लेख-समिक्षण

हरियाणात काँग्रेसचे पानिपत

लोकसभा निवडणुकीनंतरची हरियाणातील विधानसभा निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस यांच्यासाठी ’लिटमस टेस्ट’ होती. काँग्रेसमधील पक्षांतर्गत कलह आणि मुख्यमंत्रिपदावरून भूपेंद्रसिंह हुडा व कुमारी सेलजा या प्रमुख नेत्यांमधील भांडणे हे पराभवाचे ठळक कारण मानले जाते. तसेच वादग्रस्त बाबा राम रहीम याला निवडणुकीच्या तोंडावर अचानक पॅरोल देण्यात आला. त्याने भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले व त्याच्या समर्थकांनी, विशेषतः दलित समाजाने भाजपच्या पारड्यात मते टाकली.
हरियाणात भाजप स्पष्ट बहुमत मिळवत सत्तेची हॅट्टिर्र्क केली आहे. विजयासह भाजपने विक्रमही रचला आहे. कारण आतापर्यंत हरियाणात कोणत्याही एका पक्षाने सलग तिसर्‍यांदा विधानसभा निवडणूक जिंकलेली नाही. हरियाणाच्या इतिहासातील ही भाजपची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. कारण भाजपला यापूर्वी कधीही 50 चा आकडा गाठता आलेला नाही. हरियाणा विधानसभा निवडणुकीचे मतदान 5 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी संपले. त्यानंतर निवडणुकीचे एक्झिट पोल येऊ लागले. सगळ्याच सर्व्हेंमध्ये काँग्रेसला बहुमत दाखवण्यात आले. राज्यात कमळ कोमेजणार आणि मतदार हाताला साथ देणार असे अंदाज बांधले गेले. काँग्रेसच्या गोटात आनंद होता. मतमोजणी सुरू झाल्यावर सकाळी सुरुवातीच्या कलांमध्येही काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला. पक्ष कार्यालयांमध्ये आनंदाचे वातावरण दिसू लागले होते. सकाळी सुरुवातीला पोस्ट बॅलेटचं मतदान मोजले जाऊ लागले. भाजपचे उमेदवार बहुतांश जागांवर मागे आणि काँग्रेसची जोरदार मुसंडी अशा हेडलाईन, ब्रेकिंग दिसू लागल्या. भाजप 4, काँग्रेस 30 इतके मोठे अंतर होते. हळूहळू ही तफावत कमी होऊ लागली. कलांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याची घोषणा टीव्ही चॅनल्सवर सुरु झाली. भाजपला जेमतेम 25 जागा मिळतील अशी शक्यता दिसत होती.
दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मात्र वेगळी परिस्थिती होती. तिथले आकडे वेगळेच होते. हरियाणात काँग्रेस पिछाडीवर, भाजप पुढे! हळूहळू टीव्ही चॅनल्सवरील आकडेही बदलू लागले. तिथेही भाजप आघाडीवर अशा बातम्या सुरु झाल्या. दोन्ही पक्षांच्या आकड्यांमधील अंतर वाढू लागले. केवळ अर्ध्या तासात चित्र पूर्णपणे पालटले. हरियाणात काँग्रेसला झालेले मतदान 40.25 टक्के आहे. तर भाजपचा व्होट शेअर 39.29 टक्के आहे. भाजपने 50 जागा जिंकून हरियाणात तिसर्‍यांदा सरकार स्थापन केले आहे. काँग्रेस 35 जागांवर अडकली. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे भूपेंद्रसिंह हुडा आणि खासदार कुमारी सेलजा यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली होती. मतटक्क्याच्या बाबतीत काँग्रेस व भाजपमध्ये अगदी कमी अंतर आहे. यातही काँग्रेस सुरुवातीला किंचित पुढे होता, परंतु हे मताधिक्य विजयी जागांमध्ये बदलले नाही. अनेक जागांवर काँग्रेसच्या पराभवामागे अपक्ष आणि आपसारखे प्रादेशिक पक्ष कारणीभूत ठरले. हुडा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने विशेषतः जाट मतांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे गैर-जाट मते भाजपच्या बाजूने एकवटली.
भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली हरियाणाचा गड जिंकण्यासाठी उमेदवार निवडीपासून काटेकोर आखणी केली. प्रचाराची जबाबदारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे सोपवली होती. त्यांच्या जोडीला मुख्यमंत्री नायबसिंह सैनी, खासदार सुरेंद्र नागर, पक्षनेते विनोद तावडे, त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री विप्लव देव या भाजप नेत्यांनी प्रचाराची काटेकोर आखणी केली व बूथ पातळीवर पक्षाचे नियोजन मजबूत केले. मुख्यमंत्री सैनी यांचा नवा चेहरा म्हणजे कोरी पाटी भाजपला साथ देऊन गेली. शहा यांनी अत्यंत विचारपूर्वक धोरण आखून काम केले. निवडणुकीच्या प्रचारकाळात केंद्र सरकारच्या अनेक संस्थांनी भरतीमध्ये अग्निवीरांसाठी विशेष कोटा जाहीर केला. भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्याद्वारे उर्वरित काम पूर्ण करताना महिलांना काँग्रेसपेक्षा जास्त म्हणजे मासिक 2100 रुपये रोख देण्याचे आश्वासन दिले. ’मुख्यमंत्री बदला-नाराजी दूर करा’ ही भाजप नेतृत्वाची रणनीती हरियाणातही चांगलीच उपयुक्त ठरली. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या मनोहरलाल खट्टर सरकारविरुद्ध हरियाणाच्या जनमानसात रोष असल्याचे दिसताच पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी खट्टर यांना केवळ सहा महिन्यांपूर्वी बदलून नायबसिंह सैनी यांच्याकडे राज्याची सूत्रे सोपविली. भाजपने मुख्यमंत्री बदलाची हीच रणनीती या आधीही वापरली होती.

Check Also

बच्चू कडू यांची ‌‘प्रहार‌’ इतिहासजमा

विधानपरिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती …