प्रेरणादायी यशोगाथा

तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप पत्करली, केवळ मॅगी खाऊन दिवस काढले आणि आज तो एका यशस्वी कंपनीचा मालक बनला आहे. ही प्रेरणादायी यशोगाथा आहे इमॅन्युएल जॉन या तरुण उद्योजकाची.
इमॅन्युएल जॉन यांनी 2018 मध्ये 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून बंगळुरूमधील एका स्टार्टअपमध्ये कोडिंग शिकण्यासाठी 10 हजार रुपयांची इंटर्नशिप स्वीकारली. पैशांच्या तंगीमुळे मित्रांसोबत खोली शेअर करत त्यांनी अनेकदा केवळ मॅगी खाऊन दिवस काढले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांना त्याच कंपनीत 25 हजार रुपयांची पूर्णवेळ नोकरी मिळाली आणि 2020 मध्ये कामगिरीच्या जोरावर त्यांच्या वेतनात 35 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली. 2021 मध्ये त्यांनी एका नव्या कंपनीत प्रवेश केला, जिथे पगार 45 ते 80 हजार रुपयांच्या दरम्यान होता. याच काळात त्यांनी रात्रीच्या वेळी 4 ते 5 महिने ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास केला. 2022 मध्ये त्यांच्या ब्लॉकचेन कौशल्याच्या जोरावर त्यांचे उत्पन्न 3 लाख 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचले. घरून काम करत असतानाच त्यांनी स्वतःच्या व्यवसायाची पायाभरणी सुरू केली आणि 2024 मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी तमिळनाडूमध्ये ‌‘टेकस टेक्नॉलॉजीज‌’ या स्वतःच्या स्टार्टअपची स्थापना केली.
सध्या त्यांच्या या कंपनीमध्ये नऊ जण कार्यरत असून भारताव्यतिरिक्त युरोप आणि अमेरिकेमध्येही कंपनीचे ग्राहक आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून कंपनीच्या महसुलात सातत्यानं वाढ होत आहे. केवळ मोठ्या पगाराच्या पाठीमागे न धावता प्रदीर्घ विचार करून कौशल्य विकासावर भर दिल्यास स्वतःचं साम्राज्य कसं उभं करता येतं, याचं उत्तम उदाहरण इमॅन्युएल जॉन यांनी घालून दिलं आहे.

Check Also

मागणी राणी नेफरतितीच्या पुतळ्याची

इजिप्तच्या तीन-चार हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीच्या खुणा आजही पिरॅमिड, मकबरे व प्राचीन कलाकृतींच्या स्वरूपात पाहायला मिळतात. …