पृथ्वीवर अनेक वेळा उल्कावर्षाव होत असतो. अर्थात, पृथ्वीच्या वातावरणात येताच या अवकाशीय शिळा जळून त्यांचे छोटे तुकडेच जमिनीपर्यंत येत असतात. मात्र, पृथ्वीवर काळाच्या ओघात काही मोठ्या उल्काही कोसळलेल्या आहेत. अशीच एक उल्का अर्जेटिनातील कॅम्पो डेल सिएलो येथे उत्खननात सापडली होती. या उल्केचे वजन तब्बल तीस टन इतके आहे. ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी उल्का असल्याचे काहींचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे हा उल्कापाषाण अखंड आहे. कॅम्पो डेल सिएलो या ब्युनोस आयर्सच्या उत्तरेला असलेल्या भागात सापडलेला हा उल्कापाषाण मोठा असून, त्यामुळे 26 विवरे तयार झालेली आहेत. 4 ते 5 हजार वर्षांपूर्वी हा उल्कापाषाण पडला असावा. त्याची पहिली नोंद स्पॅनिश गव्हर्नरांनी 1576 मध्ये केली असून, काही लोक लोहखनिज गोळा करीत असताना त्यांना तो त्या वेळी दिसल्याचे सांगण्यात येते. हे लोह आकाशातून पडलेले आहे, असे त्यांनी म्हटले होते व स्पॅनिश अधिकाऱ्यांना उल्कापाषाण कोसळला ते ठिकाण दाखवले होते. कॅप्टन डी मिरावेल यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेत काही लोहयुक्त उल्कापाषाण आणण्यात आले. त्यातील मेसॉन ड फिएरो हा सर्वात मोठा लोहयुक्त उल्कापाषाण होता. कॅम्पो डेल सिएलो उल्कांमुळे काही छोटी विवरेही तयार झाली. त्यात 78 बाय 65 मीटरचे विवर सर्वात मोठे आहे. उल्कापाषाणांचे वजन मोजण्यासाठी काही शास्त्रीय पद्धती आहेत. त्यांची खनिजरचना व कालावधीही सांगता येतो. आतापर्यंत सापडलेला सर्वात मोठा उल्कापाषाण हा होबा नावाचा असून, त्याचे वजन 60 टन होते; तर तो नामिबियातील एका शेतात पडला होता. 80 हजार वर्षांपूर्वी तो जेथे पडला तेथेच तो अजून आहे. ॲस्ट्रॉनॉमी असोसिएशन ऑफ चॅको या संस्थेने अलीकडेच एक मोठा उल्कापाषाण शोधला असून, तो 1967 मध्ये सापडलेल्या 37 टनांच्या उल्कापाषाणापेक्षा मोठा आहे. आतापर्यंत दुसरा मोठा उल्कापाषाण कोणता याबाबत वाद आहेत. अर्जेटिनात जगातील तीन मोठ्या उल्कापाषाणांपैकी दोन आहेत.
Check Also
स्मार्टफोनच्या साथीने बनला कोट्यधीश
जिद्द, योग्य कल्पना आणि बदलत्या काळाची अचूक ओळख असेल तर यशासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते, …
पांचजन्य वृत्तपत्र