प्रयत्न सोडू नका

‘रील्स‌’ बनवणाऱ्या असहाब अहमद अन्सारी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेत अपयश आल्यानंतरही जिद्द न हारता कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी सीजीएल) परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. उत्तर प्रदेशातील टांडा या छोट्या गावातील रहिवासी असलेल्या असहाब यांनी शालेय शिक्षणात उत्तम गुण मिळवले होते. त्यानंतर कोटा येथे जाऊन त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि पुढे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून अभियांत्रिकीची (बीटेक) पदवी पूर्ण केली.
अभियांत्रिकी पूर्ण झाल्यावर 2017 मध्ये त्यांनी दिल्लीतील मुखर्जी नगर येथे जाऊन यूपीएससीची तयारी सुरू केली. त्यांनी यूपीएससी पूर्व परीक्षा दिली, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. यूपीएससीमध्ये यश न मिळाल्याने त्यांनी आपला मोर्चा एसएससी सीजीएल परीक्षेकडे वळवला. मात्र, येथेही नशिबाने त्यांची कडक परीक्षा घेतली. एका प्रयत्नात अवघ्या 0.5 गुणाने, तर दुसऱ्या प्रयत्नात फक्त एका गुणाने त्यांची अंतिम निवड हुकली. हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होता. कोविडच्या टाळेबंदीच्या काळात ते आपल्या गावी परतले आणि या मोकळ्या वेळेत त्यांनी सोशल मीडियावर शैक्षणिक कंटेंट तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिला व्हिडिओ यूपीएससी परीक्षेवर आधारित तयार केला होता. हळूहळू शिक्षण क्षेत्राशी संबंधित रील्स बनवण्यात त्यांची रुची वाढली आणि त्यांचे फॉलोअर्सही मोठ्या प्रमाणावर वाढले. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर सक्रिय असतानाही त्यांनी आपला अभ्यास कधीही थांबवला नाही.
एसएससी सीजीएल 2025 चा मूळ निकाल एप्रिल 2026 मध्ये जाहीर झाला असून त्यामध्ये असहाब यांना 311 गुण मिळाले होते आणि अवघ्या एका गुणाने ते अंतिम निवडीतून बाहेर पडले होते. परंतु, काही दिवसांनंतर आयोगाने सुधारित निकाल घोषित केला, ज्यामध्ये कट-ऑफ गुण 311 वर आले. या सुधारित निकालामुळे त्यांचे नशीब बदलले आणि त्यांची आयकर विभागात ऑफिस सुपरिटेंडेंट पदावर निवड झाली. अनेक अपयशांनंतर आणि अत्यंत जवळून संधी हुकल्यानंतरही केवळ सातत्य राखल्यामुळे अखेर त्यांची निवड झाली हे वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?

Check Also

मंगळ का पडला कोरडा ?

आपल्या शेजारचा लाल ग्रह ‌‘मंगळ‌’ नेहमीच खगोलशास्त्रज्ञांसाठी कुतूहलाचा बनून राहिलेला आहे. या ग्रहावर एकेकाळी वाहते …