌’ या गीताने तर झुल्याच्या गाण्यांना वेगळीच उंची दिली. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकरांच्या स्वरांतील हे गीत आजही जुन्या हिंदी चित्रपटसंगीताच्या चाहत्यांच्या स्मरणात आहे. झुल्याच्या हालचालीबरोबर गीताची लय पुढे सरकते. वाऱ्याची झुळूक, प्रेमाचा नवा अंकुर आणि निसर्गाचे प्रसन्न रूप यांचा त्यात सुंदर मेळ साधला आहे.
हिंदी चित्रपटांनी झुल्याचा उपयोग केवळ आनंद व्यक्त करण्यासाठी केला नाही. विरह, प्रतीक्षा आणि मनातील अस्वस्थताही त्याच माध्यमातून व्यक्त झाली. झुला एका क्षणी आकाशाकडे झेपावतो आणि दुसऱ्या क्षणी पुन्हा जमिनीकडे येतो. प्रेमातील आशा-निराशेच्या आंदोलनाशी ही हालचाल सहज जुळत असल्याने दिग्दर्शकांसाठी झुला प्रभावी दृश्यप्रतिमा ठरला.
झुल्याच्या गाण्यांची परंपरा हिंदी चित्रपटांच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून दिसते. ‌‘देवदास‌’मधील ‌‘झूला किनारे‌’सारख्या गीतांपासून पुढे अनेक चित्रपटांनी ही परंपरा जपली. ‌‘बहू बेगम‌’मधील ‌‘पड़ गए झूले, सावन रुत आई रे‌’मध्ये श्रावण आणि स्त्रीमनातील उत्साह यांचा सुरेख संगम आहे. अशा गीतांमध्ये नायिकेच्या भोवती मैत्रिणी असतात, हास्य असते, हिरवाई असते आणि त्यातून स्त्रियांचे स्वतंत्र भावविश्व पडद्यावर आकार घेत असते.
‌‘निगाहें‌’मधील ‌‘सावन के झूलों ने मुझको बुलाया‌’सारख्या नंतरच्या काळातील गाण्यांनीही हीच परंपरा पुढे नेली. ‌‘सावन‌’ हा शब्द हिंदी चित्रपटसंगीतात केवळ ऋतू दर्शवणारा राहिला नाही; तो आठवणी, प्रेम, विरह आणि पुनर्भेट यांचा संकेत बनला.
त्या काळातील नायिकेच्या भावना व्यक्त करण्यासाठी आजच्यासारख्या वेगवान दृश्यांची किंवा भव्य नृत्यरचनेची गरज नव्हती. एखादा झुला, पावसाने चिंब झालेली बाग, दोन-चार सख्या आणि अर्थपूर्ण शब्दरचना एवढ्यांतून तिचे मन उलगडत असे. कधी ती प्रियकराला बोलावत असे, कधी त्याची आठवण काढत असे, तर कधी श्रावणाच्या निमित्ताने माहेरच्या आठवणींमध्ये रमून जात असे. ‌‘हाय हाय ये मजबूरी, ये मौसम और ये दूरी‌’सारख्या गीतांत पावसाळा आणि विरह एकत्र आले. प्रत्येक गाण्यात प्रत्यक्ष झुलाच केंद्रस्थानी नसला, तरी श्रावणाच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या भावविश्वात झुला, पाऊस, हिरवाई आणि विरह हे परस्परांशी घट्ट जोडले गेले होते.
1990 नंतर हिंदी चित्रपटांतील प्रेम व्यक्त करण्याची दृश्यभाषा झपाट्याने बदलली. गावातील बागांची जागा परदेशातील लोकेशन्सनी घेतली; झाडाला बांधलेल्या झुल्याऐवजी बर्फाच्छादित पर्वत, समुद्रकिनारे, क्लब आणि भव्य सेट आले. नृत्यरचना अधिक वेगवान झाली. संगीताच्या तालातही बदल झाला. साहजिकच झुल्यावर निवांत बसून पूर्ण कडवे म्हणणाऱ्या नायिकेला पडद्यावर मिळणारी जागा कमी होत गेली.
अर्थात, झुला पूर्णपणे नाहीसा झाला असे नाही. काही चित्रपटांत तो सजावटीचा भाग म्हणून दिसतो; लग्नसोहळे, मेहंदी किंवा पारंपरिक प्रसंगांमध्येही त्याचा वापर होतो. पण पूर्वीसारखे संपूर्ण गाणे झुल्याभोवती गुंफण्याची पद्धत दुर्मीळ झाली आहे. त्या जुन्या गाण्यांची गंमत अशी, की ती ऐकण्यासाठी आज चित्रपट पाहण्याचीही गरज भासत नाही. ‌‘सावन के झूले पड़े‌’, ‌‘झूले में पवन के आई बहार‌’ किंवा ‌‘पड़ गए झूले, सावन रुत आई रे‌’चे सूर कानावर पडले की जुन्या हिंदी चित्रपटातील झुल्यावर डोलणारी नायिका डोळ्यांसमोर उभी राहते.
शैलेंद्र, शकील बदायुनी, मजरूह सुलतानपुरी यांच्यासारख्या गीतकारांनी निसर्गप्रतिमांचा वापर प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी अत्यंत सहजपणे केला. संगीतकारांनीही त्याला लोकसंगीताची लय दिल्यामुळे ही गाणी शहरातील प्रेक्षकांनाही गावाकडच्या श्रावणाशी जोडत असत.
झुल्याच्या गाण्यांत समूहाने गाण्याची आणि आनंद साजरा करण्याची संस्कृतीही दिसत असे. नायिकेबरोबर तिच्या सख्या, गावातील मुली किंवा कुटुंबातील स्त्रिया असत. एक जण झुल्यावर बसलेली, दुसरी तिला झोका देणारी आणि बाकीच्या ताल धरून गाणाऱ्याहे दृश्य त्या काळातील अनेक चित्रपटांतून परिचित झाले. त्यामुळे या गाण्यांना एकट्या नायक-नायिकेच्या प्रेमकथेपलीकडचे सामाजिक रूप मिळाले. हरियाली तीज, श्र्ावणातील माहेरपण, नवविवाहितेची ओढ आणि मैत्रिणींचा सहवास अशा अनेक सांस्कृतिक छटा त्यातून पडद्यावर आल्या. आजच्या चित्रपटांमध्ये सणांचे भव्य चित्रण दिसते; पण अशा छोट्या, घरगुती आनंदाचे चित्रण तुलनेने विरळ झाले आहे.
विशेष म्हणजे झुला हिंदी चित्रपटात मनःस्थितीनुसार आपला अर्थ बदलत गेला. आनंदाच्या प्रसंगात तो स्वातंत्र्याची झेप वाटे; प्रेमगीतामध्ये तो प्रणयाची लय बने आणि विरहाच्या प्रसंगात त्याच झुल्याची हालचाल अस्वस्थ प्रतीक्षेचे रूप घेई. त्यामुळे जुन्या दिग्दर्शकांना मोठा सेट किंवा दृश्यचमत्कार न करता एका साध्या झुल्यातून नायिकेच्या मनातील अनेक छटा दाखवता येत असत. कदाचित म्हणूनच त्या काळातील झुल्याची गाणी आजही स्मरणात राहिली आहेत.

Check Also

कंगना-तापसी वाद पुन्हा पेटला

कंगना रणौत आणि तापसी पन्नू यांच्यातील जुना शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. काही …