लेख-समिक्षण

सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर करताय?

ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घातल्यानंतर भारतातही 18 वर्षांखालील लहान मुलांना सोशल मीडियावर अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. डेटा प्रोटेक्शन 2025 च्या नवीन मसुद्यामध्ये या नियमांचा उल्लेख आहे. मुलांवर सोशल मीडियाचा होणारा नकारात्मक परिणाम लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा ठरणारा आहे. परंतु दुसर्‍या बाजूला आज पालकच आपल्या मुलांना फेसबुक, इंस्टाग्राम, आणि इतर माध्यमांसमोर घेऊन जात आहेत. बहुतांश पालक आपल्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नित्यनेमाने शेअर करत असतात. प्रत्येक मुलं आपल्या पालकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असते. त्यांचा निरागस आणि खोडकरपणा पाहून एक वेगळाच आनंद मिळतो. अशा सुंदर क्षणांची जपणूक करण्यासाठी पालक अनेकदा मुलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात, किंवा स्टेटसला ठेवतात, असे कंटेट यूजर्सना खूप आवडतातही. पण लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात आपल्या मुलांची वैयक्तिक ओळख (प्रायव्हसी) जगासमोर येत आहे याचे भान पालकांना नसते. वास्तविक, मुलं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मोठी होत असतात. ते गोष्टी समजून घेण्याची आणि स्वतःशी जोडण्याची क्षमता विकसित करतात. अशा वेळी, त्यांचे फोटो किंवा रील शेअर केल्याने त्यांच्या प्राइव्हसीपासून त्यांच्या वागण्यापर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. मुलांशी संबंधित चुकीचा मजकूर पोस्ट करणे इंटरनेटच्या जगात धोकादायक ठरू शकते. त्यांच्या भविष्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
इंटरनेटवर काहीही पोस्ट केल्यानंतर, ते काढून टाकणे खूप कठीण आहे. लोक ऑनलाइन शेअर केलेल्या गोष्टींचे स्क्रीनशॉट घेतात. याचा गैरवापर होण्याचीही शक्यता असते. यामध्ये किडनॅपिंग करण्याबरोबरच मुलाचे फोटो आणि व्हिडिओ दुसर्‍या नावाने आणि ओळखीसह वापरले जाऊ शकतात. याशिवाय तुमच्या मुलांना थेट सायबर बुलिंगचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा फोटो किंवा व्हिडीओ पाहून मुलांना चिडवले जाते. नकारात्मक कमेंट्स केल्या जातात. उंची आणि रंग यावर देखील भाष्य केलं जात. यामुळे मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.काही वेळा अशा कमेंटस्मुळे मूल मानसिक दृष्ट्या खचून जाऊ शकते. काही वेळा लहान मुलांचे फोटो आणि व्हिडीओ एडिट करून आक्षेपार्ह वेबसाईट्स किंवा फोरमवर पोस्ट केले जाण्याची आणि त्यांचा वापर पोर्नोग्राफीसाठी केला जाण्याची शक्यता असते. इंटरनेटविश्वात एकदा फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड झाल्यावर, तो कायमचा डिजिटल फूटप्रिंटचा भाग होतो. भविष्यात मुलांच्या परवानगीशिवाय ते फोटो, व्हिडिओ कुठेही दिसू शकतात. मुलांची व्यक्तिगत माहिती (नाव, शाळेचे नाव, लोकेशन) फोटोमधून सहज मिळू शकत असल्याने त्यांचे अपहरण होण्याची शक्यता असते. तसेच फोटो कोणत्याही अज्ञात व्यक्तींकडून डाऊनलोड किंवा चुकीच्या हेतूसाठी वापरले जाऊ शकतात.
हे टाळण्यासाठी सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो शेअर करताना काही इमोजींचा (स्टिकर्स) वापर करा. अलीकडील काळात अनेक कलाकार मंडळी आपल्या मुलांचे फोटो शेअर करताना अश्या पद्धतीचा वापर करतात.

Check Also

लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत

लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …