अभिनेता वेदांग रैना आणि बॉलिवूडचे दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांची नात नाओमिका सरन यांना मुंबईत एकत्र पाहण्यात आले आहे. हे दोघे जण चित्रपटगृहाबाहेर एकत्र स्पॉट झाल्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईतील जुहू येथील एका मल्टिप्लेक्सबाहेर अचानक समोर आलेल्या कॅमेऱ्यांमुळे नाओमिका सरन काहीशी लाजली आणि तिने हसत स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. लिफ्टकडे जात असताना घडलेल्या या प्रसंगावर वेदांग रैना अत्यंत शांत दिसत होता आणि तो नाओमिकाच्या प्रतिक्रियेवर हसत होता. ही जोडगोळी लवकरच एका आगामी चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहेत. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटातून नाओमिका सरन बॉलिवूडमध्ये आपले पदार्पण करत आहे. सेटवरून लीक झालेल्या काही माहितीनुसार या चित्रपटाचे नाव ‘जान है तू मेरी’ असल्याचे समजते असून, याचे दिग्दर्शन जगदीप सिद्धू करत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
नाओमिका सरन ही माजी अभिनेत्री रिंके खन्ना आणि उद्योगपती समीर सरन यांची कन्या आहे. म्हणजेच ती दिग्गज अभिनेते राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची नात, तर ट्विंकल खन्ना आणि सुपरस्टार अक्षय कुमार यांची भाची आहे. दुसरीकडे, ‘द आर्चीज’ आणि ‘जिगरा’ फेम अभिनेता वेदांग रैना याचे नाव यापूर्वी अभिनेत्री खुशी कपूरसोबत जोडले जात होते, परंतु काही काळापूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता नाओमिका आणि वेदांग यांच्या या नव्या केमिस्ट्रीमुळे चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.- अवंती कारखानीस
Check Also
आमिषाबाईंचे टीकास्र
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्याच्या पिढीतील अभिनेत्रींवर आणि त्यांच्या प्रसिद्धी मिळवण्याच्या पद्धतींवर …
पांचजन्य वृत्तपत्र