ओरॅकल कॉर्पोरेशनचे संस्थापक लॅरी एलिसन हे तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्त्व आहे. पण त्यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. त्यांच्या जन्मानंतर वडील सोडून गेले आणि आईला एकटीला त्यांचे पालनपोषण करणे शक्य नसल्याने नऊ महिन्यांचे असताना त्यांना त्यांच्या मावशीने आणि मामा- मामांनी दत्तक घेतले. पण त्यांचे दत्तक वडील कठोर स्वभावाचे होते आणि अनेकदा त्यांना टोचून बोलत. तू आयुष्यात काहीच मोठं करू शकणार नाहीस, अशा नकारात्मक गोष्टी सतत त्यांच्या कानावर पडत. मात्र, लॅरी यांना स्वतःवर दृढ विश्वास होता.
त्यांनी शिकागो विद्यापीठात प्रवेश घेतला, पण ते शिक्षण अपूर्ण राहिले. दोन वेळा कॉलेज सोडल्यानंतर त्यांनी कॅलिफोर्नियाला जाण्याचा निर्णय घेतला. 1960 च्या दशकात सिलिकॉन व्हॅलीमध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत होती, आणि त्यांना हे क्षेत्र खूप आकर्षित करत होते.
त्यांनी सुरुवातीला वेगवेगळ्या खढ कंपन्यांमध्ये नोकरी केली. मात्र, ते केवळ एका सुरक्षित नोकरीत अडकून राहणार्यांपैकी नव्हते. त्यांना मोठे काहीतरी करायचे होते, नवीन काहीतरी निर्माण करायचे होते.
1977 मध्ये त्यांनी आपल्या दोन सहकार्यांसोबत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज नावाची कंपनी सुरू केली. हीच कंपनी पुढे जाऊन ओरॅकल कॉर्पोरेशन म्हणून ओळखली जाऊ लागली.सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. कंपनीला पहिल्या काही वर्षांत तोटा सहन करावा लागला. परंतु, लॅरी एलिसन कधीच हार मानणार्यांपैकी नव्हते. त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर 1980 च्या दशकात ओरॅकलचा पहिला मोठा करार झाला. त्यानंतर या कंपनीने मागे वळून पाहिलेच नाही.
त्यांनी एकदा म्हटले होते, जेव्हा तुम्ही काही नवीन निर्माण कराल, तेव्हा लोक तुम्हाला वेड्यात काढतील. पण त्याची तयारी ठेवा! हेच तत्वज्ञान त्यांनी त्यांच्या व्यावसायिक जीवनात आणि वैयक्तिक जीवनात अंमलात आणले. ते स्पर्धात्मक वृत्तीने काम करायचे आणि नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत राहिले. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनतीने आपण यशस्वी होऊ शकतो ही बाब ओरॅकल यांच्या जीवनप्रवासातून स्पष्ट होत नाही काय?
Check Also
जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी
तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप …
पांचजन्य वृत्तपत्र