लेख-समिक्षण

पॅडादादांचा सक्सेमंत्र

पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी दादा सर्वांचे लाडके अभिनेते आहेत. उत्तम विनोदवीरांच्या यादीत पॅडी दादांचं नाव अग्रस्थानी आहे. अनेक मालिका आणि नाटकांमध्ये पॅडी दादांनी भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर ’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी अनेक प्रहसनं केली आहेत. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्याच्या खडतर प्रवासाविषयी मनोगत मांडलं.
ते म्हणतात, लग्नाच्या अगोदर नाट्यक्षेत्रातील माझी परिस्थिती फारशी समरूप नव्हती. घरातल्यांचा नकार होता. कारण, त्यातून अर्थार्जन काही नव्हतं आणि चार पैसे घरी आणून देणं आणि हातभार लावणं या गोष्टी त्यातून होत नव्हत्या. म्हणून आईचा थोडासा रुसवा असायचा. पण माझा एखादा फोटो कुठल्यातरी पेपरमध्ये आला, अभिनयाचं बक्षीस मिळालं की तेव्हा तिला बरं वाटायचं. हातभार लावावा म्हणून पेपर टाकण्यापासून ते प्रेसमध्ये काम करणं, मसाला कंपनीमध्ये पॅकिंगचं काम करणं अशी अनेक कामं मी केली. तेव्हा नरिमन पॉईंटच्या ऑफिसमध्ये फॅक्सच्या मशिन्स नवीन आल्या होत्या.तुमच्याकडे आमचे फॅक्स येण्यासाठी आम्हाला ऑर्डर द्या, असे सांगणारे पॅम्प्लेट्स मी वाटले. दिवसाचे दहा रुपये मिळायचे तेव्हा. त्यातून काही पैसे वाचवून ठेवायचे आणि तेव्हा 1 रुपयाचा झुणका भाकर आला होता ते खायचो.
आजच्या पिढीला मार्गदर्शन करताना पॅडी सांगतात की, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या दुर्गुणाचा चांगल्या दृष्टीने विचार करून व्यवसाय क्षेत्रात वापर करा. देवाने जन्माला घातलेला प्रत्येक व्यक्ती करेक्ट असतो. त्यामुळे पालकांनी, शिक्षकांनी मुलांना जे आवडतं त्याकडे विशेष लक्ष द्या. मी आज जे काही आहे ते मला आवडणार्‍या गोष्टी केल्या त्यामुळेच इथपर्यंत आहे. मुलांची एकमेकांशी कंपॅरिझन करू नका. मुलांकडे भरलेल्या ग्लासाप्रमाणे बघा. रिकाम्या ग्लासाप्रमाणे बघू नका. उंची, रंग नसतांनाही मी जे काही आहे ते फक्त प्रामाणिक कामाच्या जोरावर. विद्यार्थ्यांनी देखील आपली हुशारी कशात आहे ती ओळखायला शिकले पाहिजे.आपण जे काम करतो ते मनापासुन केलं पाहिजे. तेच आपल्या यशासाठी महत्वाचे आहे. मग रंग,उंची,आवाज महत्वाचा नाही.

Check Also

जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप …