ऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या शिखरांपैकी एव्हरेस्टची उंची समुद्रसपाटीपासून सर्वांत जास्त आहे. या शिखराची उंची आणखी वाढत आहे. ही बाब जरा विचित्र वाटेल; पण ती पूर्णपणे खरी आहे. 2005 मध्ये चीनने त्याची उंची मोजली होती, तेव्हा ती 8844.43 मीटर भरली होती. 2020 मध्ये चीन आणि नेपाळने संयुक्तपणे पुन्हा एव्हरेस्टची उंची मोजली आणि डेटा शेअर केला. नवीन आकडेवारीनुसार, माऊंट एव्हरेस्टची उंची 8,849 मीटर झाली आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एव्हरेस्टची उंची वाढण्यासाठी एक नदी कारणीभूत ठरत आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या एका संशोधनातून ही बाब उघड झाली आहे.
माऊंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वांत मोठे शिखर नेपाळच्या हद्दीमध्ये आहे. नेपाळमध्ये त्याला ‘सागरमाथा’ नावाने ओळखले जाते. 2017 मध्ये नेपाळने जगातल्या सर्वोच्च शिखराची उंची मोजण्यास सुरुवात केली होती. कारण 2015मध्ये तिथे झालेल्या भूकंपाचा माऊंट एव्हरेस्टवरही परिणाम झाला आहे, असे मानले गेले. नंतर चीनही उंची मोजण्याच्या कामात सहभागी झाला. सुमारे दोन वर्षांनी हे काम पूर्ण झाले. 2020 मध्ये जेव्हा एव्हरेस्टची उंची जाहीर करण्यात आली, तेव्हा शास्त्रज्ञांना धक्का बसला. त्यानंतर लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधल्या संशोधकांनी याबाबत अधिक संशोधन केले.
या संशोधनानुसार, माऊंट एव्हरेस्टपासून 75 किलोमीटर दूर वाहणाऱ्या अरुण नदीमुळे शिखराची उंची सुमारे 89,000 वर्षांत 15 ते 50 मीटरने वाढली आहे. नदीच्या भूपातळीतल्या बदलांमुळे एव्हरेस्टची उंची दर वर्षी दोन मिलिमीटरने वाढत आहे. जीपीएस उपकरणांच्या मदतीने हा बदल स्पष्टपणे पाहिला जाऊ शकतो. लाखो वर्षांपूर्वी भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सची टक्कर (भूकंप) होऊन हिमालयाची निर्मिती झाली होती. आतापर्यंत याच टेक्टॉनिक प्लेट्सच्या घर्षणामुळे एव्हरेस्टची उंची वाढत आहे, असे मानले जात होते. पण, लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजच्या संशोधनातून एक अनोखा पैलू समोर आला आहे.
या संशोधनात सहभागी असलेले ॲडम स्मिथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्रातील जहाजाच्या उदाहरणासह ही प्रक्रिया समजून घेता येईल. जर आपण समुद्रात जहाजातून सामान बाहेर फेकायला सुरुवात केली, तर जहाजाचा वरच्या वजनाचा भार कमी होतो आणि ते पाण्यात आणखी वर येऊन तरंगू लागतं. त्याचप्रमाणे, जेव्हा जमिनीवरून वाहणारी नदी गाळ वाहून आणते तेव्हा पृथ्वीच्या कवचाचा थर थोडा वर उचलला जातो. या प्रक्रियेला ‘आयसोस्टॅटिक रिबाऊंड’ म्हणतात. एडिंनबरा युनिव्हर्सिटीतील स्कूल ऑफ जिओ-सायन्सेसमधले प्रोफेसर ह्यू सिंक्लेअर यांचे म्हणणे आहे की, या संशोधनात ठळक केलेली कारणे योग्य वाटत असली तरी त्याबाबत काही प्रश्न निर्माण होत आहेत. ते म्हणाले, की एव्हरेस्टच्या उंचीसाठी नदीच्या पात्रातील धूप प्रक्रियेला कारणीभूत ठरवणे थोडे अनिश्चित वाटत आहे.
Check Also
मागणी राणी नेफरतितीच्या पुतळ्याची
इजिप्तच्या तीन-चार हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीच्या खुणा आजही पिरॅमिड, मकबरे व प्राचीन कलाकृतींच्या स्वरूपात पाहायला मिळतात. …
पांचजन्य वृत्तपत्र