नीट पेपरफुटी प्रकरणाचे विदर्भात पडसाद

देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता विदर्भातही वेगाने पोहोचला असून केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने महाराष्ट्रातील तपासाची व्याप्ती वाढविली आहे. नांदेड, लातूर, नाशिक आणि पुणे येथील कारवाईनंतर आता नागपूर आणि चंद्रपूर येथे छापे टाकण्यात आल्याने अमरावतीतही खळबळ उडाली आहे. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाशी समर्थक असलेले आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या पेपरफुटी प्रकरणाचा कट पुण्यातील प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याने रचल्याचे सीबीआय तपासात आढळून आले. पुण्यतीलच प्रा. मनीषा मांढरे, लातूरमधील प्रसिद्ध कोचिंग संचालक शिवराज मोटेगावकर हे सर्व सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत. भोपाळमधून राजीव नयन मिश्रा, सुभाष दुबे, विशाल दुबे, सुनील रघुवंशी, अमरजित शर्मा, विवेक उपाध्याय, संदीप पांडेय यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीसह विदर्भातील काही शहरांवर तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रीत झाले असून, येत्या काही दिवसांत मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी सकाळी सीबीआयच्या पथकाने नागपूरच्या गणेशपेठ आणि कोतवाली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राहणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकले. विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची चौकशी करण्यात आली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एका विद्यार्थ्याच्या घरीही तपास करण्यात आला. प्राथमिक तपासात हे तिन्ही विद्यार्थी लातूरमधील प्रसिद्ध कोचिंग संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या संस्थेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींनंतर राज्यभरातील प्रवेश एजन्सी, कोचिंग क्लासेस आणि संशयित दलालांच्या हालचालींवर तपास यंत्रणांनी बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. विदर्भातील शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या अमरावतीत मोठ्या प्रमाणावर नीट आणि स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित कोणते धागेदोरे येथेही सापडतात का, याची पडताळणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी 2015 मधील एआयपीएमटी आणि 2021 मधील नीट घोटाळ्यांमध्येही नागपूरमधील रॅकेटची नावे समोर आली होती. त्यामुळे सीबीआयने आता या नव्या ‌‘आलोक रॅकेट‌’चा तपास अधिक वेगाने सुरू केला आहे.सीबीआयच्या मुंबई विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुणे सीबीआयचे तपासप्रमुख विनोद चौधरी यांनी नुकतीच नांदेडमध्ये कारवाई केली. चौकशीदरम्यान कदम कुटुंबीयांकडून आलोकचे नाव समोर आले. तपासात असे उघड झाले की, नांदेडमधील एका महिलेने आपल्या मुलीसाठी तब्बल पाच लाख रुपयांत नीटचा पेपर खरेदी केला होता. त्यासाठी सुरुवातीला 25 हजार रुपये ऑनलाईन टोकन म्हणून देण्यात आले होते.
लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक डॉ. शिवराज मोटेगावकर याला नीट पेपर फुटी प्रकरणात अटक होताच नांदेड शहरात खळबळ माजली असून अनेक कोचिंग क्लासेस चालकांनी विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन क्लासेस बंद केले आहेत. शिवराज मोटेगावकर याचे नांदेड शहरातील तिन्ही कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले असून अनेक खाजगी क्लासेस अघोषित बंद ठेवण्यात आले आहेत. डॉ शिवराज मोटेगावकर याच्या श्यामनगर कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आल्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त होता. नीट पेपर फुट प्रकरणात आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक डॉ शिवराज मोटेगावकर यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याचे वृत्त नांदेड येथे धडकताच खाजगी कोचिंग क्लासेस घेणारे संचालक व त्यांच्या सहकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दररोज खाजगी क्लासेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे रस्ते गजबजलेले असतात त्या भाग्यनगर, आनंदनगर, श्यामनगर, श्रीनगर, विसावा गार्डन परिसरातील रस्ते सुनसान झाले आहेत. त्यामुळे या भागातील अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद असल्याचे चित्र आहे. नांदेड शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था व संघटनांनी डॉ शिवराज मोटेगावकर यांच्या विरोधात मोर्चा उघडला असून नीट पेपर फुटीचे सुत्रधार शिवराज मोटेगावकर याचा निषेध करण्यात आला आहे. विद्याथ्यांच्या भवितव्यासोबत खेळ करणार्यांना डॉ शिवराज मोटेगावकर याच्या विरोधात धरणे व निषेध आंदोलन छेडण्यात येत आहे. नांदेड शहरात एस एफ आय विद्यार्थी संघटनेच्या वतीने निषेध मोर्चा काढून राग व्यक्त केला आहे. श्यामनगर येथील कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे.
3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेच्या तब्बल 42 तास आधी काही कोचिंग संस्थांकडे प्रश्नपत्रिका पोहोचल्याचा संशय आहे. या प्रकरणात आतापर्यंत सीबीआयने पाच राज्यांत छापे टाकून 10 आरोपींना अटक केली आहे. कोचिंग ऑपरेटर, प्रवेश एजन्सी आणि प्रश्नपत्रिका खरेदी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, पुणे, नाशिक, लातूर आणि अहिल्यानगरसह विविध शहरांत तपास मोहीम सुरू आहे.अमरावतीतील कोचिंग संस्थांमध्ये सध्या अस्वस्थतेचे वातावरण असून, तपासाच्या हालचालींमुळे शैक्षणिक क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.

Check Also

विपर्यास नको, सहभाग हवा!

होर्मुझची सामुद्रधुनी गेल्या 75 दिवसांपासून बंद असल्याने जगातील एकूण इंधन पुरवठ्यापैकी 20 टक्के पुरवठा ठप्प …