इजिप्तच्या तीन-चार हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीच्या खुणा आजही पिरॅमिड, मकबरे व प्राचीन कलाकृतींच्या स्वरूपात पाहायला मिळतात. त्यापैकीच एक कलाकृती म्हणजे 3,370 वर्षांपूर्वीच्या राणी नेफरतितीचा पुतळा. या पुतळ्याचा शोध लागल्यापासून तो जर्मनीतच आहे. एका इजिप्शियन पुरातत्त्वज्ञाने बर्लिनमध्ये असलेला हा राणी नेफरतितीचा अर्धपुतळा परत करण्याची मागणी केली आहे; तर जर्मनीने तसे करण्यास नकार दिला आहे.
नेफरतिती प्राचीन इजिप्तच्या इतिहासातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावशाली राणी होती. ती फेरो (राजा) अखेनातेनची पत्नी होती. फेरो अखेनातेन हा इजिप्तच्या अठराव्या राजवंशातील एक महत्त्वाचा शासक होता. अखेनातेनच्या कारकिर्दीत इजिप्तमध्ये धार्मिक क्रांती झाली. अतेनच्या- सूर्यपूजनाला महत्त्व याच कालखंडात प्राप्त झाले तर नेफरतितीने या नवीन धार्मिक परंपरेमध्ये आपल्या पतीला पाठिंबा दिला. नेफरतितीची प्रतिमा इजिप्तमधील अनेक कलाकृतींमध्ये आढळते. तिचा प्रसिद्ध रंगीत चुनखडीचा अर्धपुतळा 1912 साली जर्मन पुरातत्त्वज्ञांनी अमार्ना शहरातून शोधून काढला. आज तो प्रसिद्ध पुतळा बर्लिनच्या न्यूस म्युझियममध्ये आहे. नेफरतिती ही केवळ तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध नव्हती, तर ती एक बुद्धिमान आणि शक्तिशाली स्त्री होती. तिच्या अनेक शिल्पांवरून ती पतीच्या समकक्ष मानली जात असल्याचे संकेत मिळतात. तिचा प्रभाव तिच्या जीवनकाळात आणि त्यानंतरही इजिप्तच्या इतिहासात कायम राहिला आहे. तिचा अर्धपुतळा आजही जगभरातील अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच जर्मनीकडून हा पुतळा परत मिळावा, अशी मागणी आता मूळ धरू लागली आहे. नेफरतितीच्या अर्धपुतळ्याची किंमत अंदाजे 433 दशलक्ष डॉलर्स एवढी आहे. हा पुतळा इजिप्शियन पुरातन वस्तूंच्या मुकुटातील एक रत्न मानला जातो. परंतु, राणी नेफरतितीचा 3,370 वर्षांपूर्वीचा अर्धपुतळा 1913 पासून बर्लिनमध्ये आहे. आता तो परत देण्याबाबत दबाव वाढतो आहे. इजिप्तचे माजी पुरातत्त्व विभाग मंत्री झही हवास यांनी होस्नी मुबारक यांच्या 2011 मधील राजीनाम्याच्या निदर्शनांपूर्वी नेफरतितीचा पुतळा परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. जर्मनीने राणी नेफरतितीचा प्रसिद्ध अर्धपुतळा परत करावा यासाठी हवास यांनी यावर्षीही सप्टेंबरमध्ये याचिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत.
Check Also
सर्वात वेगाने वाढणारा गहू
आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा नेहमीच पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठीही मोठा उपयोग झालेला आहे. ‘नासा’ या अमेरिकन …
पांचजन्य वृत्तपत्र