तेलंगणाचा रहिवासी असलेल्या सैकेश गौडने आयआयटी वाराणसीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. शिक्षण पूर्ण होताच त्याला सॉफ्टवेअर क्षेत्रात वार्षिक 28 लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली. कॉर्पोरेट जगतात उत्तम भवितव्य असतानाही सैकेशच्या मनात स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करण्याचे विचार घोळत होते. याच काळात त्याची भेट हेमाम्बर रेड्डी आणि मोहम्मद सामी उद्दीन यांच्याशी झाली. हेमाम्बर हे त्यावेळी भारतातील मांस उद्योगाचा अभ्यास करत होते. किरकोळ मांस विक्री क्षेत्रात असलेल्या प्रचंड संधी ओळखून सैकेशने नोकरीचा राजीनामा दिला आणि या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला.
हा व्यवसाय केवळ पारंपरिक पद्धतीने न करता शास्त्रीय आणि आधुनिक पद्धतीने पुढे नेण्यासाठी त्यांनी हैदराबाद येथील राष्ट्रीय मांस संशोधन संस्थेच्या एका कार्यक्रमात सहभाग घेतला. तेथे त्यांनी स्वच्छता, प्रक्रिया आणि योग्य उत्पादन पद्धतींचे तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यानंतर 2020 मध्ये या तिघांनी मिळून ‘कंट्री चिकन कंपनी’ची स्थापना केली.
सुरुवातीला आयआयटी पदवीधर मुलगा कोंबड्या विकतोय म्हणून लोकांनी त्यांची खूप चेष्टा केली. मात्र, त्यांनी या टीकेकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी चिकनच्या पॅकेजिंगमध्ये एक वेगळा प्रयोग केला. ग्राहकांना आकर्षक अशा ‘गिफ्ट बॉक्स’ स्वरूपात प्रीमियम दर्जाचे देशी चिकन देण्यास त्यांनी सुरुवात केली. ही स्वच्छ आणि आधुनिक पद्धत ग्राहकांच्या पसंतीस उतरली.
आज दक्षिण भारतातील 15 हजारांहून अधिक पोल्ट्री शेतकऱ्यांचे जाळे त्यांनी विणले आहे, ज्यांच्याकडून थेट खरेदी करून शेतकऱ्यांनाही चांगला नफा मिळवून दिला जात आहे. जानेवारी 2022 मध्ये अवघी 3 लाख रुपये प्रतिमहिना असलेली या कंपनीची उलाढाल आज प्रतिमहिना 1.2 कोटी रुपयांच्या पार पोहोचली आहे.
काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास मनी बाळगूण जिद्दिने प्रयत्न करणारेच यशस्वी होतात ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
सर्वात वेगाने वाढणारा गहू
आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा नेहमीच पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठीही मोठा उपयोग झालेला आहे. ‘नासा’ या अमेरिकन …
पांचजन्य वृत्तपत्र