लेख-समिक्षण

गर्दीतही करा बिनधास्त कॉलिंग!

सध्याच्या काळात मोबाईलद्वारे कॉलिंग-मेसेजिंग बरोबरच आपण पैसे भरतो, कागदपत्रे पाठवतो, मनोरंजन घेतो आणि महत्त्वाची कामे तत्काळ पार पाडतो. तरीही कॉलिंग म्हणजेच संवाद साधण्यासाठी याचा वापर अधिक प्रमाणात होतो. अनेकदा गर्दीच्या जागी किंवा आवाजाच्या गोंगाटात फोनवर बोलणे हे त्रासदायक ठरते. विशेषतः, सणासुदीच्या काळात बाजारात गर्दीत असताना, गणेश मंडळाचे स्टेरिओ सुरू असताना, मिरवणुकांदरम्यान किंवा रोजच्या आयुष्यात घराबाहेर गर्दीत असताना आजूबाजूच्या गोंगाटामुळे आपला आवाज समोरच्या व्यक्तीपर्यंत नीट पोहोचत नाही, तो तुटक ऐकू येतो आणि संभाषण खंडित होते. अशा वेळी मोठ्याने बोलावे लागते. पण दरवेळी मोठ्याने बोलणे योग्य असतेच असे नाही. कारण काही संवाद हे खासगी, ऑफिशियल स्वरुपाचे असतात. याच समस्येवर उपाय म्हणून अ‍ॅपल कंपनीने आपल्या आयफोनमध्ये व्हॉईस आयसोलेशन नावाचे एक खास फीचर दिले आहे. हे फीचर सुरू केल्यावर आपण एखाद्याला फोन कॉल केल्यास त्या व्यक्तीला फक्त वापरकर्त्याचा आवाज अगदी स्वच्छ ऐकू येतो आणि आजूबाजूचा गोंगाट आपोआप कमी होतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला संभाषण स्पष्टपणे समजते आणि कॉल करण्याचा अनुभवही समाधानकारक ठरतो.
हे फीचर वापरणेही अगदी सोपे आहे. कॉल सुरू झाल्यावर मोबाईलच्या कंट्रोल पॅनेलमध्ये जाऊन माईक या पर्यायावर क्लिक करा. तेथे आवाज वेगळा करण्यासाठी ‘व्हॉईस आयसोलेशन’चा पर्याय निवडायचा. एवढे केले की मोबाईल आजूबाजूचा आवाज वगळून फक्त तुमचा आवाज समोर पाठवतो.
ही सुविधा आयफोन एसआर, एसएस आणि त्यानंतर आलेल्या सर्व प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. साध्या फोन कॉलसाठी किमान १६.४ किंवा त्यानंतरची आवृत्ती आवश्यक आहे. फेस कॉलिंगसाठी १५ किंवा त्यानंतच्या एडिशन गरजेच्या आहेत. त्यामुळे तुमचा मोबाईल अद्ययावत असेल तर ही सोय सहज वापरता येते. आजच्या काळात संवाद फक्त बोलण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो व्यवहार, शिक्षण, कामकाज आणि नातेसंबंध यांचा मुख्य आधार बनलेला आहे. त्यामुळे संभाषणात येणारा अडथळा कमी करणे गरजेचे झाले आहे. आवाज वेगळा करण्याची ही सुविधा गोंगाटी वातावरणातही सुस्पष्ट आणि संवाद साधता येतो याची खात्री देते.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …