लेख-समिक्षण

मंगळ का पडला कोरडा ?

आपल्या शेजारचा लाल ग्रह ‌‘मंगळ‌’ नेहमीच खगोलशास्त्रज्ञांसाठी कुतूहलाचा बनून राहिलेला आहे. या ग्रहावर एकेकाळी वाहते पाणी होते, नद्या-सरोवरे होती, हे आता सिद्ध झालेले आहे. मग हे पाणी गेले कुठे, असा प्रश्न पडतो. त्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे तेथील खडकांनी स्पंजाप्रमाणे हे पाणी शोषून घेतले, हे असल्याचाही दावा काही संशोधकांनी केलेला आहे. मंगळाची सध्याची भूमी ओसाड, गोठलेली आणि जीवसृष्टीस प्रतिकूल आहे.
आतापर्यंतच्या संशोधनानुसार मंगळावरील पाणी हे मंगळाचे चुंबकीय क्षेत्र कमी झाल्याने वाफ बनून अंतराळात गेले. त्यावेळी ते एक तर सौरवातामुळे वाहून गेले असावे किंवा तेथील खालच्या स्तरांमधील खडकांत बर्फाच्या स्वरूपात अडकले असावे. पण, यामध्ये पाणी नेमके कुठे गेले याचे स्पष्टीकरण झालेले नाही. मंगळाच्या खनिजशास्त्रीय रचनेत याचे उत्तर असल्याचे ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांचे म्हणणे असून, त्यांनी प्रारूप पद्धतीने पृथ्वीवरील खडकांची रचना अभ्यासली व त्यावरून मंगळावरील खडकांमधून किती पाणी बाहेर निघू शकेल, याचा अंदाज घेतला. खडकांचे तापमान, दाब, मंगळाची घडण आणि अन्य मुद्द्यांचा यामध्ये विचार करण्यात आला. त्यामध्ये संशोधनांती असे सांगण्यात आले की, मंगळावर बेसॉल्ट खडक असून, त्यामध्ये पृथ्वीवरील खडकांपेक्षा 25 टक्के अधिक पाणी राहू शकते. त्यामुळे या खडकांनीच मंगळावरील पाणी आत ओढून घेतले असावे. अनेकांनी यावर मते मांडली; पण हे पाणी खडकांच्या अभिक्रियांमधून शोषले गेले असावे याचा विचार कुणी केला नव्हता, असे ऑक्सफर्डचे संशोधक जॉन वेड यांनी म्हटले आहे.

Check Also

महाकाय ग्रहनिर्मितीबाबत नवा सिध्दांत

विज्ञानातील सिद्धांतही अनेक वेळा गृहितकेच असतात. कालौघात नवे संशोधन आधीच्या सिद्धांताला छेद देणारे व नवा …