क्रीडा क्षेत्रात एखाद्या खेळाडूची पात्रता किंवा अपात्रता ठरवताना अनेकदा त्याच्या अंगभूत क्षमतेपेक्षा नियमांचा बागुलबुवा जास्त केला जातो. काही वेळा तर सक्षम खेळाडूला केवळ आकसापोटी किंवा पूर्वग्रहामुळे मैदानातून बाहेर ठेवण्यासाठी नियमांचे निमित्त पुढे केले जाते. दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय कुश्ती महासंघाच्या म्हणजेच डब्लूएफआयच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत दिलेली चपराक क्रीडा क्षेत्रातील राजकारणाचा बुरखा फाडणारी आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, आपल्या देशात आई होणे हा कोणताही गुन्हा नाही आणि कुस्ती महासंघाने कोणत्याही खेळाडूबद्दल सूडाच्या भावनेने काम करू नये. या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर न्यायालयाने प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला आशियाई खेळांच्या निवड चाचणीत सहभागी होण्यास परवानगी दिली आहे.
भारताची एक अत्यंत यशस्वी आणि आघाडीची महिला कुस्तीपटू असलेल्या विनेश फोगाटने मातृत्वानंतर पुन्हा एकदा कुस्तीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केली होती. परंतु, भारतीय कुश्ती महासंघाने डोपिंग विरोधी नियमांचा चुकीचा हवाला देत विनेशला घरगुती स्पर्धांमध्ये खेळण्यास अपात्र घोषित केले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने यावर अत्यंत रोखठोक सवाल उपस्थित केला की, जेव्हा एखादी खेळाडू देशाची अव्वल दर्जाची आणि स्थापित कुस्तीपटू राहिलेली आहे, तेव्हा अचानक नियमांमध्ये बदल करून तिला स्पर्धेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न का केला जात आहे? क्रीडा प्रशासनाची ही भूमिका केवळ पूर्वग्रहदूषित नसून विनेशने भूतकाळात घेतलेल्या काही भूमिकांबद्दल सूड उगवणारी आहे, हे स्पष्ट दिसते.विनेश फोगाटचे क्रीडा कारकीर्द आव्हानांनी आणि संघर्षाने भरलेली राहिली आहे. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केवळ तांत्रिक कारणास्तव तिच्या पदकाची संधी हुकली होती, परंतु त्या मोठ्या धक्क्यातून सावरून तिने पुन्हा उभे राहण्याचे धाडस दाखवले. त्यानंतर काही काळापूर्वी ती आई झाली आणि मातृत्व रजेमुळे ती काही काळ खेळाच्या मैदानापासून दूर राहिली होती. परंतु, आई होणे किंवा काही काळ मैदानाबाहेर राहणे हे एखाद्या खेळाडूचे कारकीर्द संपवण्याचे कारण असू शकत नाही. आई झाल्यानंतरही महिला खेळाडू आपल्या कौशल्यात अजिबात मागे पडत नाहीत, हे जागतिक क्रीडा जगताने वारंवार पाहिले आहे. जगाच्या पाठीवर अशी अनेक उदाहरणे आहेत, जिथे महिला खेळाडूंनी मातृत्वानंतर खेळात पुनरागमन करत पूर्वीपेक्षाही अधिक चमकदार कामगिरी केली असून अनेक जागतिक पदके जिंकली आहेत. मातृत्व हे महिलांच्या क्रीडा क्षमतेमध्ये कधीही अडथळा बनू शकत नाही, हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे क्रीडा महासंघांनी पूर्वग्रह, वैयक्तिक आकस किंवा सूडाचे राजकारण बाजूला ठेवून खेळाडूच्या गुणवत्तेचे आणि क्षमतेचे योग्य मूल्यमापन करणे गरजेचे आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचा विनेश फोगाटच्या बाजूने आलेला हा निर्णय केवळ एका खेळाडूचा विजय नसून, मातृत्वानंतर पुन्हा उभ्या राहू पाहणाऱ्या प्रत्येक महिला खेळाडूच्या आत्मसन्मानाला मिळालेली मोठी कौतुकाची थाप आहे.
– जगदीश काळे
Check Also
महिला सुरक्षिततेपुढील गंभीर आव्हाने
नवी दिल्लीतील नबी करीम परिसरातून नुकतीच एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. …
पांचजन्य वृत्तपत्र