परगावी निघालेल्या तरुणीला धमकावून विद्येचे माहेरघर म्हटल्या जाणार्या पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. त्यावरून राजकारण तापले. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बंद असलेल्या शिवशाही बसेसची पाहणी केली तेव्हा तेथे साड्या, कंडोम आदी आढळून आले. परिणामी पोलिसांनी तत्काळ सहा पथके तयार करून आरोपीच्या मागावर पाठवले. राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला नेत्या आदी सर्वच खडबडून जागे झाले.
बलात्काराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध घेतला तेव्हा दत्तात्रय रामदास गाडे (वय 35,, रा. शिक्रापूर) असे आरोपीचे नाव सापडले. त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याचा शोध घेण्यास पोलिसांची सहा पथके रवाना करण्यात आली. याबाबत पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की, पीडित 26 वर्षांची तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आली होती. तिला एकाने फलटणला जाणारी गाडी इकडे लागत नाही?, तिकडे लागते, असे सांगितले. त्यावर या तरुणीने इकडेच फलाटावर लागते, असे सांगितले. मात्र, आरोपीने तिच्याशी गोड बोलून, तिला मी 10 वर्षे इथे आहे. तिकडे लागणारी बसच फलटणला जाते, असे सांगून तिला आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. या बसमध्ये अंधार होता. तेव्हा त्याने तुम्ही दरवाजा उघडून आत जा, असे सांगितले. तेव्हा ही तरुणी बसमध्ये गेली. तेव्हा तिच्या मागोमाग तो आत आला. त्याने दरवाजा लावून घेत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर ही तरुणी फलटणला जाण्यास निघाली. अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर तिने हा सगळा प्रकार मित्राला सांगितला. मित्राने तिला सांगितल्यानंतर ती पोलिस ठाण्यात गेली. तिने स्वारगेट पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली स्वारगेट पोलिसांनी तातडीने तेथील सीसीटीव्ही चित्रिकरण तपासले. चित्रिकरणात आरोपी निष्पन्न झाला आहे. त्याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत, असेही उपायुक्तांनी सांगितले.
याच आगारात बंद स्थितीत असलेल्या शिवशाही बसमध्ये नेमके काय चालते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह स्वारगेट बस स्थानकाच्या आगारात आले. वसंत मोरे यांनी अतिशय आक्रमक होत संताप व्यक्त केला. तिथे त्यांनी बस आगारातील सुरक्षा रक्षक कार्यालयाची तोडफोड केली. त्यांनी कार्यालयाचे काचे फोडले. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी तिथल्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप केले. तसेच आगारात उभ्या असलेल्या बसमध्ये अक्षरश: कंडोम्सचा खच पडलेले आहेत. त्यामुळे असे प्रकार रोज घडत असल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला. वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकाच्या आगारात उभ्या असलेल्या जुन्या चार बसजवळ माध्यमांच्या प्रतिनिधींना नेले. या जुन्या बस गाड्यांमध्ये खरंच प्रचंड अस्वच्छता बघायला मिळाली. विशेष म्हणजे या बसमध्ये जुने कपडे, साड्या विखुरलेल्या होत्या. तसेच कंडोमचे अक्षरश: खच बघायला मिळाले. या आगारात बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये ब्लँकेट्स, शर्ट, साड्या, अंतर्वस्त्रे आढळली आहेत. याच बसमध्ये वापरलेले कंडोम, त्यांची पाकिटेही सापडली आहेत. त्यामुळे बंद असलेल्या शिवशाही बसेसमध्ये नेमके काय प्रकार चालतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फफडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांसोबत दुपारी तीनच्या सुमारास चर्चा केली. प्रकरण गंभीर असून तत्काळ तपास पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. फरार आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन तपासही लवकर पूर्ण करा तसेच संबंधित प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
Check Also
तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे …
पांचजन्य वृत्तपत्र