दिल्लीत केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे ‘एआय इम्पॅक्ट समिट 2026’ आयोजित करण्यात आली. या समिटमध्ये आधी भारतीय उद्योजकाच्या गॅझेट्सची चोरी आणि दुसऱ्या दिवशी चिनी कंपनीने तयार केलेला रोबोटिक डॉग स्वत: विकसित केल्याचा दावा एका भारतीय विद्यापीठाने केल्याने भारताची जगभरात नाचक्की झाली आहे. चीनने या ग्रेटर नोएडातील गलगोटिया विद्यापीठाच्या तंत्रज्ञान चोरीवर बातम्या जगभरात पोहोचवल्या आहेत.
मोठा गाजावाजा करीत केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे 16 ते 20 फेब्रुवारीदरम्यान ‘एआय इम्पॅक्ट समिट2026’ आयोजित केली. या समिटमुळे सरकारला जगभरात स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची होती. त्याची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या फोटो सेशनने सुरू केली. मात्र, त्यांच्या या दौऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तराच्या एआय इम्पॅक्ट समिटला गालबोट लागले. मोदी यांच्या दौऱ्यासाठी एक्सपोमधील सर्व कक्षातील तंत्रज्ञान उद्योजकांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्याचाच फायदा चोरट्यांनी घेतला. यावेळी भारतीय उद्योजकाचे गॅझेट्स चोरीला गेले. भारतात आयोजित पहिल्या एआय समिटच्या पहिल्याच दिवशी निओसॅपियनचे सहसंस्थापक धनंजय यादव यांना एका वाईट अनुभव आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यांच्या कंपनीने तयार केलेले गॅझेट्स चोरीला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. यादव यांनी सोशल मीडिया वर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, पंतप्रधान मोदी समिटच्या ठिकाणी येणार असल्यामुळे सर्वांना बुथमधून बाहेर जाण्यास सांगितले होते. त्यादरम्यान आमच्या गॅझेट्सची चोरी झाली. हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेल्या एक्स्पोमधून आमच्या कंपनीचे एआय वेअरेबल चोरी झाले. यादव यांच्या निओसॅपियन कंपनीने दैनंदिन संभाषण आणि भावानांचे विश्लेषण करू शकेल, अशा एआय वेअरेबलची निर्मिती केली आहे. याचे प्रदर्शन करण्यासाठी त्यांनी समिटमध्ये काही गॅझेट्स आणली होती.
याच समिटमध्ये चीनकडून आयात केलेला रोबो डॉग उपकरण स्वत:चा शोध असल्याचे सांगून ग्रेटर नोएडातील गलगोटिया विद्यापीठाने ते उत्पादन एआय समिटमध्ये ठेवले. त्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर कौतुक केले होते. सर्व भांड मीडियाने भारत एआय तंत्रज्ञान क्षेत्रात किती प्रगती करीत आहे, याचा बडेजावपणा दाखवणारे व्हीडिओ तयार केले. ते व्हीडिओ चीनच्या मीडियापर्यंत पोहोचले. त्यामुळे गलगोटिया विद्यापीठाच्या तंत्रज्ञान चोरीचे पितळ उघडे पडले. देशाची नाचक्की झाल्यावर भारत सरकारने गलगोटिया विद्यापीठाला एक्सपोमधून हाकलून लावले. रोबो डॉगपासून सॉकर ड्रोनपर्यत विविध विषयांमुळे हे विद्यापीठ अडचणीत आले आहे. विद्यापीठाच्या प्राध्यापिका नेहा सिंह यांच्या विधानानंतर आता विद्यापीठाने अधिकृत स्पष्टीकरण जारी केले आहे. चिनी कंपनी तयार केलेल्या रोबोटिक डॉगवरुन निर्माण झालेल्या वादाबद्दल विद्यापीठानं माफी मागितली आहे. कॅमेऱ्यासमोर आल्यावर आमच्या प्रतिनिधीने उत्साहाच्या भरात चुकीची माहिती दिली, असे विद्यापीठाने सांगितले.
विद्यापीठाने 18 फेब्रुवारीला एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यात म्हटले की, नुकत्याच झालेल्या एआय समिटमध्ये निर्माण झालेल्या गोंधळाबद्दल आम्ही माफी मागतो. आमच्या पॅव्हेलियनमध्ये असलेल्या एका प्रतिनिधीला याबद्दल पुरेशी माहिती नव्हती. उत्पादनाच्या उगमस्थानाबद्दल त्यांना पूर्ण माहिती नव्हती. कॅमेऱ्यावर आल्यावर उत्साहाच्या भरात त्यांनी चुकीची माहिती दिली. त्यांना माध्यमांशी बोलण्याची परवानगीदेखील नव्हती, असे विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर हा सगळा वाद सुरु झाला. विद्यापीठाच्या प्राध्यापिका नेहा सिंह यांनी समिटमध्ये ओरियन नावाचा एक रोबोटिक डॉग समोर आणला आणि हा रोबोडॉग आमच्या विद्यापीठात तयार करण्यात आल्याचा दावा केला. पण प्रत्यक्षात हा रोबोडॉग चिनी कंपनी यूनिट्रीने तयार केला आहे. यूनिट्री गो 2 असे त्याचे नाव आहे. या रोबोडॉगची किंमत 2800 अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास 2.3 लाख रुपये आहे. गलगोटिया विद्यापीठानं एआय समिटमध्ये सादर केलेला रोबोडॉग प्रत्यक्षात एका चिनी कंपनीनं खरेदी केला असल्याचा दावा अनेक सोशल मिडिया यूझर्सनी केला. त्यामुळे विद्यापीठावर मोठी नामुष्की ओढावली. यामुळे विद्यापीठाची एआय समिटमधून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे.
Check Also
बच्चू कडू यांची ‘प्रहार’ इतिहासजमा
विधानपरिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती …
पांचजन्य वृत्तपत्र