भारताच्या सागरी सीमेजवळ आणि हिंदी महासागरात श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर बुधवारी सकाळी एका इराणी युद्धनौकेवर भीषण पाणबुडी हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात इराणची आयआरआयएस डेना ही युद्धनौका समुद्रतळाला गेली असून, त्यावरील किमान 87 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 101 कर्मचारी बेपत्ता आहेत. या संदर्भात श्रीलंकेच्या नौदलाने आणि संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली. त्यानंतर, अमेरिकेनेच हा हल्ला करून युद्धनौका बुडवली असल्याचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी बुधवारी सायंकाळी स्पष्ट केले.
रॉयटर्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, हिंदी महासागरात इराणी युद्धनौकेवर हल्ला झाल्याची माहिती श्रीलंका नौदलाला मिळाल्यानंतर मदत आणि शोधकार्य सुरू करण्यात आले होते. इराणी युद्धनौका आयरिस देना भारतात सरावासाठी आली होती. सरावानंतर या युद्धनौकेचा परतीचा प्रवास सुरू होता. ही युद्धनौका इराणच्या युद्ध क्षेत्रात नव्हती आणि ती युद्धात सहभागी नव्हती, तरीही अमेरिकेने तिच्यावर हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, 180 कर्मचारी असलेल्या या इराणी फ्रिगेटवरून पहाटेच्या सुमारास आपत्कालीन मेसेज पाठवण्यात आला होता. ही नौका श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून साधारण 25 मैल दक्षिणेला असताना अचानक मोठा स्फोट होऊन बुडू लागली. संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट एका अज्ञात पाणबुडीने केलेल्या हल्ल्यामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज होता. श्रीलंकेच्या नौदलाने तत्काळ प्रतिसाद देत दोन युद्धनौका आणि एका विमानासह मोठी बचाव मोहीम राबवली. परराष्ट्र मंत्री विजिथा हेरथ यांनी संसदेत माहिती दिली की, आतापर्यंत 30 ते 32 खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारांसाठी गाले इथल्या मुख्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सायंकाळी या हल्ल्याची जबाबदारी अमेरिकेने स्वीकारली. हिंदी महासागरात इराणची युद्धनौका अमेरिकेच्या पाणबुडीनं बुडवली. पाणतीर सोडून युद्धनौकेवर हल्ला करण्यात आला, अशी माहिती अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी दिली. समुद्रातील जहाजाला बुडवण्यासाठी पाणबुडीतून पाणतीर सोडले जातात. अमेरिकेनं बुडवलेली इराणची युद्धनौका भारतातून माघारी निघाली होती. युद्धनौका श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून जवळ असताना अमेरिकेच्या पाणबुडीने तिच्यावर हल्ला केला. पुढच्या काही मिनिटांत युद्धनौकेने जलसमाधी घेतली.
युद्धनौका बुडाल्यावर त्यात असलेले 140 जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. काही वेळानंतर यातील 87 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आली. इराणच्या युद्धनौका, त्यांच्या विनाशिका, जहाजे आंतरराष्ट्रीय जलहद्दीत सुरक्षित आहेत, असे इराणने समजू नये, असे हेगसेथ म्हणाले. अमेरिकन संरक्षण मंत्री हेगसेथ यांनी इराणवरील हल्ल्यांची तीव्रता आणि संख्या वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‘आम्ही लवकरच इराणवर नियंत्रण मिळवू,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसऱ्या जागतिक युद्धानंतर अमेरिकेने पहिल्यांदाच पाणतीराच्या माध्यमातून एखाद्या जहाजाला जलसमाधी दिली आहे.
जखमी इराणी खलाशांवर उपचार सुरू असलेल्या श्रीलंकेच्या गाले रुग्णालयाबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या देशाच्या लष्करी कारवाईशी संबंधित प्रकरण असल्याने श्रीलंकेचे नौदल किंवा हवाई दल या बचाव कार्याचे कोणतेही फुटेज जाहीर करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ‘आम्ही शोध मोहीम सुरू ठेवली आहे. परंतु उर्वरित कर्मचाऱ्यांचे काय झाले याची अद्याप कोणतीही माहिती नाही. परिस्थिती गंभीर आहे, अशी माहिती श्रीलंकेच्या नौदल अधिकाऱ्यांनी दिली.
Check Also
बच्चू कडू यांची ‘प्रहार’ इतिहासजमा
विधानपरिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती …
पांचजन्य वृत्तपत्र