तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार सूर्या याच्या आगामी चित्रपटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून असलेली उत्सुकता आता संपली आहे. ‘सूर्या 46’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाचे अधिकृत नाव आणि पहिले पोस्टर निर्मात्यांनी प्रसिद्ध केले आहे. ‘विश्वनाथ अँड सन्स’ असे या चित्रपटाचे शीर्षक असून, हा एक कौटुंबिक मनोरंजक चित्रपट असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये सूर्या एका लहान मुलाला कडेवर घेऊन दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावरील सात्विक हास्य आणि एकंदरीत पोस्टरची मांडणी अत्यंत भावूक आणि मनाला भिडणारी आहे. याआधीच्या चित्रपटांमध्ये आक्रमक भूमिका साकारणारा सूर्या या वेळी एका वेगळ्या आणि हळव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन व्यंकी ॲटलुरी करत आहेत. कौटुंबिक आणि भावनाप्रधान कथा मांडण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री ममिता बैजू मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे, बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे, ज्यामुळे हिंदी भाषक प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट जुलै 2026 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. – किर्ती कदम
Check Also
गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी
बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …
पांचजन्य वृत्तपत्र