मायकेल फेराडे यांचा जन्म 22 सप्टेंबर 1791 रोजी इंग्लंडमधील न्यूग्टिंन बट्स येथे एका गरिब कुटुंबात झाला. त्यांचे वडील लोहारकाम करत असत. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी मायकेल यांना लहान वयातच काम करावे लागले. त्यांना औपचारिक शिक्षण घेण्याची संधी फारशी मिळाली नाही. दारिद्य्रामुळे त्यांना केवळ प्राथमिक शिक्षण घेता आले. मात्र, ज्ञानाची भूक असणार्या फेराडे यांनी पुस्तके वाचून स्वतःचा अभ्यास सुरू केला. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी लंडनमधील एका पुस्तक बांधणीच्या दुकानात शिकाऊ कामगार म्हणून काम सुरू केले. तिथेच त्यांनी वैज्ञानिक पुस्तकांचे वाचन सुरू केले आणि आपले ज्ञान वाढवले. 1812 साली नामांकित वैज्ञानिक हम्फ्री डेवी यांच्या व्याख्यानांना उपस्थित राहण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांनी या व्याख्यानांच्या नोट्स व्यवस्थित तयार करून त्याचे एक पुस्तक बनवले आणि ते डेवी यांना दिले. त्यांच्या अभ्यासू वृत्तीने प्रभावित होऊन डेवी यांनी त्यांना रॉयल इन्स्टिट्यूशन ऑफ ग्रेट ब्रिटन येथे प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम दिले. डेवी यांच्या मार्गदर्शनाखाली फेराडे यांनी रसायनशास्त्र आणि विद्युतशास्त्राचा सखोल अभ्यास केला. लवकरच त्यांनी स्वतः संशोधन सुरू केले आणि वैज्ञानिक क्षेत्रात स्वतःचे नाव निर्माण केले. विद्युत चुंबकाचा शोध त्यांनीच लावला आणि पुढे या शोधावरच विद्युत जनित्रे आणि ट्रान्सफॉर्मर्स तयार करण्यात आले. यानंतर त्यांनी विद्युतक्षेत्र संरक्षण प्रणाली विकसित केली. या तंत्रज्ञानाचा वापर आज उपग्रह, मोबाइल नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सुरक्षेसाठी केला जातो.
फेराडेहे केवळ एक महान वैज्ञानिक नव्हते तर ते अत्यंत साधेपणाने जगणारे आणि नैतिक मूल्य जपणारे व्यक्ती होते. त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात संशोधन करण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक फायद्याचा विचार केला नाही. त्यांना ब्रिटिश सरकारकडून ‘सर’ ही पदवी देऊ करण्यात आली, पण त्यांनी ती विनम्रपणे नाकारली. त्यांनी विज्ञान हे केवळ संशोधनासाठी असावे, त्याचा वापर समाजाच्या हितासाठी व्हावा, असे मानले. त्यामुळेच त्यांनी आपल्या शोधांचा व्यावसायिक उपयोग करण्याऐवजी वैज्ञानिक समाजाच्या भल्यासाठी त्याचा प्रचार आणि प्रसार केला.
गरिबी, शिक्षणाच्या संधींचा अभाव असूनही त्यांनी अपार मेहनतीने आणि चिकाटीने स्वतःला घडवले. त्यांचा प्रवास सिद्ध करतो की जिद्द, चिकाटी आणि कष्ट यांच्या जोरावर कोणताही माणूस यशाचे शिखर गाठू शकतो.
Check Also
जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी
तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप …
पांचजन्य वृत्तपत्र