सर्वात भयावह आणि महाकाय पक्षी

सुमारे 1 कोटी 20 लाख वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर एक महाकाय व भयावह पक्षी अस्तित्वात होता. हा आतापर्यंतचा ज्ञात असा सर्वाधिक मोठ्या आकाराचा, आक्रमक पक्षी आहे. त्याची उंची तब्बल नऊ फुटांची होती! आता अशा एका प्रागैतिहासिक काळातील पक्ष्याचे जीवाश्म सापडले आहेत. त्याच्या जीवाश्मभूत पायाच्या थ्रीडी ॲनालिसिस वरून असे दिसून येते की, अशा भयावह पक्ष्याची सध्याच्या मगरींसारख्या तत्कालीन प्राण्याने शिकार केली होती.
कोलंबियातील टाटाकोआ वाळवंटातील ला वेंटा परिसरात हे जीवाश्म सापडले होते. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‌‘पेपर्स इन पॅलिओंटोलॉजी‌’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे. कोलंबियाच्या भूमीवर एकेकाळी ‌‘टेरर बर्डस्‌’ असे ज्यांना संबोधले जाते ते ‌‘फोरुश्रॅसिड‌’ कुळातील महाकाय पक्षी अस्तित्वात होते. हे शिकारी पक्षी आकाशात उडू शकत नव्हते. ज्या पक्ष्याचे जीवाश्म सापडले आहेत, त्याच्या पायाची नळी अगदी मानवाच्या पायाच्या नळीसारखी आहे! याचा अर्थ हा पक्षी यापूर्वी सापडलेल्या जीवाश्म नमुन्यातील अन्य ‌‘टेरर बर्डस्‌’च्या तुलनेत 5 टक्के ते 20 टक्के अधिक मोठ्या आकाराचा होता. त्याचे वजन कदाचित 156 किलो होते आणि त्याची उंची तब्बल 9 फूट इतकी होती! इतक्या मोठ्या आकाराचा आक्रमक शिकारी पक्षी असूनही त्याची त्या काळी शिकार झाली होती. ही शिकार तितक्याच महाकाय मगरीने केली होती. ‌‘पुरुसॉरस‌’ नावाच्या कुळातील मगरीसारख्या जलचर प्राण्याकडून त्याची शिकार झाली होती. या मगरींचा आकार 30 फूट लांबीचा होता. या मगरीच्या दातांच्या खुणा त्याच्या पायाच्या हाडांवर आहेत. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील सिओभान कूक यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

Check Also

मंगळ का पडला कोरडा ?

आपल्या शेजारचा लाल ग्रह ‌‘मंगळ‌’ नेहमीच खगोलशास्त्रज्ञांसाठी कुतूहलाचा बनून राहिलेला आहे. या ग्रहावर एकेकाळी वाहते …